खनिज वाहतूक दराचा निर्णय मुख्यमंत्र्यांवर

0
118

>> केपेत खाण व्यावसायिक, आमदार बैठक

खनिज वाहतुकीचे दर ठरवण्याचा निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच घेतील असा निर्णय केपे येथील उपजिल्हाधिकारी कचेरीत आयोजित करण्यात आलेल्या ट्रक मालक, खनिज व्यावसायिक व सरकारी अधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला.

सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर, केपेचे जिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर, आग्नेल फर्नांडिस, मामलेदार प्रताप गावकर, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र राऊत देसाई, निरीक्षक रवींद्र देसाई, सुदेश नाईक, ट्रक मालक व खनिज व्यावसायिक यावेळी उपस्थित होते.

बैठकीत ट्रक मालकांनी, डिझेलचे दर, टायर, चालक यांचा पगार व अनेक वस्तूंचे दर वाढले मात्र वाहतूक दर मात्र जुनाच असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. याठिकाणी उपस्थित असलेल्या खनिज व्यावसायिकांनी वाढीव दर देण्यास हरकत घेतली व वाहतूक सुरू करण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. त्यावेळी उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस व्यस्त असल्यामुळे पोलीस संरक्षण सध्या देऊ शकत नसल्याचे सांगितले.

भाडे वाढवण्याची मागणी
यावेळी उपस्थित ट्रक मालकांनी ट्रकचे भाडे वाढवण्याची मागणी केली. यावेळी आमदार पाऊसकर यांनी आपण सभापती डॉ. प्रमोद सावंत कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांशी बोललो असून तेच याप्रकरणी तोडगा काढतील असे सांगितले. यावर खनिज व्यावसायिकांनी हरकत घेतली. तेव्हा आमदार पाऊसकर यांनी खनिज व्यावसायिकांवर तुम्ही कोणतेही नियम पाळत नाहीत. तुम्ही स्थानिकांना रोजगारापासून डावलता. खाणीतील पातळीखालील पाणी खेचल्यामुळे गावातील झरे नद्या आटल्या असल्याचे आरोप केले. यावर खनिज व्यावसायिकांनी जर आम्ही नियम मोडतो तर तुम्ही कारवाई करू शकता असे सांगितले. दरम्यान, खनिज वाहतुकीचे दर मुख्यमंत्र्यांनीच ठरवावे याबद्दल सर्वांचे एकमत झाले व बैठक आटोपती घेण्यात आली.