खनिजवाहू ट्रकच्या धडकेने कुडचड्यात दुचाकीस्वार ठार

0
122

मोरायले, कुडचडे येथे गार्डीयन एंजल चर्चजवळील जंक्शनवर काल खनिजवाहू ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालक ए. के. गोपी (७०) राहणारा देवतेभाट, शिरफोड – कुडचडे हे जागीच ठार झाले. सदर अपघात दुपारी १२.२० च्या दरम्यान झाला. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचालक लुईस ज्योकीम आरावजो (५३) याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

(जीए ०२ यू ६७५३) व डिओ (जीए ०९ टी ६७७६) यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ए. के. गोपी (७०, रा. देवतेभाट, शिरङ्गोड-कुडचडे) यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने जागीच ठार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीचालक ए. के. गोपी हे एसीएम जेटीवर इनचार्ज म्हणून कामाला होते. काल दुपारी १२.२० च्या दरम्यान आपल्या कार्यालयातून ते जीए ०९ टी ६७७६ डीओ स्कूटरने घरी जाण्यास सावर्डेच्या बाजूने जात होते. त्याचवेळी जीए ०२ यू ६७५३ क्रमांकाचा खनिजवाहू ट्रक सावर्डेच्या बाजूने असलेल्या दुसर्‍या एका जेटीवर माल खाली करण्यासाठी जात होता. गार्डीयन एंजल चर्चच्या जंक्शनवर पोहचताच दुचाकीला मागे टाकण्याच्या प्रयत्नात ट्रकची दुचाकीला धडक बसली. त्यामुळे दुचाकीचालक गोपी हे खाली कोसळून ट्रकच्या मागील चाकाखाली सापडले. गोपी यांच्या डोक्यावरून ट्रकचा मागचा टायर गेल्याने मेंदूचा चेंदामेंदा होऊन त्यांचे जागीच निधन झाले.
या अपघातानंतर लोकांनी गर्दी केली होती. काहीवेळ वाहतूक अडवून ठेवण्यात आली. मयत गोपी यांच्या मागे तीन मुली, एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे. एक मेहनती माणूस अशी त्यांची या भागात ओळख होती.
कुडचडे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक एस. कवळेकर यांनी निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून ट्रकचालक लुईस आरावजो (फातोर्डा, मडगाव) याला भादंसं कलम २७९, ३०४ खाली अटक केली. पोलीस पंचनामा झाल्यानंतर ट्रक वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
या अपघातानंतर आमदार नीलेश काब्राल यांच्याबरोबर आपच्या नेत्यांनी बगल रस्त्याचा प्रश्‍न उपस्थित करून हुज्जत घातली. यावेळी वातावरण तंग झाल्याने पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण निवळले.