खटल्यांच्या प्रसिद्धीसाठी भाजपची मोन्सेरात यांच्याविरुद्ध तक्रार

0
87

पणजी पोट निवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी त्यांच्यावरील खटल्याबाबत वृत्तपत्रातून माहिती प्रसिद्ध न केल्याप्रकरणी भाजपने येथील मुख्य निवडणूक अधिकार्‍याकडे काल तक्रार केली.

निवडणूक रिंगणातील उमेदवारांना त्यांच्याविरोधातील खटल्याची माहिती जाहीर करणे सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशान्वये बंधनकारक केले आहे. कॉँग्रेसचे उमेदवार मोन्सेरात यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात खटल्याबाबत माहिती दिलेली आहे. परंतु, मतदानाची तारीख जवळ येऊन ठेपली तरी वृत्तपत्रातून खटल्याबाबत माहिती प्रसिद्ध केलेली नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी या प्रकरणात लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी आवश्यक पाऊल उचलावे, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

उत्तर गोवा जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना या प्रकरणी लक्ष घालून आवश्यक कारवाई करण्याची सूचना केली जाईल, असे आश्‍वासन मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले.

कोणी काळजी करू
नये ः बाबूश
भाजपने आपल्यावरील खटल्याच्या माहितीची वृत्तपत्रातून प्रसिद्धीची काळजी करू नये. याबाबत काय करायचे ते आपण योग्य वेळी करणार आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केली.