‘क्वॉलिफायर २’साठी कॅपिटल्स पात्र

0
92

>> एलिमिनेटरमध्ये दिल्लीची हैदराबादवर २ गड्यांनी मात

पृथ्वी शॉ याच्या दमदार अर्धशतकानंतर ऋषभ पंतच्या स्फोटक ४९ धावांवर आरुढ होत दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा काल २ गडी व १ चेंडू राखून पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमातील या ‘एलिमिनेटर’ लढतीतील पराभवामुळे हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान आटोपले असून अंतिम फेरीतील प्रवेशासाठी दिल्लीचा सामना शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्स संघाशी होणार आहे. हैदराबादने विजयासाठी ठेवलेले १६३ धावांचे लक्ष्य दिल्लीने १९.५ षटकांत गाठले.

धावांचा पाठलाग करताना शिखर धवन व पृथ्वी शॉ यांनी दिल्लीला ६६ धावांची तडाखेबंद सलामी दिली. यात पृथ्वीचा वाटा अधिक होता. कामचलाऊ फिरकीपटू दीपक हुडाने धवनला वैयक्तिक १७ धावांवर बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर दिल्लीचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. खलिल अहमदचा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने तटवण्याच्या प्रयत्नात कर्णधार श्रेयस अय्यरने तंबूचा रस्ता धरला. याच षटकात खलिलने धोकादायक पृथ्वीचा काटा काढला. पृथ्वीने केवळ ३८ चेंडूंत ५६ धावांची खेळी साकारली. यंदाच्या मोसमातील त्याचे हे दुसरे व आयपीएलमधील एकूण चौथे अर्धशतक ठरले. वैयक्तिक १५ धावांवर बासिल थम्पीने सोडलेल्या झेलाचा पुरेपूर लाभ घेत त्याने विशेषकरून भुवनेश्‍वर कुमारला लक्ष्य केले. दिल्लीची बिनबाद ६६ वरून ३ बाद ८७ अशी घसरण झाल्याने हैदराबादच्या गोलंदाजांत उत्साह संचारला. कॉलिन मन्रो (१४) व ऋषभ पंत यांच्यातील भागीदारी खुलत असतानाच राशिद हैदराबादच्या मदतीला धावला. राशिदने डावातील पंधराव्या व स्वतःच्या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मन्रोला पायचीत केले. मन्रोने पंचांच्या निर्णयाला आव्हान देत ‘रिव्ह्यू’ वाया घालवला. याच षटकात अक्षर पटेल पंचांच्या सदोष निर्णयाचा बळी ठरला. चेंडू पॅडला लागून गेलेला असताना पंचांनी त्याला झेलबाद दिले. यावेळी १४.४ षटकांत दिल्लीची अवस्था ५ बाद १११ अशी झाली होती. शेवटच्या तीन षटकांत दिल्लीला विजयासाठी ३४ धावांची आवश्यकता होती. बासिल थम्पीने टाकलेल्या डावातील १८व्या षटकात पंतने प्रत्येकी दोन चौकार व षटकार ठोकले. या षटकात दिल्लीने २२ धावा चोपल्या. या धुंवाधार फलंदाजीनंतर दिल्लीचा संघ सहज सामना जिंकणे अपेक्षित होते. परंतु, १९व्या षटकात सामना पुन्हा हैदराबादच्या बाजूने झुकला. भुवनेश्‍वर कुमारने या षटकातील पहिल्या चेंडूवर रुदरफर्डला व पाचव्या चेंडूवर पंतला बाद केले. या षटकात केवळ ७ धावा आल्या. शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी ६ धावांची आवश्यकता होती. या षटकातील चौथ्या अधिकृत चेंडूवर ‘बाईज’ची धाव घेताना अचानक दिशा बदलल्याने अडथळा आणल्याप्रकरणी अमित मिश्राला पंचांनी बाद ठरविले. हैदराबादने यासाठी ‘रिव्ह्यू’चा वापर केला. दोन चेंडूंत दोन धावांची आवश्यकता असताना किमो पॉलने चौकार ठोकत संघाला विजयी केले.
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादने वृध्दिमान साहाचा अपवाद वगळता आघाडी फळीतील सर्व फलंदाजांच्या उपयुक्त योगदानामुळे आव्हानात्मक धावसंख्या उभारली. त्यांचा सलामीवीर मार्टिन गप्टिलने केवळ १९ चेंडूंचा सामना करताना चारर षटकारांसह ३६ धावा चोपल्या. अमित मिश्राने त्याचा बळी घेतला. मनीष पांडेला आपल्या ३० धावांसाठी ३६ चेंडू खेळावे लागले. उभय संघांनी या सामन्यासाठी आपल्या संघात प्रत्येकी एक बदल केला. दिल्लीने कॉलिन इंग्रामच्या जागी कॉलिन मन्रोला तर हैदराबादने युसूफ पठाणच्या जागी दीपक हुडाला संघात घेतले.

धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ः वृध्दिमान साहा झे. अय्यर गो. शर्मा ८, मार्टिन गप्टिल झे. पॉल गो. मिश्रा ३६, मनीष पांडे झे. रुदरफर्ड गो. पॉल ३०, केन विल्यमसन त्रि. गो. शर्मा २८, विजय शंकर झे. पटेल गो. बोल्ट २५, मोहम्मद नबी झे. पटेल गो. पॉल २०, दीपक हुडा धावबाद ४, राशिद खान झे. पंत गो. पॉल ०, भुवनेश्‍वर कुमार नाबाद ०, बासिल थम्बी नाबाद १, अवांतर १०, एकूण २० षटकांत ८ बाद १६२
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ३-०-३७-१, इशांत शर्मा ४-०-३४-२, अक्षर पटेल ४-०-३०-०, अमित मिश्रा ४-०-१६-१, किमो पॉल ४-०-३२-३, शर्फेन रुदरफर्ड १-०-११-०
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. शंकर गो. खलिल ५६, शिखर धवन यष्टिचीत साहा गो. हुडा १७, श्रेयस अय्यर झे. साहा गो. खलिल ८, ऋषभ पंत झे. नबी गो. भुवनेश्‍वर ४९, कॉलिन मन्रो पायचीत गो. राशिद १४, अक्षर पटेल झे. साहा गो. राशिद ०, शर्फेन रुदरफर्ड झे. नबी गो. भुवनेश्‍वर ९, किमो पॉल नाबाद ५, अमित मिश्रा क्षेत्ररक्षणात अडथळा १, ट्रेंट बोल्ट नाबाद ०, अवांतर ६, एकूण १९.५ षटकांत ८ बाद १६५
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ४-०-४२-२, मोहम्मद नबी ४-०-२९-०, खलिल अहमद २.५-०-२४-२, राशिद खान ४-१-१५-२, बासिल थम्पी ४-०-४१-०, दीपक हुडा १-०-१३-१