क्रोएशियाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

0
115

क्रोएशियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये डेन्मार्कचा ३-२ असा पराभव करीत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता शनिवार ७ जुलै रोजी होणार्‍या उपांत्यपूर्व सामन्यात क्रोएशियाची लढत यजमान रशियाशी होणार आहे. या विजयाबरोबरच क्रोएशियन संघाने १९९८ प्रथमच विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे.

रविवारी उशिरा झालेल्या अंतिम सोळातील संघर्षपूर्ण लढतीत पूर्ण वेळेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. दोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात केली. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला डेन्मार्कने गोल मारुन १-० अशी आघाडी मिळवली. मथियास जोर्गनसनने हा गोल नोंदविला. परंतु त्यांचा आनंद हा काही क्षणांपुरताच टिकला. कारण लगेच ४थ्या मिनिटाला मारियो मांडझुकिझने गोल नोंदवित क्रोएशियाला बरोबरी मिळवून दिली. यानंतर दोन्ही संघाला गोल मारण्यात अपयश आले. त्यानंतर जादा वेळेच्या पहिल्या १५ मिनिटांच्या सत्रात डेन्मार्कला पेनल्टी मिळाली मिळाली होती. परंतु क्रोएशियाच्या लुका मॉड्रिकने ती वाया घालविली. त्याचा फटका डेन्माकच्या गोलरक्षकाने डावीकडे झेपावत सुरेखपणे थोपविला. जादा वेळेच्या दुसर्‍या १५ मिनिटांच्या सत्रातही दोन्ही संघांना आणखी गोल नोंदविता न आल्याने अखेर निकालासाठी रेफ्रीने पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. त्यात विजयी ठरलेल्या क्रोएशिया संघातर्फे आंद्रेज क्रॅमारिक, लुका मॉडरिक व इव्हान रॅकिटिक यांनी गोल नोंदविले.

मिलान बाजेडी व जोसिप पिवारिक याना जाळीचा वेध घेता आला नाही. तर पराभूत डेन्मार्कतर्फे मायकल क्रोहन-डेहली व सायमन केजाएर यांनाच क्रोएशियाचा गोलरक्षक सुबासिचला चकविता आले. तर ख्रिस्तियान एरिकसन, लेस्से स्कोरे आणि निकोलाय जॉर्गनसन यांनी पेनल्टी वाया घालविल्याने क्रोएशियाने हा सामना ३-२ असा जिंकत अंतिम आठ संघातील आपले स्थान निश्‍चित केले.