क्रीडामंत्र्यांनी क्रीडापटूंची माफी मागावी

0
102

>> कॉंग्रेस ः राष्ट्रीय स्पर्धा आयोजनात अपयश आल्याचा दावा

भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा निर्धारित वेळेत नोव्हेंबर २०१८ मध्ये आयोजित करण्यास अपयशी ठरल्याने सरकार आणि क्रीडा मंत्री मनोहर आजगावकर यांनी समस्त जनता आणि क्रीडापटूंची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली.

इंडियन ऑलिंपिक असोसिएशनने ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नोव्हेंबर २०१८ मध्ये गोव्यात आयोजित करण्याची घोषणा २०१४ मध्ये केली होती. राज्य सरकार मागील साडे तीन वर्षात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी साधनसुविधा तयार करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे क्रीडा मंत्री आजगावकर यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा फेब्रुवारी २०१९ मध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव भारतीय ऑलंपीक असोसिएशनकडे सादर केला आहे. तसेच त्यातील चार क्रीडा स्पर्धा गोव्याबाहेर खेळविण्याची विनंती केली आहे, असे आमोणकर यांनी सांगितले.

पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा न घेतल्यास असोसिएशनच्या पुढील स्पर्धांच्या वेळापत्रकावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे, असे मत असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी व्यक्त केले आहे, असे आमोणकर यांनी सांगितले.

२०१९ बाबतही
स्पष्टीकरण करावे
राज्य सरकार राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत गंभीर नाही. त्यामुळे आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अधिकारी सुध्दा स्पर्धा आयोजनाबाबत विविध कारणांमुळे जबाबदार्‍या स्वीकारण्यास पुढे येत नाहीत. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार कार्यरत असताना क्रीडा स्पर्धेसाठी साधन सुविधा उपलब्ध करण्यात यश प्राप्त झालेले नाही. तसेच चार क्रीडा प्रकारांचे आयोजन दुसर्‍या राज्यात करण्यात येणार असल्याने सायकलिंग स्टेडियम, शुटिंग अकादमीच्या स्थापनेपासून मुकावे लागणार आहे.

राज्यात राष्ट्रीय स्पर्धेसाठी साधनसुविधा तयार करण्याच्या कामाला गती मिळालेली नाही. त्यामुळे फेब्रुवारी २०१९ मध्ये ही क्रीडा स्पर्धा होणार की नाही? याबाबत क्रीडा मंत्र्यांनी स्पष्टीकरण करण्याची गरज आहे, असेही आमोणकर यांनी सांगितले.