‘कौशल्य प्रशिक्षण’ ः काळाची मागणी

0
438
  • नागेश एस. सरदेसाई
    (वास्को)

‘कौशल्य विकास प्रशिक्षण’ हे आजच्या गतिमान माहिती तंत्रज्ञानाच्या युगात यशाची किल्लीच असून ते वाढणार्‍या बेरोजगारीचा दर कमी करून, गोव्यासारख्या छोट्या राज्यातसुद्धा उद्योगातील वाढती मागणी बघता नोकर्‍या मिळवून देण्यात अग्रेसर राहू शकते.

मित्रांनो, दहावीचा निकाल लागलेला आहे आणि तरुणाई विविध करिअर करण्यासाठी आतुर झालेली आहे. जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे सायन्स, कॉमर्स किंवा कलेच्या क्षेत्रात पाहिजे ते करिअर करण्याची संधी मिळेलच पण ज्या विद्यार्थ्यांना गुण थोडे कमी मिळाले आहेत, पण त्यांच्यामध्ये इतर कौशल्ये आहेत, ते व्यावसायिक कोर्सेस करूनदेखील त्यांचं आयुष्य घडवू शकतात. १०+२ पातळीवर गोव्यातील विविध उच्च माध्यमिक विद्यालयात असलेल्या कोर्सेसबद्दल आपण माहिती करून घेऊया.
वाणिज्य किंवा कॉमर्स शाखेत – ऑफिस सेक्रेटरीशिप अँड स्टेनोग्राफी, ऑडिटिंग अँड अकाउंटन्सी, इन्श्युरन्स ः मार्केटिंग अँड सेल्समनशिप, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट. या कोर्सेसनंतर टॅली, चार्टर्ड अकाउंटन्सी, ऑफिस जॉब, इन्शुरन्स एजंट, मार्केटिंग एजन्ट्‌सचे जॉब इत्यादी लगेच करू शकता. या क्षेत्रात थोडा अनुभव मिळवल्यानंतर तुम्ही नोकरी मागणार नाही तर इतरांना नोकरी देऊ शकाल.

आमच्या बहिणींकरिता – कोर्स इन कमर्शियल गार्मेंट, डिझायनिंग अँड मेकिंग (सीजीडीएम्) या क्षेत्रात थोडीशी कौशल्ये आत्मसात केल्यानंतर ताबडतोब काम मिळवू शकतात. तसेच कॅटरिंग अँड रेस्टॉरेंट मॅनेजमेंट (सीआर्‌एम्), बेकरी अँड कन्फेक्शनरी (बी अँड सी) हे कोर्सेस त्यांना हॉटेल व्यवसायात नोकरी मिळवून देऊ शकतात आणि याच्या बरोबरच जर पर्यटन क्षेत्रात गेले तर आणखी लवकर काम मिळवू शकतात.
२१ व्या शतकात म्हणजेच हायटेक माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात, कॉम्प्युटर टेक्निक्स (सीटी)मधील कोर्सेस केले तर कॉम्प्युटर प्रोग्राम्समध्ये कॉम्प्युटर टेक्निशियन म्हणून मोठ्या प्रमाणात नोकर्‍या मिळू शकतात. आपल्या देशात उदारीकरणाच्या युगात ईलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये व्यवसायाची कवाडं मोठ्या प्रमाणात उघडलेली दिसतात. ज्या तरुणांना ईलेक्ट्रॉनिक उपकरणांची आवड आहे त्यांच्यासाठी ईलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी (ईटी) आणि मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ ईलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक डोमेस्टिक अप्लायन्सेस (एमआरईईडीए) हे दोन करारबद्ध कोर्सेस आहेत. दोन विषयात योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना जीवनामध्ये प्रचंड यशप्राप्ती होईल. आरोग्य क्षेत्रात.. उदाहरणार्थ – हेल्थ केअरमधील कोर्स – हेल्थ केअर असिस्टंट (एचसीए) हा कोर्स अनेक संधी मिळवून देणारा आहे.

टुरीझम अँड ट्रॅव्हल टेक्निक्स (टीटीटी) हा आणखी एक कोर्स आहे- गोव्यात जवळपास ३० टक्के क्षेत्र हे जंगलाने व्यापलेले आहे आणि या परिस्थितीत हॉर्टिकल्चरमधील कोर्स केला तर गोवा सरकारच्या शेतीविषयक अनेक योजनांचा लाभ उठवून काहीतरी मोठे काम करता येऊ शकेल.

शेवटी व्यावसायिक प्रवाहामध्ये (१०+२) आजच्या गतीमान युगातील तरुणांकरिता आपल्याकडे ऑटोइंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचे (एईटी)कोर्सेस आहेत. जेव्हा की राज्यातील वाहनांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झालेली असल्यामुळे ऑटोमोबाईलच्या क्षेत्रात करिअरला म्हणजे महान टेक्निकल कारागीर म्हणून भरपूर मागणी आहे. तरुणांनी हे लक्षात घेतले पाहिजे की हे सर्व १५ कोर्सेस गोव्यातील विविध भागात असलेल्या जवळजवळ ५० व्यावसायिक उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये आज उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र आणि इंटरनेटद्वारे या कोर्सेसची माहिती मिळवून त्याची निवड केली पाहिजे.

‘द समग्र शिक्षा अभियान (एसएसए)’ ज्यालाच अगोदर सर्वशिक्षा अभियान म्हणत होते, आज मोठ्या प्रमाणावर तरुणांंमधील कौशल्ये उपयोगात आणण्यासाठी पुढे आलेले आहे. अभ्यासक्रमातील विविध विषयांची निवड करण्यास तरुणांना सोपे व्हावे म्हणून इयत्ता ९वीमध्येच खालील १५ विषयांपैकी कोणत्याही एका विषयाची निवड करायची (मॉड्यूल १) जे १०वीमध्येही चालू राहील (मॉड्यूल २), ज्याच्यानंतर (मॉड्यूल ३) आणि (मॉड्यूल ४) हे क्रमशः ११वी आणि १२वीमध्ये राहील आणि ते त्यांना निवडलेल्या विशिष्ट विषयातील कौशल्य क्षमता मिळवून देईल आणि १२वीनंतर त्या क्षेत्रात ते एक ज्यादा फायदा मिळवून देणारे शिक्षण ठरेल.

‘एन्‌एस्‌क्यूएफ् – नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क’- समग्र शिक्षा अभियानने भारत सरकारच्या मनुष्यबळ आणि विकास मंत्रालय व कौशल्ये विकास मंत्रालयासोबत सुरू केले असून त्यामार्फत विद्यार्थी त्याचे शालेय शिक्षण कुशलतेने आणि सहजरीत्या घेऊ शकतो. जर कुणाही विद्यार्थ्याला इतिहास-भुगोल-समाजशास्त्र किंवा विज्ञान किंवा गणित यापैकी कुठल्याही विषयात कमी गुण मिळाले तर तेव्हा तो एनएसक्यएफने ऑफर केलेल्या विषयांपैकी कोणतेही विषय घेऊन स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतो. ते विषय असे आहेत– ऑटोमोबाईल, आयटी/आयटीईएस, हेल्थ केअर, रिपेअर्स इत्यादी त्यापैकी काही आहेत. सगळ्या सरकारी विद्यालयांमध्ये (एकूण ७८ आहेत) आणि काही खाजगी शाळांमध्ये हे कोर्सेस सुरू केलेले आहेत.

१०वीची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक पातळीवरसुद्धा सगळ्या सरकारी (९) आणि खाजगी शाळांमध्ये मॉड्यूल ३ व ४ साठी विविध विषयांमध्ये कोर्सेस सुरू केले आहेत. जीएसएसए- गोवा समग्र शिक्षा अभियानामार्फत आणि गोवा सरकारच्या शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत जे कोर्सेस गोव्यात चालू आहेत त्या कोर्सेसनी, एका अभ्यासानुसार, मागील काही वर्षांमध्ये राष्ट्रीय पातळीवर गोव्यातील कौशल्ये कोरून काढलेली आहेत ज्यामुळे हे सिद्ध झाले आहे की हे कौशल्यावर आधारित कोर्सेस गोव्यातच राहतील आणि येणार्‍या काळात तरुणाईमधील बुद्धिमत्तेच्या बळावर ते राज्यातील बेरोजगारी कमी किंवा नाहीशी करतील.
राज्यात पहिले जे स्टेट डायरेक्टोरेट ऑफ क्राफ्ट्‌मन ट्रेनिंग असे होते ते आता डायरेक्टोरेट ऑफ स्किल डेव्हलपमेंट झालेले असून त्यांच्यामार्फत १० इंडस्ट्रियल ट्रेडिंग संस्था – ज्या फोंडा, पणजी (आल्तिनो), पेड्डे (म्हापसा), तुये (मडगाव), वाळशी (बिचोली), होंडा(सत्तरी), बोर्डा(मडगाव), काणकोण (कुडचडे), मास्तिमळ(काणकोण) आणि बोगदा(वास्को) या ठिकाणी आहेत.

याशिवाय- येथे खाजगी ‘आयटीआय’ संस्था आहेत – साखळी-बिचोली येथील सेसा खाजगी गट, खोर्ली-तिसवाडी येथील मॉंटफोर्ट, शिवोली येथील कीर्ती विद्यालय, पालये-पेडणे येथील भूमिका, मार्ना-शिवोली येथील इंडो-जर्मन संस्था, दिगार-पंचवाडी-फोंडा येथील सेसा खाजगी आणि वेर्णा-सालसेत येथील आग्नेल प्रायव्हेट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, आग्नेल टेक्निकल एज्युकेशन व कॉम्प्लेक्स या सर्व संस्था भरपूर कोर्सेस चालवतात. यांच्यापैकी अनेक कोर्सेस हे १०वीची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर करता येतात. पण उमेदवारांनी अधिक माहिती डायरेक्टोरेट ऑफ स्किल डेव्हलपमेंटच्या वेबसाईटवर पहावी जेणेकरून त्यांच्या नजरेसमोर स्वच्छ चित्र येईल. हे कोर्सेस खाली दिले आहेत..

* कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, सिस्टीम मेंटेनन्स, डेस्कटॉप पब्लिसिंग (डीटीपी)ऑपरेटर, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, ईलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ड्राफ्ट्‌स्‌मन (मेकॅनिकल), सिव्हील ड्राफ्ट्‌स्‌मन, स्टेनोग्राफी अँड सेक्रेटरीयल असिस्टंट (इंग्लिश), सेक्रेटरीयल प्रॅक्टीस (इंग्लिश), मेकॅनिक मोटर व्हेईकल, बेसिक कॉस्मेटॉलॉजी, फूड प्रॉडक्शन (जनरल), फूड+बेव्हरेज गेस्ट सर्व्हिस असिस्टंट, मेकॅनिक डिझेल इंजिन, वेल्डर, कारपेंटर, वायरमन, प्लंबर आणि सिविंग टेक्नॉलॉजी. व्यावसायिक कोर्सेसप्रमाणे हे कोर्सेससुद्धा २ वर्षांचे प्रत्येकी आहेत आणि काही एक वर्ष कालावधीचे आहेत.

इथे काही अशाही संस्था आणि विभाग आहेत, ज्या सर्टिफिकेट ऑफ एक्सेलन्स स्कीमच्या मार्फत चालवल्या जातात आणि त्या नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (एन्‌सीव्हीटी)-नवी दिल्लीशी संलग्न आहेत. पणजीमध्ये आयटीआय तसेच कोर्सेस- हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट कोर्स, इन्फॉर्मेशन, प्रॉडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग, फॅब्रिकेशन (फिटिंग अँड वेल्डिंग), ऑटोमोबाईल आणि ईलेक्ट्रिकल हेसुद्धा चालू केले आहेत जेणेकरून पुढच्या काळात उद्योग क्षेत्राला कुशल कारागीर मिळून शिक्षण-उद्योगाचा नवीन चेहरा रोजगाराच्या क्षेत्रात निर्माण होईल. या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, थिअरी आणि प्रॅक्टिकलच्या माध्यमातून अनुभवी हात निर्माण करतात, जे योग्य ठिकाणी उपयोगात येतात. याशिवाय सर्व आयटीआय संस्थांमध्ये इतरही विषय आहेत जसे क्रीडा ज्यामुळे सर्वांगीण विकासाला चालना मिळावी. गोवा सरकार पॉलिटेक्निकमध्ये रिकाम्या राहिलेल्या जागांवरही या १०वी नंतरच्या गोव्यातील आयटीआयमध्ये प्रमाणपत्र मिळालेल्या उमेदवारांना कौशल्य विकास संचालनालयामार्फत संधी देते.

आयटीआय कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांच्या त्यांच्या विषयानुसार उमेदवार खालील विभागात प्रवेश मिळवू शकतात- जसे ईलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, ईलेक्ट्रॉनिक्स इंजि., ईलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, मेडिकल ईलेक्ट्रॉनिक्स, ईलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, आणि ईलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. त्याचप्रमाणे आयटीआयमधून बाहेर निघालेले उमेदवार खालील क्षेत्रात सहभागी होऊ शकतात – जसे ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, सिव्हील इंजिनिअरिंग, तसेच मॉडर्न ऑफिस प्रॅक्टिस आणि हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी. हजारापेक्षा जास्त जागा आयटीआय संस्थांमध्ये निर्माण केलेल्या आहेत. त्याशिवाय पॉलिटेक्निकमधील एकूण जागांच्या १०% जागा या गोवा आयटीआयमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (एकदम दुसर्‍या वर्षात प्रवेश) आरक्षित करण्यात आल्या आहेत.

१०वी नंतरच्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करण्यासाठी पॉलिटेक्निक संस्थांमध्ये ३ ते ४ वर्षांचा कोर्स आहे, जो सरकारी पॉलिटेक्निक संस्थांमध्ये आहे – जसे आल्तिनो-पणजी; मये; काकोडा-कुडचडे; इन्स्टिट्यूट ऑफ शिप बिल्डिंग टेक्नॉलॉजी, बोगदा-वास्को, आग्नेल पॉलिटेक्निक, वेर्णा, आणि गव्ह. गोवा कॉलेज ऑफ फार्मसी, पणजी.
थोडक्यात काय तर कौशल्य विकास प्रशिक्षण हे आजच्या गतिमान माहिती तंत्रज्ञानाच्या युगात यशाची किल्लीच असून ते वाढणार्‍या बेरोजगारीचा दर कमी करून, गोव्यासारख्या छोट्या राज्यातसुद्धा उद्योगातील वाढती मागणी बघता नोकर्‍या मिळवून देण्यात अग्रेसर राहू शकते.