कोहलीसोबत खेळल्याने नशीबवान ः विल्यमसन

0
131

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत मला क्रिकेट खेळायची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो, असे न्यूझीलंडचा कर्णधार व दिग्गज खेळाडू केन विल्यमसन याने काल रविवारी म्हटले. कर्णधार विराटसोबत खेळताना मला सुरुवातीच्या दिवसांची आठवण होते, असे विल्यमसन म्हणाला.

विल्यमसन आणि विराट कोहली मलेशियात २००८ साली झालेल्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्‍वचषक स्पर्धेत खेळले होते. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने हा विश्‍वचषक उंचावला होता. उपांत्य फेरीमध्ये विराटच्या संघाने न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरीमध्ये धडक दिली होती. तेव्हापासून दोघांची मैत्री आहे. आज दोन्ही खेळाडूंची क्रिकेट कारकीर्द शिखरावर आहे. रवींद्र जडेजा, टिम साऊथी व ट्रेंट बोल्ट हे सध्याचे प्रस्थापित खेळाडूदेखील ‘त्या’ विश्‍वचषकात खेळले होते.

स्टार स्पोर्टस्‌च्या ‘क्रिकेट कनेक्टेड’या कार्यक्रमात बोलताना विल्यमसन म्हणाला की, विराट आणि मला एकमेकांच्या विरोधात खेळण्याची संधी खूप पूर्वी मिळाली यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो. किशोरवयात मी त्याला भेटलो होतो आणि त्याची प्रगती, कारकीर्द बहरताना पाहण्याची संधी मला मिळाल्याचे भाग्य समजतो. आम्ही बर्‍याच काळापासून एकमेकांविरोधात खेळत आहोत. गेल्या काही वर्षात आम्ही भेटल्यावर क्रिकेटविषयी अनेक गप्पा मारल्या. एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण आम्ही करतो. दोघांचा खेळ आणि मैदानातील आक्रमकता यात खूप फरक असला तरी आमचे विचार मात्र समान आहेत, असेही तो म्हणाला.