‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या चाचणीसाठी २५ जणांचीच नोंदणी

0
121

कोविडसाठीच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लशीची मानवी चाचणी देशातील १२ इस्पितळांतून सुरू झालेली असतानाच गोव्यातील ज्या रेडकर इस्पितळात ही मानवी चाचणी घेतली जाणार आहे, तेथे १२४ जणांची गरज असताना आतापर्यंत अवघ्या २५ जणांनीच त्यासाठी नोंदणी केली असल्याची माहिती काल सूत्रांनी दिली.

या समाजोपयोगी कामासाठी सर्वांत प्रथम पुढे आले ते भाजपचे एक सक्रीय कार्यकर्ते भावेश जांबावलीकर. मानवी चाचण्यांसाठी ही लस टोचून घेण्यास लोकांनी पुढे यावे, यासाठी त्यांनी आता समाज माध्यमांवरून मोहिमही चालू केली आहे.

काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना ते म्हणाले, फार्मास्युटिकल्स क्षेत्रात गोवा देशात आघाडीवर असल्याने या मानवी चाचण्यांसाठी गोव्याचीही निवड करण्यात आली आहे.

गोव्याची जेव्हा निवड झाली तेव्हाच आपण या मानवी चाचण्यासाठी स्वतःची नोंदणी करावी, असा निर्णय घेतला होता. त्यानुसार आपण नोंदणी केल्याचेही ते म्हणाले. या चाचण्यांसाठी गोव्यात १२४ जणांची गरज आहे. मात्र, आतापर्यंत २५ जणांनी त्यासाठी नोंदणी केलेली असून अजून शंभर एक लोकांनी त्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.