कोविड केअर सेंटरांची क्षमता ५०० खाटांनी वाढवणार

0
180

>> मुख्यमंत्र्यांची ग्वाही : कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणार्‍या पोलिसांना हॉटेलांतून ठेवणार

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने कोविड केअर सेंटरची क्षमता आणखी ५०० खाटांनी वाढविली जाणार आहे. कोरोनाबाधित आणि कटेंनमेंट झोनमध्ये काम करणार्‍या पोलिसांची हॉटेलमध्ये निवासाची सोय केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी २५० खाटांचे कोविड इस्पितळ आहे. कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली असून १ हजार खाटांची सोय आहे. पावसाळ्याच्या दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने नवीन कोविड सेंटरची तयारी करण्यात येत आहे. फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, आयआयटी, एनआयटी या संस्थांच्या हॉस्टेलचे कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले असून या ठिकाणी ५०० खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. राज्यात आणखी एका कोविड इस्पितळाची गरज भासल्यास योग्य निर्णय घेण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटरमध्ये काम करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर घेतले जाणार आहेत. राज्यात कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्यातील विविध भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य, पोलीस खात्याचे अनेक कर्मचारी कोविड केअर सेंटर, कटेंनमेंट झोनमध्ये कार्यरत आहेत. त्या कर्मचार्‍यांपासून कोरोना विषाणूचा आणखी फैलाव होऊ नये म्हणून कोरोनाशी संबंधित कामकाज करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांच्या निवासासाठी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्याची सूचना पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

‘प्लाझ्मा थेरपी’साठी प्रयत्न
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी पद्धतीने उपचार करण्यासाठी संबंधितांकडून आवश्यक मान्यता मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मांगूर हिल कटेंनमेंट झोनबाबत चर्चा करण्यासाठी सोमवार दि. ६ रोजी सकाळी ११.३० वाजता उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत मांगूर हिल कटेंनमेंट झोनबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे,
राज्यातील कोरोना नियंत्रण उपाय योजनेच्या तालुका पातळीवरील कार्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी मंत्र्यांवर सोपविण्यात आली असून मंत्र्यांना तालुक्यांचे वाटप करण्यात आले आहे. या मंत्र्यांकडून तालुका पातळीवर कोविड केअर सेंटर आणि एसओपीच्या कार्यवाहीबाबत आढावा घेण्यासाठी संबंधितांच्या बैठका घेऊन आवश्यक सूचना केल्या जाणार आहेत. सोमवार दि. ६ रोजी सकाळी ९ वा. डिचोली येथील पोलीस स्टेशनवर आढावा बैठक घेणार आहोत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

पोलिसांना कडक कारवाईचे आदेश
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह सात जणांचा मृत्यू झाला तरी नागरिकांत भीती निर्माण झाल्याचे दिसून येत नाही. बर्‍याच जणांकडून सामाजिक अंतर, मास्क आदी नियमांचे पालन केले जात नाही. सरकारी यंत्रणेकडून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना दंड ठोठावला जातो. तरीही शिस्तीचे पालन होत नसल्याने आता कडक कारवाई करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.