कोळसा प्रकल्पाचा विस्तार नाहीच

0
69

गोवा सरकारने मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी टर्मिनसचा विस्तार न करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असताना काही हितशत्रू जाणूनबुजून कोळसा प्रकरणी जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काल पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला.
यासंबंधी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी टर्मिनसचा विस्तार करायचा नाही अशी भूमिका सरकारने घेतलेली आहे. गेल्या पावसाळी अधिवेशनातच आपण सरकारची सदर भूमिका स्पष्ट केली होती व तसे पत्रही लिहून केंद्र सरकारला पाठवले होते. त्यामुळे मुरगाव बंदरात कोळसा हाताळणी टर्मिनसचा विस्तार करण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे पर्रीकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. कोळशामुळे प्रदूषण होण्याचा धोका असल्याने तो टाळण्यासाठीच सरकारने सदर निर्णय घेतल्याचे पर्रीकर म्हणाले.

कॉंग्रेस काळात कोळसा हाताळणी
दरम्यान, कोळसा हाताळणीचा विस्तार न केल्यास मुरगाव बंदराचे जे नुकसान होणार आहे ते भरून काढण्यासाठी मुरगाव बंदराला पर्यटक बोटींना चालना देण्याची सूचना करण्यात आली असल्याचे पर्रीकर यांनी नमूद केले. मुरगाव बंदरात कोळसा हाताळणी ही मीच सुरू केली असे काही जण भासवू पाहत आहेत. पण प्रत्यक्षात ही कोळसा हाताळणी तेथे सुरू झाली ती कॉंग्रेसच्या काळातच असा आरोप यावेळी पर्रीकर यांनी केला. २०१२ साली आपले सरकार सत्तेवर येण्यापूर्वीच कॉंग्रेसने या कोळसा हाताळणीसाठीचा करार केला होता. केंद्रातही तेव्हा मोदी यांचे सरकार नव्हते. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांनी आता आमच्या नावाने बोटे मोडू नयेत, असे पर्रीकर म्हणाले.

वास्को प्रदूषणमुक्त
वास्को शहरात कोळसा प्रदूषण नसल्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या वायू तपासणीतून दिसून आले असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी सांगितले. वास्को शहरात वायू प्रदूषण आहे की काय हे तपासण्याची सूचना आपण गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली होती. गेल्या एप्रिल महिन्यात मुरगाव नगरपालिका इमारत परिसरातील वायूची आठवडाभर तपासणी करण्यात आली. या आठ दिवसात १ दिवस हवा चांगली, ४ दिवस समाधानकारक असल्याचे आढळून आले. तर तीन दिवस किंचतसे प्रदूषण असल्याचे आढळून आले. नंतर मे महिन्यात पुन्हा ९ दिवस तपासणी करण्यात आली. त्यावेळी १ दिवस वायू चांगली, ३ दिवस समाधानकारक, ५ दिवस अल्प प्रदूषित आढळली. मात्र, एकदम वाईट व जास्त प्रदूषित कधीच आढळली नाही. नंतर ऑक्टोबर महिन्यात तपासणी केली तेव्हाही जवळपास तशीच स्थिती होती, असे पर्रीकर यांनी सांगितले.

एप्रिल महिन्यात सडा जंक्शन परिसरात ३० दिवस वायू तपासणी केली असता त्यांपैकी १० दिवस वायू खूपच चांगली, १६ दिवस समाधानकारक, ४ दिवस अल्प प्रदूषित आढळली. मात्र, एकही दिवस अगदी वाईट वा प्रदूषित असल्याचे आढळून आले नसल्याचे पर्रीकर म्हणाले. ही वायू आणखीही शुद्ध रहावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगतानाच जे थोडेशे प्रदूषण झाले होते त्याला केवळ कोळसाच जबाबदार नव्हता तर अन्य प्रकारचे प्रदूषणही होते, असे पर्रीकर म्हणाले.