कोलवाळ तुरुंगातील पार्टीची न्यायदंडाधिकार्‍यांमार्फत चौकशी

0
115

सरकारने कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील भांग पार्टी प्रकरणाची न्यायदंडाधिकार्‍यांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी (१) यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या भांग पार्टी प्रकरणाचा चौकशी अहवाल ३० दिवसात सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

यासंबंधी गृहखात्याच्या अवर सचिव नितल आमोणकर यांनी आदेश जारी केला आहे. कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात महाशिवरात्रीच्या दिवशी गेल्या १३ फेब्रुवारीला मध्यरात्री भांग पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या भांग पार्टीत कैदी आणि कर्मचारी सहभागी झाले. मध्यरात्रीच्या सुमारास कारागृहातील खटले सुरू असलेले दोन कैदी व एक तुरुंग कर्मचारी किरण नाईक याला अस्वस्थ वाटू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याने भांग पार्टीचा प्रकार उजेडात आला. या प्रकरणाची तुरुंग अधीक्षकांनी गंभीर दखल घेत साहाय्यक जेलर शिवप्रसाद लोटलीकर, हेडगार्ड राजेंद्र वाडकर, जेलगार्ड विजय देसाई, कायतान गुदिन्हो या कर्मचार्‍यांना निलंबित करून अर्तंगत चौकशी केली. तुरुंग अधीक्षकांनी या प्रकरणी केलेली चौकशी समाधानकारक नसल्याचे सरकारला आढळून आले आहे. या प्राथमिक चौकशीमध्ये या प्रकरणाचे निश्‍चित कारण शोधून काढण्यात यश प्राप्त झाले नाही. तुरुंगाच्या सुरक्षेची जबाबदारी तुरुंग अधिकारी आणि इंडियन रिझव्ह बटालियनच्या पोलिसांकडे सोपविण्यात आलेली आहे. या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये हयगय केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून सत्य उघड करणे तसेच घटनेची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी निःपक्षपाती चौकशीसाठी उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी (१) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भांग पार्टी आयोजित करण्यासाठी अंडर ट्रायल कैद्याला दूध व इतर साहित्य कुणी आणून दिले, या प्रकरणात अन्नातून विषबाधा झाली का?, या घटनेमागे घातपाताची शक्यता होती का? कारागृह अधिकारी किंवा इंडियन रिझव्ह बटालियनच्या कर्मचार्‍याच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे. या घटनेला कारागृह अधिकारी किंवा बटालियनचा कर्मचारी जबाबदार आहे का ? भविष्यकाळात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सूचना व शिफारशी करणे या मुद्यावर चौकशी केली जाणार आहे.