कोलवाळमध्ये महिलांची पाण्यासाठी वणवण

0
102
कोलवाळ येथे पत्रकार परिषदेत बोलताना शीतल चोडणकर. सोबत ग्रामस्थ.

म्हापसा (न. प्र.)
रामनगर-कोलवाळ येथील रहिवाशांना गेल्या एक वर्षापासून सुरळीतपणे पाणीपुरवठा केला जात नसल्याने गेल्या ८ नोव्हेंबर २०१७ रोजी म्हापसा पाणीपुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा नेला होता. यावेळी तेथील अभियंते सुभाष बेळगांवकर यांनी पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले होते. ते आश्‍वासन आज एक वर्ष झाले तरी अद्यापही पूर्ण झालेले नाही. तसेच या मतदारसंघातील आजी माजी आमदारांनीही आजपर्यंत लक्ष दिले नसल्याने येथील महिला वर्गाना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे असे कोलवाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक पंच सदस्या शीतल चोडणकर, तसेच ग्रामस्थ सूर्यकांत मठकर, सतीश चोडणकर, वृंदा केरकर, कांचन चांदेलकर व इतर ग्रामस्थांनी सांगितली.
थिवी मतदारसंघातील आठ पंचायतीपैकी थिवी पंचायत क्षेत्रात सुरळीत पाणीपुरवठा केला जातो. तर कोलवाळ पंचायत क्षेत्रातील रामनगर या प्रभागात गेल्या १ वर्षापासून दिवसातून हवे तसे पाणी येत नाही. म्हापसा पाणीपुरवठा कार्यालयावर ज्यावेळी मोचां नेण्यात आला होता, त्यावेळी अभियंते बेळगावकर यांनी सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल किंवा टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जाईल असे आश्‍वासन दिले होते. परंतु अधुनमधून कधीतरी एखादा टँकर पाठवला जात होता. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशी संताप व्यक्त करीत आहेत.
या मतदारसंघातून नीळकंठ हळर्णकर यांनी आमदार असताना ही टाकी बांधली पण ती उद्घाटनाविनाच ठेवली. नंतर किरण कांदोळकर थिवीतून आमदार म्हणून आले पण, त्यांनीही येथील टाकीकडे योग्यरित्या लक्ष पुरविले नाही त्यामुळे लोकांचे हाल झालेले आहेत.
स्थानिक पंच सदस्या शीतल चोडणकर यांनी सांगितले की, या पाण्याच्या टाकीसाठी लागणारा मोटरपंप सार्वजनिक बांधकाम खात्याकडून घेतला व इतर कामे करून घेतली. फक्त पाणी बसविण्याचे पाईप त्यांनी बसविले नाहीत. त्यामुळे पाणी मुख्य टाकीतून मुख्य टाकीत जात नाही. ते जाण्यासाठी त्वरित पाईप घालवे अशी मागणीही चोडणकर यांनी केली.
म्हापसा पाणीपुरवठा कार्यालयातील लाईनमन बस्त्यांव यांना या भागात रूजू करून १८ वर्षे झाली. त्यांची इतरत्र बदली करण्यात आलेली नाही. येत्या चार दिवसात जर पाणीपुरवठा सुरळीतपणे केला गेला नाही तर म्हापसा पाणीपुरवठा कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात येईल असा इशारा देण्यात आला. तसेच सध्याचे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनीही यात लक्ष द्यावे आणि टाकीचे लवकर उद्घाटन करावे अशी मागणीही करण्यात आली.