कोलंबियाने सामना तर भारताने मने जिंकली

0
104

जुआन पेनालोसाने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर कोलंबियाने भारताचा २-१ असा पराभव करीत फिफा अंडर-१७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शानदार विजयासह बाद फेरीसाठीचे आपले आव्हान जिवंत राखले. सलग दुसर्‍या पराभवामुळे भारतीय संघाचे आव्हान स्पर्धेतून संपुष्टात आले आहे. असे असले तरी या सामन्यात भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय स्तराचा खेळ करीत तमाम भारतवासिकयांची मने मात्र निश्‍चितच जिंकली. पहिल्या सामन्यात युवा भारताला अमेरिकेकडून ३ -० असे पराभूत व्हावे लागले होते. दिल्लीच्या पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात पहिल्या सत्रात भारतीय संघाने आकर्षक खेळ करताना कोलंबियाला गोलशून्य बरोबरीत रोखण्यात यश मिळविले होते. या सत्रात भारतीय खेळाडूंनी काही धोकादायक चाली रचत गोलसंधीही मिळविल्या होत्या. परंतु त्यांनी त्या वाया घालविल्या. १५व्या मिनिटाला अभिजीत सरकारने आघाडीची संधी घालविली. निनथोईंगाम्बा आणि बोरिस सिंग यांच्या यांच्या संयुक्त चालीवर अभिजीत सरकारला केवळ समोर असलेल्या कोलंबियन गोलरक्षकाला चकविता आले नाही. पहिल्या सामन्याप्रमाणे दुसर्‍या सामन्यातही गोलरक्षक धीरज मोईरांगथेमने काही चांगले बचाव केले. विंगर कांपाजने घेतलेला जोरकस फटका धीरजने सुरेखपणे झेपावत कॉर्नरसाठी पाठविला. त्यानंतर ४२व्या मिनिटाला कांपाजचा आणखी एक प्रयत्न धीरजने हाणून पाडला. ४५व्या मिनिटाला भारताने आघाडीची सूवर्णसंधी गमावली. परंतु डी कक्षेत बोरिस सिंगकडून मिळालेल्या अचूक पासवर राहुल केन्नोलीने घेतलेला जोरकस फटका कोलंबियाच्या गोपोस्टच्या डाव्या खांबावर आदळून बाहेर गेला. या सत्रात भारतीय बचावफळीनेही चांगली कामगिरी करीत कोलंबियन खेळाडूंना रोखून ठेवण्यात यश मिळविले. दुसर्‍या सत्रात कोलंबियाने आक्रमक खेळावर भर दिला होता. या सत्राच्या प्रारंभीच ४८व्या मिनिटाला त्यांनी आघाडी घेतली. जुआन पेनालोसाने डी कक्षेबाहेरून जोरकर फटक्याद्वारे भारताच्या गोलपोस्टची जाळी भेदत कोलंबियाला १-० अशा आघाडीवर नेले. भारतीय संघानेही अंतिम १५ मिनिटांत कोलंबियाच्या तोडीस तोड खेळ केला. त्यात त्यांना ८२ व्या मिनिटाला बरोबरी साधण्यात यश आले. जॅकसनने हेडरद्वारे जरबदस्त गोल नोेंदवित भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. जॅकसन सिंगचा हा गोल ऐतिहासिक ठरला. त्याने नोंदविलेला हा गोल विश्वचषकातील भारताचा पहिला व एकमेव गोल ठरला. परंतु त्यांचा हा आनंद काही क्षणापुरतीच टिकला. कारण लगेच ८३व्या मिनिटाला जुआन पेनालोसाने स्वतःचा व कोलंबियाच्या विजयावर २-१ असा शिक्कामोर्तब करणारा दुसरा गोल नोंदविला. या विजयामुळे कोलंबियाचे २ सामन्यांतून ३ गुण झाले आहे. आता त्यांचा पुढील सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यात मोठ्या गोलफरकाने विजय मिळविल्यास आणि भारताने घानाला बरोबरीत रोखल्या किंवा पराभूत केल्यास त्यांनी बाद फेरीत प्रवेश मिळणार आहे. भारताचे सलग दोन पराभवांमुळे मात्र आव्हान संपुष्टात आले आहे.

पॅराग्वे अंतिम सोळात
न्यूझीलंडवर ४-२ अशी मात करीत पॅराग्वेने फिफा अंडर -१७ विश्वचषक स्पर्धेत ‘ब ’ गटातून अंतिम सोळा संघात आपले स्थान निश्‍चित केले. डीव्हाय पाटील स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात ऍलन रॉड्रिगीज २र्‍याच मिनिटाला गोल नोंदवित पॅराग्वेला आघाडीवर नेले. परंतु आलेक्स डुआर्तेने २०व्या आणि ३४व्या मिनिटाला नोंदविलेल्या दोन स्वयं गोलांमुळे पहिल्या सत्रात न्यूझीलंडने २-१ अशी आघाडी मिळविली होती. दुसर्‍या सत्रात पॅराग्वेने आक्रमक खेळ करीत ३ गोलांची नोंेद केली. ऍनिबल वेगाने ७५व्या मिनिटाला पॅराग्वेला २-२ अशी बरोबरी साधून दिली. तर लगेच ७८व्या मिनिटाला आणखी एक गोल नोंदवित संघाला ३-१ अशा आघाडीवर नेले. इंज्युरी वेळेत (९०+१ मिनिटाला) ब्लास आर्मोआने गोल नोंदवित पॅराग्वेला पूर्ण गुण प्राप्त करून दिले.