कोरोना अपडेट्स

0
164

अफवांवर विश्वास ठेवू नका : विश्वजीत

एका राष्ट्रीय वाहिनेने आज गोव्यात कोरोनाचे ३३ रुग्ण सापडल्याची अतिरंजित बातमी दिल्याने राज्यात एकच खळबळ माजली. मात्र,आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यानी त्यासंबंधीचा खुलासा करताना आतापर्यंत राज्यात केवळ तीनच रुग्ण सापडले असून लोकानी अफवांवर विश्वास ठेऊन नये असे आवाहन केले आहे.

सर्वांना पगार मिळेल: लोबो

या आणीबाणीच्या प्रसंगी खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर उपासमारीची पाळी येऊ नये यासाठी सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण महिन्यांचा पगार द्यावा अशी सूचना सरकार खासगी कंपन्यांना करणार आहे. सरकारने तसा निर्णय घेतला असल्याचे बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यानी काल सांगितले.

दिगंबर कामत यांचे आवाहन –

राज्यातील जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यांच्या बाबतीत राज्य सरकारला पूर्ण अपयश आलेले असून त्यामुळे राज्यपाल सत्यपाल मलीक यानी आता यात लक्ष घालून मुख्यमंत्री प्रमोद सावंत याना आवश्यक त्या सूचना कराव्यात अशी मागणी आपण त्यांच्याकडे केली असल्याचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी काल सांगितले. राज्य सरकारला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यांच्याबाबतीत पूर्ण अपयश आले असल्याचा आरोप त्यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना केला. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभी करण्यात राज्य सरकारला पूर्ण अपयश आल्याचा आरोपही त्यांनी केला.

केंद्रीय मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण : विश्वजीत

राज्यात कोरोनाचे तीन रुग्ण सापडल्यामुळे आम्ही कोणताही धोका पत्करू इच्छित नसून केद्राने कोरोनावर आळा घालण्यांसाठी जी मार्गदर्शक तत्वे घालून दिलेली आहेत त्याची अमलबजावणी केली जात असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यानी काल स्पष्ट केले. कोरानाच्या तपासणीसाठीची प्रयोगशाळा येता एक दोन दिवसात सुरू होण्याची शक्यता त्यानी व्यक्त केली.