कोरोनाचे नवे १९६ रुग्ण

0
142

>> चिंबलमधील युवकाचा मृत्यू

>> बळींची संख्या २३

राज्यात कोरोना विषाणूच्या २३ व्या बळीची नोंद काल झाली आहे. चिंबल – पणजी येथील एका २९ वर्षीय युवकाचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये निधन झाले आहे. दरम्यान, नवीन १९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून राज्यातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या १४६९ झाली आहे. तर १४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत.

चिंबलमधील या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला मूत्रपिंड तसेच इतर आरोग्याच्या समस्या भेडसावत होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. चिंबल येथील कोरोना बळीची संख्या आता २ झाली आहे. मुरगाव तालुक्यात कोरोनाचे १४ बळी गेले आहेत. तर मोर्ले – सत्तरी, फातोर्डा, ताळगाव, कुडतरी, साखळी, काणकोण, मडगाव येथील प्रत्येकी एकाचे कोरोना विषाणूने निधन झाले आहे.

राज्यात आत्तापर्यंत ३८५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील २३६१ रुग्ण बरे झाले आहेत. जीएमसीच्या कोरोना खास वॉर्डात ३४ कोरोना संशयितांना दाखल करण्यात आले आहे. कोविड प्रयोगशाळेतील ४२८७ नमुन्यांपैकी १७०२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून २५८५ नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत.

पणजी, म्हापशात रुग्णांत वाढ
राजधानी पणजी शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नवीन ५ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या २३ झाली आहे. म्हापशात नवीन ११ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ५१ झाली आहे.

साखळी, पेडण्यात नवीन रुग्ण
साखळीत नवीन १८ रुग्ण आढळून आले असून रुग्णांची संख्या ७२ झाली आहे. पेडणे येथे नवीन ३ रुग्ण आढळून आले असून रुग्ण संख्या २१ झाली आहे.

वास्को, कुठ्ठाळीत रुग्णांत वाढ
वास्को येथे नवीन २१ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ३१५ झाली आहे. कुठ्ठाळी येथे नवीन १४ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ३६९ झाली आहे.

मडगाव, काणकोणात नवीन रुग्ण
मडगाव येथे नवीन ७ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ४७ झाली आहे. काणकोण येथे नवीन २ रुग्ण आढळून आले आहेत. कासावली येथे नवीन २ रुग्ण आढळले आहेत. चिंचिणी येथे आणखी १ रुग्ण आढळला आहे. कुडतरी येथे नवीन ५ रुग्ण आढळून आले आहेत. लोटली येथे नवीन २ रुग्ण आढळले आहेत.

फोंडा, धारबांदोड्यात नवे रुग्ण
फोंडा येथे नवीन २ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ४७ झाली आहे. धारबांदोडा येथे नवीन १ रुग्ण आढळला आहे.

आणखी दोन पोलीस पॉझिटिव्ह
मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बंगल्यावर कार्यरत असलेले आणखी २ पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानावरील पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचार्‍यांना कोविड चाचणी करण्याची सूचना करण्यात आली होती. पोलीस कर्मचार्‍यांची कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयात एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

पर्वरी, कांदोळी, कोलवाळात नवे रुग्ण
पर्वरी येथे नवीन २ रुग्ण आढळून आले असून रुग्ण संख्या २६ झाली आहे. कोलवाळ येथे नवीन ४ रुग्ण आढळले आहेत. तर कांदोळी येथे नवीन २ रुग्ण आढळले आहेत.

रेडकर इस्पितळात कोविड लसची चाचणी सुरू

भारत बायोटेक इंटरनॅशनल कंपनीने तयार केलेल्या कोविड – १९ लसवरील चाचणीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी ओशेलबाग, धारगळ येथील रेडकर इस्पितळाची निवड करण्यात आली होती. काल २० रोजी या इस्पितळामध्ये एकूण ७ जणांवर चाचणी करण्यात आली. डॉ. सागर रेडकर यांच्याकडे संपर्क साधला असता, लस इस्पितळामध्ये उपलब्ध झाली आणि एकूण ७ जणांवर ही चाचणी काल केली, अशी माहिती. १८ ते ५५ वर्षांच्या नागरिकांनी ७७७५०२६७७७ या नंबरवर संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.