कोरोनाची मगरमिठी, नवे ५०६ रुग्ण

0
157

>> राज्यात २४ तासांत तिघांचा मृत्यू

>> नऊ दिवसांत २७९९ बाधित तर ३० बळी

राज्यात कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. रविवारी नवे ५०६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ऑगस्ट महिन्यात सुरुवातीच्या नऊ दिवसांत नवे २७९९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून या काळात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. याच काळात बांबोळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील खास वॉर्डात ५१२ कोरोना संशयितांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात काल सापडेले नवे ५०६ बाधित हा उच्चांक आहे. यापूर्वी ५ ऑगस्टला जास्तीत जास्त नवे ३४८ रुग्ण आढळले होते. दरम्यान, काल आणखी एकाचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या ७३ झाली आहे.

राज्यात जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असून रुग्णांचे मृत्यूप्रमाणही वाढले आहे. इस्पितळामध्ये रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्याचबरोबर आता, इस्पितळाबाहेर रुग्णांच्या मृत्यूच्या घटना घडू लागल्या आहेत.
राज्यात जून महिन्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होते. जुलै महिन्यापासून रुग्णाच्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली. आता, ऑगस्ट महिन्यात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या नऊ दिवसांत ८३६ रुग्ण आढळून आले होते. तर, ऑगस्ट महिन्यात याच काळात २,७९९ रुग्ण आढळले आहे.

नऊ दिवसांत ३० जणांचे निधन
राज्यात मागील नऊ दिवसांत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांचे गोमेकॉप्रमोच कोविड इस्पितळामध्येही मृत्यू होत आहेत. तसेच, इस्पितळाबाहेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे प्रकार उजेडात येत आहेत. म्हापसा येथे अशा २ मृत्यू प्रकरणांची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये १९ जणांचे निधन झाले आहे. बांबोळी येथे जीएमसीमध्ये उपचार सुरू असताना ९ कोविड रुग्णांचे निधन झाले आहे.

संशयितांच्या संख्येत वाढ
बांबोळी येथे जीएमसीच्या खास कोरोना वॉर्डात कोरोना संशयित रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या महिन्यात दरदिवशी पन्नासपेक्षा जास्त रुग्णांना दाखल केले जात आहेत. आत्तापर्यंत ५९३ जणांना दाखल करण्यात आले आहेत. कोरोना संशयित म्हणून २१६६ जणांवर उपचार करण्यात आले आहेत.

राज्यात १ लाख ४८ हजार १२४ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली असून त्यात ८२०६ स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरोग्य खात्याने १ लाख ४९ हजार ३०४ स्वॅबचे नमुने गोळा केले आहे.

पणजीत नवे ७ रुग्ण
दरम्यान, पणजी परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. नवे ७ रुग्ण आढळून आले आहेत. मिरामार येथील एका माध्यमिक विद्यालयाचा सुरक्षा रक्षक कोरोना बाधित आढळला आहे. पणजीत कोरोना रुग्णसंख्या शंभराजवळ येऊन ठेपली आहे.

कंटेनमेंट झोन मागे
दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी मुरगाव तालुक्यातील सडा, बायणा येथील कंटेनमेंट झोन, मायक्रो कंटेनमेंट झोन, बफर मागे घेतले असून सासष्टी तालुक्यात कुडतरी येथील कंटेनमेंट झोन मागे घेतला आहे. यासंबंधीचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांकडून जारी करण्यात आला आहे.

आणखी तिघांचा मृत्यू
राज्यात आणखी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या ७५ झाली आहे. चोडण येथील ५० वर्षीय पुरुष रुग्णाचे कोविड इस्पितळात निधन झाले. नवेवाडा वास्को येथील ८४ वर्षीय महिला रुग्णाचे कोविड इस्पितळामध्ये निधन झाले. तसेच, बरभाट ताळगाव ७७ वर्षीय पुरुष रुग्णाचे गोमेकॉत निधन झाले आहे. गोमेकॉच्या प्रयोगशाळेत २२९४ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. ११८० स्वॅबचे नमुने चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत ८७१२ कोरोना बाधित असून सध्याचे रुग्ण २६४२ आहेत. तर कोरोनामुक्त ५९९५ रुग्ण झाले असून राज्यात कोरोनामुळे एकूण मृत्यू ७५ झाले आहेत.

दुसरे कोविड इस्पितळ फोंड्यात ः विश्‍वजित

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन काल राज्य सरकारने फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात राज्यातील दुसरे कोविड इस्पितळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर पुढील १० दिवसांत मडगाव येथील नवे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सुरू करण्यात आल्यानंतर हॉस्पिसियो इस्पितळ इमारतीतही कोविड रुग्णांसाठीची सोय करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याशिवाय गोमेकॉतही कोरोना रुग्णांसाठी हाय डिपेन्डसी युनिट सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात कोविड इस्पितळ सुरू झाल्यानंतर कोविड रुग्णांसाठीच्या खाटांची संख्या ४४० एवढी होणार आहे. तर हॉस्पिसियो इस्पितळात कोविड रुग्णांसाठीची सोय करण्यात आल्यानंतर या खाटांची संख्या ६०० वर जाणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.

राज्यातील कोविडसाठीची साधनसुविधा व व्यवस्थापन यावर चर्चा करण्यासाठी आपण रविवारी तीन वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन केल्याचे राणे म्हणाले.

मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या पहिल्या बैठकीत फोंडा येथे नव्या कोविड इस्पितळाविषयी तसेच अन्य साधनसुविधा व एकूणच कोविड व्यवस्थापन यावर चर्चा झाली. दुसर्‍या बैठकीत आरोग्य खात्यातील व गोमेकॉतील डॉक्टर्स व अधिकारी वर्गाबरोबर राज्यातील कोविड स्थितीविषयी चर्चा व पुढील व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा झाली. तिसर्‍या बैठकीत राज्यातील नामवंत खासगी डॉक्टरांशी चर्चा झाली. या बैठकीत कोविड व्यवस्थापनाविषयी या तज्ज्ञ डॉक्टरांचे काय म्हणणे आहे हे समजून घेतानाच पुढील व्यवस्थापन कसे असावे याविषयी त्यांची मते जाणून घेतल्याचे राणे यांनी सांगितले.

ऍन्टीजेन चाचणी करणार
कोविडची चाचणी करण्यासाठी येणार्‍या सर्वांची यापुढे ऍन्टीजेन चाचणी करण्यात येणार आहे आणि ही चाचणी करून अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर आवश्यक ते उपचार केले जाणार असल्याची माहितीही आरोग्य मंत्र्यानी दिली.

३१ जणांचे प्लाझ्मा दान
राज्यात आतापर्यंत ३१ जणांनी प्लाझ्मा दान केले असून १० रुग्णांवर प्लाझ्मा उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी ७ रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ३ रुग्णांची स्थिती मात्र बदलली नसल्याचे राणे म्हणाले. कोरोना मुक्त झालेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करताना राणे यांनी, एक रुग्ण १५ दिवसानंतर पुन्हा एकदा प्लाझ्मा दान करू शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली.

२३ डॉक्टर्स तर १८
परिचारिकांना कोरोना
गोमेकॉतील २३ डॉक्टर्स तर १८ परिचारिकांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेला असून त्यापैकी १२ जण यापूर्वीच कोरोना मुक्त झाल्याचे राणे यांनी नमूद केले.

आणीबाणी असेल तरच
इस्पितळात यावे
पुढील दोन महिने आरोग्याबाबतीत अगदी आणीबाणीसारखी स्थिती असेल तरच लोकांनी इस्पितळात यावे. लहान सहान दुखणी असतील तर इस्पितळाच्या पायर्‍या चढू नका असा सल्लाही राणे यांनी यावेळी दिला. तसेच राज्यातील लोकांनी पुढील ४५ ते ६० दिवस अगदीच गरज असेल तरच घरातून बाहेर पडावे. अन्यथा घरी राहणेच पसंत करावे, अशी सूचना केली.