कोमुनिदादींच्या जमीन व्यवहारांची सरकार सखोल चौकशी करणार

0
88

राज्यातील सर्व कोमुनिदादच्या जमीन व्यवहारांची चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत बोलताना काल दिली. दक्षता खात्याशी संबंधित एका प्रश्‍नावरील चर्चेच्या वेळी रोहन खंवटे यांनी उपस्थित केलेल्या सेरुला कोमुनिदादमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणावर बोलताना सावंत यांनी वरील माहिती दिली.

सेरूला कोमुनिदादमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणी योग्य चौकशी केली जाणार आहे. संबंधित अधिकार्‍याविरोधात कारवाईसाठी खातेनिहाय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोमुनिदादच्या जमीन व्यवहाराच्या सर्वच प्रकरणांची चौकशी केली जाणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

सेरूला कोमुनिदादच्या ३३ हजार चौरस मीटर जमीन घोटाळा प्रकरणी महसूल खात्याने संबंधित मामलेदाराला निलंबित केले आहे. परंतु या प्रकरणात गुंतलेल्या आणखी एका अधिकार्‍यावर अद्यापपर्यत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सदर प्रकरण आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी उघडकीस आणलेले आहे, असे खंवटे यांनी सांगितले. सेरूला कोमुनिदाद जमीन गैरव्यवहार प्रकरणी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.

दक्षता खात्यात
कर्मचार्‍यांची कमतरता
दक्षता खात्यामध्ये कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने विविध प्रकरणांच्या चौकशीला विलंब होत असल्याची कबुली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार ग्लेन टिकलो यांच्या एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. सरकारी अधिकार्‍यांच्या विरोधातील ३६० प्रकरणे निकालात काढण्यात आली असून ११७५ प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच अधिकार्‍याविरोधात ६० प्रकरणांची चौकशी सुरू आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि क आणि ड क्षेणीतील कर्मचार्‍याची वेगवेगळ्या पातळीवर चौकशी केली जाते. वरिष्ठ अधिकार्‍याच्या चौकशीसाठी चौकशी अधिकारी व इतर सोपस्कार पूर्ण करावे लागतात. तर क आणि ड वर्गातील कर्मचार्‍याची चौकशी संबंधित खात्याकडून करून घेतली जाते. काही खात्यांमध्ये कर्मचारी एकामेकाच्या विरोधात सूडबुद्धीने तक्रारी करतात. सरकारी कर्मचार्‍यामध्ये योग्य वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.