कोणाला हटवायचे त्याचा निर्णय तुम्हीच घ्या : मोदी

0
122

बसपा आणि सपा आज एका सुरात ‘मोदी हटाओ’चा नारा देत आहेत. मात्र मी ‘काला धन हटाओ, भ्रष्टाचार हटाओ’चा नारा देत आहे. अशावेळी कोणाला हटवायचे याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. अशी भावनिक साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल येथील विशाल परिवर्तन रॅलीत आपल्या समर्थकांना घातली. देशाच्या विकासासाठी उत्तर प्रदेशचा विकास होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

वरीलप्रमाणे साद घालताना मोदी यांनी देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या त्यावेळच्या शैलीचा वापर केला. ‘ते इंदिरा हटाओ म्हणतात, मी गरिबी हटाओ’ म्हणतेय. आता निर्णय तुम्ही घ्यायचाच’ असे इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या.
एक पक्ष गेल्या १५ वर्षांपासून मुलाला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. मात्र त्यांची डाळ शिजत नाही तर दुसर्‍या पक्षाला पैसा कोठे ठेवायचा याची चिंता आहे. तर एक पक्ष कुटुंब वाचविण्याच्या चिंतेत आहे. असे असताना आता उत्तर प्रदेशला वाचविण्यासाठी भाजप आला आहे असे सांगून मोदी यांनी सपावर शरसंधान केले.
नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर गरिबांसाठी योजना जाहीर केल्या आहेत. गरिबांचे शोषण रोखण्यासाठी ही लढाई आहे. भ्रष्टाचार, काळ्या पैशाच्या जोखडातून देश मुक्त करण्यासाठी ही लढाई सुरूच राहील असे ते म्हणाले.