कोणतेही आव्हान मोडून काढण्यास सज्ज ः रावत

0
118

>> पाक सैनिकांच्या हालचालींवर प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेलगत सुरक्षेबाबातच्या कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी व चौख प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराची सर्वतोपरी सुसज्जता आहे अशी प्रतिक्रिया लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल व्यक्त केली. प्रत्येक देश आपल्या सुरक्षेसाठी सावधगिरीच्या उपाययोजना करत असतो. त्यामुळे सीमेपलीकडून पाकिस्तान आपल्या सैनिकांची जमावजमव करीत असला तरी भारताला चिंता करण्याची गरज नाही असे रावत म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून येथील आंतरराष्ट्रीय सीमेलगत पाकिस्तान आपल्या सैनिकांच्या संख्येत वाढ करीत आहे ही सर्वसामान्य बाब आहे असे रावत एका कार्यक्रमावेळी बोलताना म्हणाले. पत्रकारांनी त्यांना पाकच्या सैनिकांच्या हालचालींसंदर्भात विचारले होते. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकला हालचालींना गती द्यायची असेल तर त्यांची मर्जी. भारतीय लष्कराने कोणत्याही आव्हानाला मोडून काढण्याची तयारी ठेवली आहे, असे रावत म्हणाले. पाकच्या सर्व हालचालींवर भारताचे लष्करी अधिकारी करडी नजर ठेवून आहेत. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दरम्यान सूत्रांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानकडून काश्मीर खोर्‍यात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. आयईडी स्फोट, फिदायीन हल्ले यासह हिंसाचारही घडवून आणला जाऊ शकतो.