कोकण रेल्वे मार्गाचे १०,४५० कोटी खर्चून दुपदरीकरण

0
160

कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार असून १०,४५० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राज्यसभेत दिली. गोव्याचे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी सदर विषयावर त्यांना प्रश्‍न केला होता.

गोव्याबरोबरच कोकणच्या विकासात मोठे योगदान असलेल्या कोकण रेल्वेच्या आधुनिकीकरणावर रेल्वेमंत्री श्री. प्रभू यांनी खास लक्ष केंद्रित केले आहे. २०१५-१६ अर्थसंकल्पात कोकण रेल्वेच्या विकासासाठी ७५६.५ कोटी निधीची त्यांनी तरतूद केली होती. कोकण रेल्वेचा कायापालट करण्यासाठी संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे ७२० कोटी खर्च करण्यात येणार असल्याची माहितीही रेल्वे मंत्र्यांनी खासदार नाईक यांना यापूर्वी राज्यसभेत दिली होती. कोकण रेल्वे महामंडळाला कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचा आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिला आहे.
७४० कि. मी. मार्गाचे दुपदरीकरण
कोकण रेल्वेच्या ७४० कि. मी. मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी कसा उभारावा तसेच प्रकल्प पूर्ण करण्याच्या वेळेविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. या मार्गाचे दुपदरीकरण झाल्यानंतर अतिरिक्त रेलसेवा देण्यास मदत होणार असून गोवा देशाच्या इतर भागाशी जोडणार्‍या सुविधेत मोठी प्रगती होणार असल्याचे रेल्वेमंत्री श्री. प्रभू यांनी सांगितले.
लोंढा – वास्को दुपदरीकरण सुरू
लोंढा – वास्को दरम्यानच्या मार्गाचे दुपदरीकरण सुरू करण्यात आले आहे. हॉस्पेट – तिनईघाट – वास्को मार्ग दुपदरीकरण प्रकल्पाअंतर्गत हे काम सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी खासदार श्री. नाईक यांच्या अन्य एका प्रश्‍नावर राज्यसभेत दिली. या दुपदरीकरण प्रकल्पासाठी अंदाजे २,१२७ कोटी रुपये खर्च येणार असून ३१ मार्च, २०२५ पर्यंत ३२१ कोटी खर्च करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली.
लोंढा – तिनईघाट रेलमार्ग ११.५२ कि. मी. असून या मार्गावरील जमीन व पुलांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तिनईघाट – कॅसलरॉक आणि कुळे – वास्कोपर्यंत दुपदरीकरण मार्ग सर्वेनंतर निश्‍चित करण्यात आला आहे. कॅसलरॉक – कुळे मार्ग निश्‍चित करण्यासाठी सर्वेचे काम सुरू असल्याची माहिती
रेल्वेमंत्र्यांनी दिली.