कोकणी नाट्यप्रेमी ‘महेश नायक’

0
289

– शब्दांकन ः नीला भोजराज

काही व्यक्ती या निश्‍चितपणे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करण्यासाठी धडपडत असतात. त्यामध्ये त्यांना एकप्रकारचा आनंद तर मिळत असतोच, पण समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं याचं पुरेपूर भान असल्यामुळेच ते त्यांचं कार्य निःस्वार्थपणे पुढे नेत असतात. शांतिनेज, पणजी येथे राहणारे श्रीयुत् महेश चंद्रकांत नायक हेसुद्धा याच पठडीतले. कोकणी भाषा शिकण्याची तसेच तीच आपली मातृभाषा आहे… हे गोवेकरांना पटवून देण्यासाठी त्यांनी कोकणी नाटकं लिहिलीत, स्वतःच प्रकाशित करून त्यांचे असंख्य प्रयोगही सादर केलेत आणि त्यात अभिनय सुद्धा ते करतात. जाणून घेऊ या त्यांच्या या नाट्यप्रवासाबद्दल…

लिहिण्याची आवड

श्री. महेश चंद्रकांत नायक हे पणजी निवासी! लहानपणी गोव्यातील देवस्थानांमध्ये विशेषतः रामपुरुष देवस्थान, पणजी येथे ते कोकणी नाटकं पाहत असत. लिहिण्याची आवड त्यांना होतीच. ते पाहात असतानाच त्यांना कोंकणी भाषेत नाटक लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि १९९८ साली त्यांनी ‘ऍक्शन’ हे त्यांचं पहिलं नाटक लिहिलं. अर्थातच ते प्रकाशित करण्याआधीच त्यांनी त्याचे २५ प्रयोग सादर केलेत. तेव्हा त्यांना असे वाटले की नाटकांचे प्रयोग करून चालणार नाही तर ते जर पुस्तक रुपाने आले तर गोवेकरांच्या अनेक पिढ्यांना त्याचा उपयोग होईल. म्हणून त्यांनी ते स्वतःच्या ‘अक्षरब्रह्म’ या प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रकाशित केले. आजपर्यंत त्या नाटकाचे ५०० प्रयोग झाल्याची नोंद आहे.

कोंकणी भाषेवरील प्रेम

नाटकांची आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी काही मराठी नाटकांमधूनही अभिनय केला- वेडा वृंदावन, तू आई आहेस का?, झोपा आता गुपचूप, तीन दिवाने इ. मराठी नाटकात अभिनय करताना त्यांना असे वाटले की कोकणी भाषेवर अन्याय होतो आहे. आमचा गोवा, आमची भूमी, आमची माणसं आणि मग भाषा आमची का बरे नाही? असा प्रश्‍न त्यांच्या मनात आला आणि कोकणीतच नाटकं व्हायला पाहिजे असे त्यांना जाणवले. कोंकणीभाषेविषयी त्यांना मनात प्रेम उत्पन्न झाले. लहानपणापासून आमच्या जिभेवर जी भाषा आहे तीच आमची मातृभाषा आणि त्या भाषेचे ऋण आम्ही फेडायलाच हवे, असे त्यांना वाटले. आमच्या गोवेकरांच्या भाषेला आम्ही गोवेकरांनीच वर आणले पाहिजे, तसेच कोंकणीतही चांगली नाटकं होऊ शकतात, हे दाखवण्याची वेळ आता आली असे त्यांना वाटले आणि त्यांचे पहिले नाटक जन्माला आले.
त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. एका पाठोपाठ एक कोकणी नाटकं त्यांनी लिहिली. ती सादर करण्यासाठी लोकांना मदतही गेली. त्यासाठी त्यांनी एकही पैसा घेतला नाही. अशा तर्‍हेने महेश चंद्रकांत नायक हे नाव गावागावांत परिचयाचे झाले. कॉमेडी कोकणी नाटक म्हटले की पहिले नाव महेश यांचेच! गोव्यातील अशी एकही संस्था किंवा देवळाचा नाट्यमंडप नसेल ज्यामध्ये महेश नायकांचे कोकणी नाटक सादर झाले नाही. मुख्य म्हणजे त्यांची खासियत ही की त्यांनी त्यांच्या नाटकांचे व्यवसायीकरण केले नाही. कुठल्याच संस्थेला त्यांनी व्यवसाय म्हणून नाटक लिहून दिले नाही. त्यांना असे वाटले की प्रत्येक नाट्य कलाकाराच्या हातात कोकणी नाटकाचे पुस्तक असायला हवे. असे झाले तरच कोंकणी नाटक त्यांच्या हृदयात घर करेल आणि प्रत्येक गावात नाट्य कलाकार जन्माला येतील.
गोव्यात गावोगावी कोंकणी नाटक पोहचवण्यामध्ये महेश यांचाच हात आहे. वर्ष सुरू झाले की एक नजर फिरवली तर असे दिसून येते की दर दोन देवळं सोडून महेश यांच्या नाटकाची तालीम सुरू असते.
प्रथम त्यांच्या नाटकांमध्ये सगळी पुरुष पात्रेच असायची. कारण त्यावेळी स्त्रिपात्रासाठी त्यांना कुणी कलाकारच मिळत नसे. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी नंतरची नाटके खास महिलांसाठीच लिहिली. त्यात सगळ्या स्त्रीपात्रांच्या भूमिका आहेत. गोव्यातील महिलांना नाटकाची गोडी लागावी यासाठी त्यांनी ही खटपट केली. अशा प्रकारे त्यांची नाटकं महिला मंडळांनीही उचलून धरली. ज्या ठिकाणी दोन नाटकं सादर होतात त्या ठिकाणी दुसरे नाटक हे महिलांचे असतेच. खास महिलांसाठी आजपर्यंत महेश यांनी सहा नाटकं लिहिली.
वर्षभरात त्यांची दोन तरी नाटकं प्रकाशित होतात. त्यांना तसे करावेच लागते. कारण वर्ष सुरू झाल्याबरोबर नवीन नाटकाबद्दल विचारण्यासाठी त्यांच्याकडे कलाकारांच्या भेटीगाठी सुरू होतात. याच कारणामुळे त्यांना बाराही महिने लेखणी हातात घ्यावीच लागते. नाटकांसाठी विषय निवडताना त्यांना गोव्यातील वृत्तपत्रे तसेच दूरदर्शन यांची मदत होते.
एवढे करूनही त्यांना समाधान झाले नाही म्हणून त्यांनी गोव्यातील लहान मुलांमध्ये कोकणी साहित्याची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांना लिहिण्यास उद्युक्त करण्यासाठी त्यांनी ‘अक्षरफुलां’ हा बाल दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा परिपाठ सुरू केला. त्यासाठी गोव्यातील शाळांना भेटी देणे, तेथील विद्यार्थ्यांकडून साहित्य निर्माण करून घेणे यांसारखे उद्योग ते आवडीने करतात.
उजेडात आलेली त्यांची कोकणी नाटकांची यादी फार मोठी आहे – आमी. ना कमी, आय हेट यू, अठरा जून, आटक माटक बायलां नाटक, आयले बांयत शिव, ऍक्शन, ऑल फॉर यू… इत्यादी. काही नाटकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. तसेच नाटकुले, एकपात्री प्रयोग, कविता, कथा अशी भरगच्च साहित्य संपदा त्यांनी गोवेकरांना उपलब्ध करून दिलेली आहे.
आजपर्यंत त्यांचे अनेक नाट्यसंस्थांच्या तर्फे सत्कार झालेले आहेत. शिवाय २०१५ सालचा कोंकणी कला साहित्य केंद्राचा नाटक पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.
कोंकणी भाषेची एकप्रकारे मनःपूर्वक सेवाच त्यांनी केलेली आहे, आणि तीही समर्पित भावनेने! कुटुंबाचा पूर्वीचा दूध विकण्याचा धंदा सोडून त्यांनी नाटकांकडे आपला मोर्चा वळवताना एक गंमतीची गोष्ट ते सांगतात ती ही की पहिले कोकणी नाटक त्यांनी त्यांच्या घरच्या म्हशी शेतात चरायला नेत त्यावेळी लिहिले. अशा या नाट्यलेखक, कलाकार, समाजसेवकाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!!