कोकणात भगव्याचीच लाट!

0
123

– लाडोजी परब
दिवाळीआधीच विधानसभेच्या निकालाचे फटाके फुटले. महाराष्ट्रात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी कोकणात मात्र शिवसेनेची पाठराखण मतदारांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, तसेच त्यांचे अन्य मंत्रिगण कोकणात ठाण मांडून होते. मात्र त्यांचा करिष्मा कोकणी जनतेवर झालेला दिसत नाही. कोकणातील तब्बल सात जागा शिवसेनेने स्वत:कडे खेचून आणल्या. भाजपची ताकद कोकणात कमी पडली. विशेष म्हणजे भाजपचे येथे संघटन नाही. नारायण राणे यांचा पराभव, नीतेश राणे यांचा राजकारणात प्रवेश, वैभव नाईक, दीपक केसरकर यांचा विजय यातून कोकणातील राजकारण एका नव्या समीकरणाकडे झुकत आहेे. त्यावर विकासाच्या भिंती आणि समृद्धीचा कळस हे लोकप्रतिनिधी कसा चढवितात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
महाराष्ट्रातील सर्वांत धक्कादायक निकाल हा कोकणात पाहावयास मिळाला. राज्यभर आणि विशेषत: कोकणात मोदींनी सभा घेऊन मतपरिवर्तन केले असले तरीही कोकणातील मतदारांनी धनुष्यबाण खाली ठेवला नाही. नारायण राणेंनी गेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाने योग्य तो बोध घेतला नाही.
नीलेश राणे हरल्यानंतरही राणे यांची बेताल वक्तव्ये सुरूच होती. विकासात्मक ध्येयधोरणांचा स्वीकार करण्याऐवजी प्रचारादरम्यान एकमेकांवर कुरघोडीशिवाय त्यांनी काहीही केले नाही. त्यामुळेच या निवडणुकीत सेनेच्या वैभव नाईक यांनी त्यांचा १० हजार मताधिक्क्यांने पराभव केला.
१९९० पासून २०१४ पर्यंत सलग २५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राजकीयदृष्ट्या वर्चस्व गाजविणार्‍या राणे यांना विजयापासून नाईक यांनी रोखल्याने आता त्यांचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात आल्यात जमा आहे. त्यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सार्‍यांचे लक्ष आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची ताकद देवगड तालुक्यापुरतीच आहे. त्यामुळेच गेल्या वेळी प्रमोद जठार हे शिवसेनेच्या पाठबळावर निवडून आले होते.
यावेळी स्वतंत्र लढत असल्याने कॉंग्रेसला संधी मिळाली. नीतेश राणे यांनी तब्बल २५ हजार ९७९ मतांनी प्रमोद जठार यांचा पराभव केला. येथे भाजपलाही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. गेल्या निवडणुकीत केवळ ३४ मतांनी जठार निवडून आले होते. कणकवली मतदारसंघात पंचरंगी लढत झाली. त्यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष यांच्यामध्ये मतविभागणी झाली. त्यामुळे राणेंविरोधात एकवटणारे सर्व दुभंगले गेल्याने त्याचा फायदा कॉंग्रेसला झाला.
निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून सेनेत गेलेले रत्नागिरीचे उदय सामंत यांना शिवसेनेमुळे विजय मिळाला. गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी आपले वर्चस्व कायम राखले. येथे आठपैकी सहा ठिकाणी भाजप उमेदवार तिसर्‍या स्थानावर राहिले.
सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांनी सर्व उमेदवारांना धूळ चारत तब्बल ४१ हजार १९२ मताधिक्क्याने विजय संपादन केला. त्यामुळे ९ वर्षांनंतर सिंधुदुर्गात पुन्हा भगवा फडकल्याचा आनंद शिवसैनिकांच्या चेहर्‍यावर दिसतो आहे. सावंतवाडी मतदारसंघात केसरकर यांना रोखण्यासाठी सुरेश दळवी, राजन तेली, परशुराम उपरकर यांनी कसून प्रयत्न चालविले होते, मात्र ते फोल ठरले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कासार्डे येथे सभा होऊनदेखील भाजपचे एकमेव आमदार असलेल्या प्रमोद जठार यांचा पराभव झाल्याने सिंधुदुर्गात मोदी लाटेचा कोणताही प्रभाव दिसला नाहीे. मतदारसंघ एकत्रित असताना युतीची राजवट वगळता देवगड मतदारसंघ कायमच विरोधी पक्षात राहिला होता. या निवडणुकीतदेखील कणकवली मतदारसंघ पर्यायाने देवगड तालुका कॉंग्रेसच्या रूपाने विरोधी पक्षात राहणार आहे. मात्र नारायण राणे यांना विरोध म्हणून कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघाने शिवसेनेच्या पदरी चांगले यश टाकले आहे.
दीपक केसरकरांनी स्वच्छ चारित्र्य व नम्रतेच्या जोरावर आपली वेगळी प्रतिमा या मतदारसंघात निर्माण केली. केसरकर यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर या मतदारसंघात सेनेची ताकद वाढली, परंतु सेनेच्या भगव्या झेंड्याखाली काम करणार्‍या कार्यकर्त्यांची फौज केसरकरांना मिळाली. त्यांचे काही सहकारी सोडून गेले असताना सेनेचे कार्यकर्ते जोमाने प्रचारात उतरले आणि सेनेची पारंपरिक मतेही त्यांनी मिळवली. त्यामुळे या भगव्या झेंड्याखाली आता सिंधुदुर्गचा विकास कोणत्या पद्धतीने होतो, हे पाहावे लागेल.
गेल्या काही वर्षांत सत्ता असूनही, शिवाय मंत्रिपद असूनही सिंधुदुर्गात रोजगाराभिमुख एकही उद्योग आला नाही. पर्यटन विकासाचे केवळ गाजर दाखविण्यात आले. शासकीय योजनांचा बट्ट्याबोळ झाला. अशा परिस्थितीत वैभव नाईक किंवा दीपक केसरकर यांची विकासाची भूमिका कशी राहणार आहे, शिवाय नारायण राणे यांच्या पराभवानंतर ते संघटना वाढविणार की, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीही वार्‍यावर सोडणार हे पाहणे गरजेचे आहे. आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांवरही येथे भगवा फडकविण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. कारण वर्षभरातच या निवडणुका येथे होणार आहेत.
एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या आधी राणे विरूद्ध केसरकर या संघर्षाला येथे पूर्णविराम मिळाला असला तरीही यापुढे दहशतवादाचा मुद्दा चालणार नाही. लोकांना विकासाची स्वप्ने दाखविणार्‍या कॉंग्रेसला मतदारांनी नाकारल्यानंतर सेनेकडून अधिक आशा – आकांक्षा लोक बाळगून आहेत. तुम्ही दिवाळी साजरी करा, पण विकासाचे गोड पोहे आपापल्या मतदारसंघातील जनतेला द्या, अशाच काहीशा लोकांच्या भावना कोकणातील या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींकडून आहेत.