कोकणचे स्वर्गसुख

0
417
  •  माधुरी रं. शे. उसगावकर
    (फोंडा)

साहित्यिकांची वास्तु, इथल्या खाडी, अथांग सागर, वास्तुशास्त्राचं मूर्तिमंत उदाहरण बनलेली आणि मनाला प्रसन्नता देणारी छान छान मंदिरं, इथले उत्सव, चालिरीती म्हणजे माणसाची बुद्धी, कलाकौशल्य आणि निसर्गातील सौंदर्य यांच्या संगमातून साकारलेली प्रतिसृष्टीच!

वाचक सल्लागार समिती-फोंडा तालुक्याची साहित्यिक सहल यंदा दि. ११ व १२ जाने. रोजी राजापूर तालुक्यातील ‘कशेळी’ या गावी निघाली. समितीचे आठ सभासद आणि आमच्या ‘विंगर’ जीप वाहनाचा सारथी मिळून नऊ जणांचा प्रवास. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास, श्री गणेशाच्या जयघोषात फोंडा बसस्टॉप पेट्रोल पंपच्या ठिकाणाहून सहलीचा शुभारंभ झाला. सकाळच्या शीतल, प्रसन्न वातावरणात मनही सुरातालावर डोलू लागलं. सूर्योदयाच्या केशरी-पिवळ्या छटांमुळे आकाश सुंदर दिसत होतं. धावत्या गाडीतून सुर्योदयाच्या वेळेचे नभाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. प्रतिभेला मोहर फुटलासे. नकळत बालपणीची कविता ओठांवर आली- देवा तुझे किती सुंदर आकाश…
एरवी निसर्गाच्या दृश्याने माझे मन मोहवून जात नव्हते; पण आज निसर्गाने माझ्या मनावा भुरळ घातली. खरोखर निसर्गाच्या सान्निध्यात गेलं म्हणजे निसर्ग आपल्याशी कसा हितगुज करतो, आपल्याला आकृष्ट करतो याची मला साक्षात प्रचीती आली.
एकेक गाव, शहर पार करत आमची सफेद शुभ्र ‘विंगर’ काळ्या नागमोडी वळणांतून धावत होती. झाडे, माळरानाच्या लोभसवाण्या दृश्यात मन निसर्गसुख अनुभवत होतं. आमचा सारथी व्यक्तिमत्वाने प्रसन्न पण मितभाषी होता. कदाचित आमचं मराठीत बोलणं साहित्यावर, साहित्यिकांवर, प्रेक्षणीय स्थळांवर चालू होतं, कदाचित मराठी बोलताना त्याला अवघडल्यासारखे वाटत असावे. त्याची बोली भाषा अस्सल कोकणी होती. आमचे असे लेखक- वाचक मंडळ. आमच्या गप्पांना अधुनमधून ऊत यायचा. तो मध्ये गप्पात सहभागी होण्याचा प्रयत्न करायचा. आमच्यातल्या काही त्याच्या कलाप्रमाणे घ्यायच्या. हळुहळू तोपण मराठीत बोलू लागला. अस्खलित नसेना का- ‘जैसा संग वैसा रंग’ असं म्हणतात तसंच अगदी. प्रवासात रथाच्या सारथीची साथ व सहकार्य असणे अत्यंत जरुरीचे. त्यामुळे रथयात्रा सुखकर होण्यात त्याचा मोलाचा वाटा असतो.

दुपारी १२ वा.च्या सुमारास ‘कशेळी’ गावात पोहोचलो. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यापासून ३० कि.मी.च्या अंतरावर कशेळी हे गाव आहे. तीन-साडे तीन हजार लोकांची वस्ती असलेला हा चिमुकला गाव. कोकणातल्या इतर गावांप्रमाणेच या गावालाही निसर्गाचे वरदान लाभलेले आहे, कशेळी गावातील कनकादित्य मंदिर हे प्रसिद्ध व सर्वांत मोठे देवालय आहे. देवळाजवळ असलेल्या भक्तनिवासात आमची राहण्याची सोय केलेली. आम्ही हातपाय धुवून मंदिरात श्री देव कनकादित्याची दर्शनभेट घेतली. सुर्यदेवाची पाषाणी मूर्ती कोरीव व सुबक आहे. देवालयातील कारागिरी लक्षवेधी होती. देवळातील व देवालयाच्या आवारातील साफसफाई नियमावलीप्रमाणे अतिशय उत्तम होती. नियमावलीची पाटी प्रवेशद्वारावर लावली होती. देवालयाच्या समितीच्या पदाधिकार्‍याने आम्हाला श्रींच्या मदिरासंबंधीची उपयुक्त माहिती पुरवली.
श्री कनकादित्याची पूजा ८०० वर्षांपासून होत आहे, असे सांगितले गेले. या गावात असलेल्या एका सुर्यभक्त गणिकेला दृष्टांत झाला. त्यावरून मूर्तीची कशेळी गावात स्थापना केली व पुढे मंदिर बांधण्यात आले, अशीही याविषयीची आख्यायिका आहे. कनकादित्य हे जागृत देवस्थान आहे, असा इथल्या भाविक लोकांचा समज आहे. श्री देव कनकादित्य भक्तांची मनोकामना पूर्ण करतो असा भक्तांचा अनुभव आहे.
या देवळाला प्रशस्त सभामंडप आहे. मंदिरात दर वर्षी रथसप्तमी ते एकादशीपर्यंत उत्सव साजरा केला जातो. चालू वर्षी रथसप्तमी उत्सव शनिवार १ तारखेला आहे. हे सूर्यदेवाचे मंदिर असल्याने सूर्यास्त होताच मंदिराचा दरवाजा बंद केला जातो.
याच मंदिराच्या सुंदर रंगरंगोटी केलेल्या सभागृहात आम्ही सायंकाळी सामूहिक रीत्या स्तोत्रपठण, आठवणीतल्या आवडत्या कवितांचे सादरीकरण केले. यामुळे बालस्मृतींना उजाळा मिळाला. ज्येष्ठ नागरिक असूनही स्मृतींची कवाडे खडान्‌खडा उघडत गेली. बालपणीची पाठांतर स्मृती जागृतीची अनुभूतीच अनोखी होती.

याच सभामंडपात आम्हाला त्र्यं. शेजवलकर, वि.स. गुर्जर या नामवंत कसलेल्या साहित्यिकांची माहिती पुरवली. साहित्यिक त्र्यं. शेजवलकरांची जुनीपुराणी वास्तू पाहण्याचे भाग्य लाभले. त्या प्रशस्त घरातील तत्कालीन फर्निचरची व्यवस्थित निगा घेतल्याचे आढळून आले. घरासमोर हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुलझाडांचे संवर्धन केल्याचे बघण्यास मिळाले. लेखकाच्या साहित्यकृतींवर चर्चाही यावेळी करण्यात आली.
कशेळी गावाला समुद्रकिनारा लाभला आहे. किनार्‍यालगतच्या डोंगरावरून सूर्याचे दर्शन घेणे म्हणजे जणु प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यात राहून सूर्यदेवाचे तेज डोळ्यात साठवत तृप्त होणे. या समुद्र किनार्‍यावरचा सूर्यास्त निसर्गाचे रूप अधिकच मोहमय बनवतो. इथल्या समुद्रकिनार्‍यावर सूर्यास्त पाहताना क्षितिजावरच्या विविध छटा, निळा सावळा अथांग लहरता समुद्र पाहताना भान हरपून जाते. क्षणाक्षणाला लाल-पिवळा सूर्यगोल क्षितिजाखाली येत लुप्त झाला. हे दृश्य मनःपटलावर टिपता टिपता नकळत काव्यपंक्ती आठवल्या-
पहा पाखरे चरोनी होती झाडांवर गोळा,
कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा
असी ही प्रत्येक रसिकाला लुभावणारा सायंकाळचा सूर्यास्त. हा अविस्मरणीय आनंद मनःकुप्पीत साठवून भक्तनिवासात आले. रात्रीच्या सहभोजनानंतर लगेच खोल्या गाठल्या कारण पहाटे लवकर उठायचे होते.

दुसर्‍या दिवशी प्रातःकाळी उठून दिनक्रम आटोपून ठीक सात वाजता श्री कनकादित्याचे निरोप दर्शन घेऊन अलीकडच्या श्री महाकाली मंदिराकडे प्रयाण केले.
श्री महाकाली देवस्थान हे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यापासून ३० कि.मी. अंतरावर आडिवरे या गावी आहे. हे गाव चौदा वाड्यांचे बनले आहे. श्री महाकाली देवी तिथीनुसार सर्व चौदा वाडे फिरते. हे मंदिर पंचायतन असून त्यात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, रवळनाथ व नगरेश्‍वर यांचा समावेश आहे. या देव-देवतांचे विलोभनीय दर्शन घडले. खरोखर असे दर्शन घडणे म्हणजे भाग्याची पर्वणीच! अथांग सागर, इथली मंदिरे, उत्सव चालिरीती परंपरा यांचा रंगच न्यारा!!
दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यास निघालो. मालवणच्या धक्क्यावरून सिंधुदुर्गात जाण्यास होडीची सोय आहे. मोटर बसवलेल्या मोठ्या होडीतून जलपर्यटन करताना काहींनी निसर्गरम्य वातावरणातील सुंदर दृश्ये टिपून घेतली. लपलेल्या खडकांच्या मधून वाट काढीत होडी गडाच्या महाद्वारासमोरील लहानशा वाळूच्या धक्क्याला लागली. कसेबसे होडीतून धक्क्यावर उतरलो. थोड्याशा अंतरावरच एक महाद्वार लागलं. त्या महाद्वारातून किल्ल्यावर पोहोचलो. बुरूज व तट चक्रव्यूह पद्धतीने गडाचे महाद्वार बांधले आहे. शिवछत्रपतींच्या दुर्गबांधणीचे वैशिष्ट्य असणारा गोमुखी दरवाजा पाहण्यास मिळाला. बोटवाल्याने आम्हाला दुर्गदर्शनासाठी दीड तासांचा अवधी दिला होता. पण इतक्या अल्प वेळेत संपूर्ण सिंधुदुर्ग पाहणे होत नाही. तरी शक्य होईल ते आम्ही दृष्टोत्पत्तीत घातले. तटाच्या पायथ्याशी श्री भवानी देवीचे मंदिर आहे. श्री भवानी देवीचे दर्शन घेतले. किनार्‍याच्या उतरणीवर दाड हिरवी झाडी आहे. हे पर्यटन स्थळ असल्याने देवळाच्या बाजूला, गडावर जाताना वेगवेगळ्या वस्तूंचे, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. त्यामुळे गडावर पर्यटकांची चांगली सोय होते. समुद्राच्या काठावर वसलेला हा सिंधुदुर्ग पर्यटकांसाठी निसर्गरम्य स्थळ व तटबंदी पाहणारे असे सुरेख स्थान आहे. कोकणातील नैसर्गिक खजिन्याचा आनंद लुटायचा तर प्रत्यक्ष कोकणातच जावे.

पुढे नंतर आम्ही वेंगुर्ल्यात ‘भटवाडी’ या गावी आलो. वेंगुर्ला हे ऐतिहासिक व पूर्वीच्या व्यापार-उद्योगांनी गजबजलेले शहर. किनारपट्टीवरील नारळाची झाडे सौंदर्यात आणखी भर घालतात. भटवाडी या गावी वा.स. समितीच्या ज्येष्ठ मुख्य सल्लागारांच्या व्याह्याचे घर आहे. प्रशस्त अशा जुन्या घरात आधुनिकीकरण करून सर्व सुविधा केलेल्या पाहिल्या, तसेच ‘कुळागर’ व फुलझाडे यांचे संवर्धन केले आहे. त्या घरातील दोघंही माणसे फार प्रेमळ होती. तिथं आम्ही फ्रेश होऊन अल्पोपहार व लज्जतदार वाफाळलेला चहाबरोबर वाडीबद्दल माहिती घेतली. घराजवळच्या मंदिरातील श्री गणेशजींचे दर्शन घेतले. आमचं उत्तम आदरातिथ्य केलं. निसर्गात, मंदिरात जसे आकर्षण असते तसेच विविध ठिकाणी माणसांच्या स्वभावातील कंगोरेही उलगडतात. व्याही-विहीणबाईंच्या निरोप घेत परतीच्या प्रवासास निघालो. प्रवासात कविता, अंत्याक्षरी बर्‍याच रंगात येत होत्या, त्यामुळे प्रवासाचा श्रमपरिहार झाला. मन ताजेतवाने राहिले.

साहित्यिकांची वास्तू, इथल्या खाडी, अथांग सागर, वास्तुशास्त्राचं मूर्तिमंत उदाहरण बनलेली आणि मनाला प्रसन्नता देणारी छान छान मंदिरं, इथले उत्सव, चालिरीती म्हणजे माणसाची बुद्धी, कलाकौशल्य आणि निसर्गातील सौंदर्य यांच्या संगमातून साकारलेली प्रतिसृष्टीच! असा हा कोकण आपलं लक्ष वेधून घेतो. ही नंदनवने म्हणजे नागरिकांना मिळालेली अपूर्व देणगीच!