कॉंग्रेस सत्तेवर आल्यास गोव्याला विशेष राज्य दर्जा

0
66

>> कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला

गोव्यात कॉंग्रेस सरकार सत्तेवर आले तर राज्याला विशेष दर्जा मिळवून देण्यात येईल. ‘वुई शाईन’ हे कॉंग्रेस पक्षाचे यावेळचे घोषवाक्य असून पारदर्शक प्रशासन, गोव्याचे सबलीकरण, जबाबदार सरकार याचे आम्ही गोव्यातील जनतेला वचन देतो, असे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे माध्यम प्रमुख रणदीप सिंह सुरजेवाला यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
कॉंग्रेस सरकार सत्तेवर आल्यास २०१२ पूर्वी राज्यात जे पाण्याचे व विजेचे दर होते त्याच दरात जनतेला पाणी व वीज देणार असल्याचे ते म्हणाले.
रोजगार, चांगली आरोग्य सेवा, स्वच्छ पर्यटन याची हमी देतानाच मांडवीतील तरंगते कॅसिनो बंद पाडण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
रोजगाराच्याबाबतीत केंद्रातील मोदी सरकारने व गोव्यातील भाजप सरकारने जनतेची ङ्गसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. गोवा सरकारने ५० हजार कोटी रु. ची गुंतवणूक व २५ हजार नोकर्‍यांचे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र युवकांना रोजगार देण्याच्याबाबतीत दोन्ही सरकारांना अपयशच आल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप सरकारने गोव्यातील युवकांना बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्‍वासन दिले होते. पण त्यात त्यांना अपयशच आल्याचा ते म्हणाले.
खाण घोटाळा
चौकशी नाही
मनोहर पर्रीकर यांनी विरोधी पक्ष नेता असताना गोव्यात ३५ हजार कोटींचा खाण घोटाळा झाल्याचा आरोप केला होता असे सांगून या घोटाळ्यातील लोकांना तुरुंगात टाकण्याचा व घोटाळ्यातील पैसे परत मिळवण्याचे जे आश्‍वासन त्यांनी दिले होते त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी केला.
मॉविन, मडकईकरांना मिठी
भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्याचे अभिवचन देऊन सत्तेवर आलेल्या मनोहर पर्रीकर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मॉविन गुदिन्हो व पांडुरंग मडकईकर यांना मिठी मारून त्यांना भाजपात प्रवेश कसा दिला असा प्रश्‍नही सुरजेवाला यांनी केला.
कॉंग्रेस पक्षाने सत्तेवर असताना जो प्रादेशिक आराखडा २०२१ साली तयार केला होता त्याला भाजप सरकारने विरोध केला होता. आता तोच आराखडा अधिसूचित करण्यात येणार असल्याचे पर्रीकर सांगत असल्याचे ते म्हणाले.
पर्रीकर विशेष दर्जा
मिळवून देऊ शकतात
पर्रीकर हे केंद्रातील तिसर्‍या क्रमांकाचे मंत्री आहेत. त्यानी मनावर घेतले तर ते मोदी यांना सांगून गोव्याला विशेष दर्जा मिळवून देऊ शकतात, असे सांगून त्यासाठी ते का प्रयत्न करीत नाहीत असा प्रश्‍नही सुरजेवाल यांनी केला.
गोव्यातील पाच नद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा जो केंद्राने निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला कॉंग्रेसचा विरोध असल्याचे ते म्हणाले.