कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांसमोर अनेक आव्हाने!

0
118
  • देवेश कु. कडकडे
    (डिचोली)

कॉंग्रेस सत्तेवर असला तर नेते खुर्चीसाठी भांडतात. पराभूत झाला तर पराभवाचे खापर एकमेकांवर फोडतात. सत्तेसाठी गुंजन करणार्‍या आणि मधाच्या आशेने इकडे तिकडे फिरणार्‍या भुंग्यांना जोपर्यंत लोक पूर्णपणे ओळखत आहेत, तोपर्यंत पक्ष बळकट होणे शक्य नाही.

गिरीश चोडणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड ही कॉंग्रेसच्या पारंपरिक रणनीतीला छेद देणारी आहे. या पदासाठी अनेकांनी प्रयत्न चालवले होते, कारण याने वारंवार दिल्लीच्या वार्‍या करता येतात. पक्षश्रेष्ठींशी संपर्क ठेवता येतो. निवडणुकांच्या काळात कधी नव्हे इतके या पदाला महत्त्व येते. कोणाला तिकिटे देणे आणि कोणाचा पत्ता कापणे अशावेळी पक्षाध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरते. एका समाजाच्या प्रबळ नेत्याला या खुर्चीवर बसवणे हे कॉंग्रेसचे धोरण होते. पडेल आमदार, खासदारांना त्यांच्या राजकारणात पुनर्वसन करण्यासाठी या पदाचा वापर करण्याची परंपरा कॉंग्रेसह आता सर्वच पक्षांत रुढ झाली आहे. सच्चा, निष्ठावंत कार्यकर्ता याला कॉंग्रेस पक्षात कधीही काडीचीही किंमत नव्हती, कार्यकर्ता हा निवडणुकांपुरता राब राब राबणारा असतो. म्हणूनच चोडणकरांसारख्या कट्टर कॉंग्रेसवादी, तळागाळातून वर आलेल्या कार्यकर्त्याला हा बहुमान मिळणे हे महत्त्वाचे आहे.

गिरीश चोडणकरांनी २००२ साली दिगंबर कामत यांच्या विरुद्ध निवडणूक लढविली होती. त्या अपयशानंतर त्यांनी निवडणूक लढविण्यात स्वारस्थ दाखवले नाही, परंतु निष्ठेने पक्षाचे कार्य करीत राहिले. २०१७ साली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढण्यासाठी अनेकांनी आपल्या तलवारी म्यान केल्यानंतर अगदी अखेरच्या घटकेला चोडणकर स्वतःहून पुढे आले आणि कडवी लढत दिली आणि त्यावेळी पराभवातही त्यांच्या नावाची आणि हिंमतीची सर्व थरांतून चर्चा झाली. त्याचवेळी राजकीय निरीक्षकांनी चोडणकर यांना पक्षात सर्वोच्च पद मिळेल असे अंदाज बांधले, कारण एकेकदा दिमाखदार पराभवातही राजकारणाची दिशा बदलण्याचे संकेत मिळत असतात.

कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफूस ही एका मुद्द्यावर अगदी टोकापर्यंतही धुसफूसत असते. कॉंग्रेसच्या बहुसंख्य आमदारांचा चोडणकरांना पाठिंबा नव्हता, कारण लुईझिन फालेरो आणि त्यांनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे निवडणुकीत गोवा फॉरवर्ड बरोबर होणारी युती फिसकटली आणि कॉंग्रेस सरकार स्थापन झाले नाही. विजय सरदेसाई आणि गिरीश चोडणकर यांच्या ‘मधुर’ संबंधांविषयी चर्चा फातोर्डा आणि फातोर्ड्याबाहेरही चर्चेचा विषय आहे.

राहुल गांधींनी सध्या पक्षात युवा नेत्यांना वाव देण्यासाठी काही राज्यांत युवा नेत्यांना प्रदेशाध्यक्षपदी बसवले आहे. सोबत जुन्या अनुभवी नेत्यांना घेऊन मोठे आव्हान पेलण्यासाठी कॉंग्रेसला आपला चेहरा मोहरा बदलणे भागच होते, कारण भाकरी फिरवली नाही तर करपते हे सूत्र राजकारण्यांना अंमलात आणावे लागते. एका बाजूला संपूर्ण देशात भाजप अधिकाधिक प्रबळ होत असताना आणि कॉंग्रेस क्षीण होत असताना आपल्या भक्कम भविष्यासाठी वेगळी वाट चोखाळणे अपरिहार्य होते. चोडणकरांची ही निवड झाल्याने, सुरुवातीला पोस्टर लावण्यापासून तळागाळात काम करणार्‍या सामान्य कार्यकर्त्यांचे पक्षात आपल्या मेहनतीचे चीज होते आणि पक्षात मोठ्या पदावर वर्णी लागते, अशा तर्‍हेची भावना पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे. सच्च्या कार्यकर्त्यांना ही संपूर्ण समाधान देणारी बाब आहे. म्हणूनच गोव्यातील कॉंग्रेसच्या इतिहासातील ही आगळी-वेगळी घटना आहे. अथक परिश्रम करून पक्षाला तारणारा कार्यकर्ता सध्या मागेच राहतो.

आधी पक्षात नेतृत्वाचा विकास हा टप्प्याटप्प्याने होत असे. सध्या पक्षात कृत्रिम नेतृत्वाची एक दुनिया तयार करीत असल्यामुळे तो निष्प्रभ ठरतो, कारण नेतृत्व प्रस्थापित करण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असते. अशा स्थितीत पक्षाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. आजच्या बदलत्या राजकारणाने सच्चा कार्यकर्ता हरवत चालला असून ही जागा राजकीय व्यवस्थेशी हितसंबंध असणार्‍या वेगवेगळ्या घटकांकडून घेतली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मताला महत्त्व राहिले नसून पक्ष कार्यकर्त्यांपेक्षा उद्योगपतींच्या पैशांवर चालतो, असे वातावरण निर्माण झाले आहे. आज कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुस्ती आली आहे. एक काळ असा होता, जेव्हा एकेका मतदारसंघात दहा-बाराजण तगडे कार्यकर्ते तिकिटासाठी उत्सुक असायचे. बंडखोरांना थंड करण्यासाठी पक्षश्रेष्ठी मेटाकुटीस येत. मी कॉंग्रेसचा कार्यकर्ता आहे, असे अभिमानाने सांगणारा आज दुर्मिळ झाला आहे. याला कारण पक्षातील घराणेशाही, राजेशाही आणि युक्तीवाद ही विचारधारा पक्षाला आणि लोकशाहीला घातक ठरत आहे. मगो पक्ष आणि भाजपा, कार्यकर्त्यांनी आपल्या घामातून आणि श्रमातून वाढवला. मगो आणि भाजपात पक्षांसाठी त्याग करणारे कार्यकर्ते आहेत. कॉंग्रेसमध्ये अशांची वानवा आहे. कडक इस्त्रीचे कपडे, डामडौल, बैठकांमध्ये तावातावाने बोलणे यापुरताच कार्यकर्त्यांचा वावर असतो. जनतेच्या आंदोलनात भाग घेत नाही. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जनआंदोलनाची जोड द्यावी लागते. विधानसभेत आमदारांनी आणि बाहेर कार्यकर्त्यांनी जनतेचे ज्वलंत प्रश्‍न वेशीवर टांगायचे असतात. पुढे सत्ता भोगायची असेल तर सुस्ती सोडून आपण विरोधी पक्षात असल्याचे वास्तव स्वीकार करावे लागेल. आज कॉंग्रेसची हक्काची अल्पसंख्यकांची मते गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाकडे वळताना दिसत आहेत. कॉंग्रेस पक्षात उच्च पातळीवर सामसुम आहे. अडचणीतून चाललेल्या गोव्याच्या राजकारणात सरकारला कोंडीत पकडण्यास नवीन अध्यक्ष कितपत यशस्वी होतात हे काळ ठरविणार आहे. चोडणकरांनी सर्व कॉंग्रेसवासीयांचे सहकार्य मागितले असले आणि ते त्यांना मिळावे अशी जरी निष्ठावंत कार्यकर्त्यांची कळकळ असली तरी पक्षातील गटबाजी, दगाबाजी, बेबंदशाही आणि नेत्यांचा स्वभाव, बौद्धिक पातळी, त्यांची जनहिताची ओढ हे सर्व पाहता नवीन पक्षाध्यक्षांना काळ कठीणच आहेे, कारण लुईझिन फालेरो विजनवासात आहेत. रवी नाईक, सुभाष शिरोडकर हे आता वयोमानानुसार निष्क्रिय झाले आहेत. विरोधी पक्षनेते कवळेकर आणि दिगंबर कामत हे नेते आरोपांत अडकले असून ते तुरुंगवास चुकविण्यासाठी धडपडत आहेत. आज पक्षातील सर्व नेत्यांनी स्वच्छ मनाने आणि एकजुटीने राहण्याची आवश्यकता आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॉंग्रेस पक्षाची खिल्ली उडवली जाते. कॉंग्रेसचा वर्तमान आणि भविष्यकाळ भकास आणि डळमळीत झाल्याचे चित्र आहे. कॉंग्रेस सत्तेवर असला तर नेते खुर्चीसाठी भांडतात. पराभूत झाला तर पराभवाचे खापर एकमेकांवर फोडतात. सत्तेसाठी गुंजन करणार्‍या आणि मधाच्या आशेने इकडे तिकडे फिरणार्‍या भुंग्यांना जोपर्यंत लोक पूर्णपणे ओळखत आहेत, तोपर्यंत पक्ष बळकट होणे शक्य नाही. सौहार्दाची होळी झाली तरी चालेल, आपली पोळी भाजली पाहिजे या विचाराने आजचे राजकारण कधी नव्हे इतके ग्रासले आहे. गोव्याच्या मुक्तीलढ्यात वावरलेल्या नेत्यांनी केवळ धनवान गोव्याचे नव्हे, तर एका सुसंस्कृत, प्रगल्भ गोमंतकाचे स्वप्न पाहिले होते. देवभूमीचे रुपांतर आता भोगभूमीत झाले आहे. खाणबंदी, प्रादेशिक आराखडा या किचकट समस्यांबरोबर बेकारी, महागाई आणि इतर अनेक संकटांशी सामना करणार्‍या जनतेला दिलासा आणि मदत करण्याचे काम नेत्यांनी केले तर पक्षाला पुढे जनतेच्या मनात स्थान मिळेल. नवीन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून हा भार उचलून पक्षाच्या व्यापक हिताचा विचार व्हावा.