कॉंग्रेस पक्षात कार्यकर्त्यांना मान मिळतो का?

0
97

>> भाजपचा गिरीश चोडणकरांना प्रतिटोला

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसंबंधी केलेले आरोप दिशाभूल करणारे आहेत. भाजप आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा योग्य मान राखत आहे. कॉंग्रेस पक्षात कार्यकर्त्यांचा किती मान राखला जाते हे तपासण्याबरोबरच कॉंग्रेस पक्षाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी चोडणकर यांनी प्रयत्न करावेत असा प्रतिहल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल केला.

भाजपच्या केडर कार्यकर्त्यांचा सरकारमधील काही मंत्र्यांकडून योग्य मान राखला जात नाही, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी बुधवारी केला होता. या आरोपाला प्रतिउत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर म्हणाले की, भाजप आपल्या कार्यकर्त्यांचा योग्य मान राखत आहे. भाजपचे कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षसंघटन मजबूत आहे. कॉंग्रेस पक्षात कार्यकर्त्यांचा किती मान राखला जातो याची आम्हांला जाणीव आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे प्रथम लक्ष द्यावे. तसेच पक्षाला आलेल्या मरगळीकडे लक्ष द्यावे, असा सल्ला तेंडुलकर यांनी दिला.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. भाजपची कोअर समिती या विषयी मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार आहे, असे तेंडुलकर यांनी एका प्रश्‍नावर बोलताना स्पष्ट केले. यावेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांची उपस्थिती होती.