कॉंग्रेस आमदार-कार्यकर्त्यांचा एफडीए संचालक सरदेसाईंना घेराव

0
97

कॉंग्रेस पक्षाचे आमदार आणि कार्यकर्त्यांनी काल बांबोळी येथील अन्न व औषध संचालनालयाच्या संचालक ज्योती सरदेसाई यांना घेराव घालून मडगावातील घाऊक मासळी मार्केटमधील मासळीतील फॉर्मेलीन प्रकरणी प्रश्‍नांचा भडिमार करून भंडावून सोडले.

कॉंग्रेस पक्षाच्यावतीने एफडीएच्या संचालकांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे. मडगाव घाऊक बाजारातील मासळीच्या तपासणीमध्ये आढळलेल्या ङ्गॉर्मेलीनबाबत खुलासा करावा, अशी मागणी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, सांताक्रुझचे आमदार ऍन्थोनी फर्नांडिस, आमदार फिलीप नेरी रॉड्रीगीस, आमदार क्लाफासियो डायस, आमदार विल्फेड डिसा, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, संकल्प आमोणकर, प्रसाद आमोणकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
१२ जुलै रोजी पहाटे एफडीएच्या अधिकार्‍यांनी मडगाव येथील घाऊक मासळी मार्केटमध्ये परराज्यातील मासळी घेऊन आलेल्या १७ ट्रकांतील मासळीचे नमुने घेतले. प्राथमिक तपासणीमध्ये मासळीमध्ये फॉर्मेलीन असल्याचे आढळून आल्याचे एफडीएच्या अधिकार्‍यांनी जाहीर केले. तथापि, मासळीमध्ये फॉर्मेलीनचे प्रमाण मर्यादित असल्याचे संध्याकाळी जाहीर केल्याने खळबळ उडाली.

घेरावाच्या वेळी संचालक सरदेसाई यांनी सांगितले की, काही घटकांत नैसर्गिकरीत्या ङ्गॉर्मेलीन असतेच. ते मर्यादित स्वरूपात असते. मासळीच्या तपासणीमध्ये ङ्गॉर्मेलीन आढळले असे सांगितले जाते, तो प्राथमिक अहवाल होता. प्रयोगशाळेत त्यावर अंतिम तपासणी करण्यात आली. मासळी सुरक्षित असल्यामुळे अडविलेल्या ट्रकांमधील मासळीची नंतर विक्री करण्यास मान्यता देण्यात आली, अशी माहिती संचालक सरदेसाई यांनी दिली.

दरम्यान, ओल्ड गोवा पंचायतीचे तथा विद्यमान पंच सदस्य विशाल वळवईकर यांनी मडगाव येथे मासळी एजंटाकडून फॉर्मेलीन वापर प्रकरणी ओल्ड गोवा पोलीस स्टेशनवर तक्रार काल दाखल केली आहे.