कॉंग्रेसला धडा

0
122

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची वाताहत तर झालीच, परंतु कॉंग्रेसची जी काही फटफजिती झाली आहे ती काही और आहे. कॉंग्रेसच्या ६३ उमेदवारांची अनामत या निवडणुकीत जप्त झाली आहे आणि पक्षाच्या एकूण मतांची अंतिम टक्केवारी आहे अवघी ४.२६ टक्के. उमेदवाराला एकूण मतांच्या एक षष्ठमांशहून कमी मते मिळाली तरच अनामत जप्त होत असते. म्हणजे कॉंग्रेसच्या उमेदवारांना एक षष्ठमांश मते देखील मिळवता आलेली नाहीत. एकेकाळी दिल्लीवर निर्विवाद सत्ता गाजवत आलेल्या कॉंग्रेसची जी काही धूळधाण २०१३ च्या निवडणुकीपासून चालली आहे ती पक्षनेतृत्वासाठी आत्मचिंतन करायला लावणारीच नाही, तर लाजिरवाणी आहे. निवडणुकीत यश-अपयश येतच असते हे जरी खरे असले, तरी विधानसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये कॉंग्रेसची एवढी वाताहत का होते आहे याचा विचार कॉंग्रेस नेतृत्वाने गांभीर्याने करण्याची वेळ आलेली आहे. एकेकाळी शीला दीक्षित यांच्या रूपाने एक स्वच्छ, कार्यक्षम, प्रगल्भ चेहरा कॉंग्रेसला दिल्लीत लाभला होता. त्या जोरावर कॉंग्रेसने दिल्लीत सतत पंधरा वर्षे राज्य केले. परंतु २०१३ च्या निवडणुकीत जेव्हा आम आदमी पक्षाचा उदय राजकीय क्षितिजावर झाला तेव्हा सर्वाधिक जागा मिळवणार्‍या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दुसर्‍या क्रमांकाच्या जागा मिळवणार्‍या आम आदमी पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला. ‘आप’ची तेव्हा सत्ता तर आली, परंतु त्यातून कॉंग्रेसची पारंपरिक मतपेढी मात्र ढासळत गेली. २०१५ च्या निवडणुकीत कॉंग्रेसची धूळधाण झाली आणि आता २०२० मध्ये पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. २००३ मध्ये ज्या कॉंग्रेसपाशी दिल्लीत ४८ टक्के मते होती त्याची मतांची टक्केवारी २०१३ मध्ये २४.०६ टक्के, २०१५ मध्ये ९.७ टक्के आणि २०२० मध्ये ४.२६ टक्के एवढी खालावली आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र मतांच्या टक्केवारीत कॉंग्रेसची मते आम आदमी पक्षापेक्षाही जास्त होती. दिल्लीच्या लोकसभेच्या सातपैकी पाच जागांवर कॉंग्रेस दुसर्‍या जागी होती. मग विधानसभा निवडणुकीत एवढी वाताहत का? याचे कारण कॉंग्रेसने शीला दिक्षित यांच्या मृत्यूनंतर दिल्लीमध्ये स्थानिक नेतृत्वच घडू दिलेले नाही. लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर झाली, परंतु जेव्हा स्थानिक मुद्दे आणि स्थानिक नेतृत्वाचा प्रश्न आला तेव्हा कॉंग्रेसपाशी मतदारांना आकृष्ट करण्यासारखे काही नव्हते. ‘कॉंग्रेसवाली दिल्ली’ पुन्हा आणण्याचे आश्वासन पक्षाने दिले खरे, परंतु ती आणणार कोण हे मात्र सांगितले नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपल्या पक्षाने ‘टॅक्टीकल रीट्रिट’ स्वीकारल्याचा दावा जरी कॉंग्रेसजन करीत असले, तरी वास्तव काही वेगळेच सांगते आहे. कॉंग्रेसचे दिशाहीन केंद्रीय नेतृत्व या पराभवाला सर्वाधिक कारणीभूत आहे. आजवर जेथे जेथे कॉंग्रेसने चमकदार कामगिरी केली आहे, तेथे केंद्रीय नेतृत्वापेक्षा स्थानिक नेतृत्वाचेच योगदान त्यात मोठे राहिले आहे. दिल्लीमध्ये तर कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधींनी एकही सभा घेतली नव्हती. स्थानिक नेत्याचा अभाव आणि केंद्रीय नेतृत्वाकडून झालेली उपेक्षा यामुळे दिल्लीतील कॉंग्रेस उमेदवार वार्‍यावर सोडले गेले होते. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरविंदसिंग लवली व काही मोजक्या नेत्यांची अनामत या निवडणुकीत वाचू शकली, परंतु त्यामागे त्यांची वैयक्तिक कामगिरी होती. कॉंग्रेसची धुरा ज्यांच्यावर आहे, ते राहुल गांधी तर अजूनही पक्षाशी लपाछपीच खेळत राहिले आहेत. त्यांच्या लहरी कारभारामुळे नेते तोंडघशी पडत आहेत. नागरिकत्व कायदा दुरुस्ती संदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका अल्पसंख्यकांची मते कॉंग्रेसला मिळवून देईल अशी त्यांची अपेक्षा होती, परंतु दिल्लीचा निकाल पाहिल्यास असे दिसते की अल्पसंख्यकबहुल मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षालाच घवघवीत मतदान झाले आहे. कॉंग्रेसला मतदारांनी दूर सारले आहे. खुद्द शाहीन बाग आणि जामियॉंनगरचा भाग ज्या मतदारसंघात येतो, त्या ओखलामध्ये आम आदमी पक्षाचे अमानुल्ला खान सत्तर हजारांहून अधिक मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. दिल्लीतील बारा राखीव जागांमध्येही आम आदमी पक्षाचेच उमेदवार विजयी झाले आहेत. कॉंग्रेसची मतपेढी पक्षापासून दुरावते आहे आणि झालेल्या चुका सुधारल्या गेल्या नाहीत तर कॉंग्रेस एकेका राज्यांमध्ये नामशेष होत जाईल. खरे तर गेल्या काही निवडणुकांतून काही राज्यांमध्ये कॉंग्रेसला पुन्हा उभारी मिळेल असे निकाल आले. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सत्ताही आली. परंतु त्यामध्ये केंद्रीय नेतृत्वापेक्षा स्थानिक नेत्यांचेच योगदान मोठे राहिले. केंद्रीय पातळीवरून जी काही ऊर्जा पक्षाला मिळायला हवी होती ती मिळताना अजूनही दिसत नाही. सोनिया गांधी थकल्या आहेत. राहुल गांधींची अनिश्‍चितता काही संपत नाही. कॉंग्रेसमुक्त भारत भाजपमुळे नव्हे, तर स्वतःच्याच कर्माने होण्याची शक्यताच सद्यपरिस्थितीत अधिक दिसते आहे!