कॉंग्रेसने सरकार स्थापनेची दिवास्वप्ने विसरावी ः मुख्यमंत्री

0
112

गोव्यात पुढील विधानसभा निवडणुकीतही भाजपचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. २४ मे रोजी गोव्यात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, अशी दर्पोक्ती करणार्‍या बाबुश मोन्सेर्रात यांनी दिवास्वप्ने पाहू नयेत, असा खोचक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिला. घटक पक्ष असलेला गोवा फॉरवर्ड, अपक्ष आमदार असलेले रोहन खंवटे, गोविंद गावडे व प्रसाद गावकर यांचा सरकारला पूर्ण पाठिंबा आहे.

गोवा फॉरवर्डचे प्रमुख असलेले उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई हे विदेश दौर्‍यावर गेलेले आहेत. ते २६ रोजीच गोव्यात परतणार आहेत. अशा परिस्थितीत मोन्सेर्रात २४ रोजी कॉंग्रेसचे सरकार कसे स्थापन करणार आहेत ते कळत नसल्याचे सावंत म्हणाले. राज्यात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर नसताना निवडून आल्यास पणजीतील दर एका कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची भाषा मोन्सेर्रात कशी काय करू शकतात, असा सवालही त्यांनी यावेळी केला. राज्यात जेव्हा कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर होते तेव्हा त्यांनी ताळगाव व सांताक्रुझ मतदारसंघातील किती लोकांना नोकर्‍या दिल्या, ती आकडेवारीही त्यांनी जाहीर करावी, असे आव्हानही सावंत यांनी त्यांना दिले.

भाजप जिंकल्यास पर्रीकरांच्या आत्म्याला शांती
भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे ही निवडणूक जिंकले तर मनोहर पर्रीकर यांच्यासाठी ती एक श्रद्धांजली ठरेल. कुंकळ्येकर हे विजयी झाल्यास पर्रीकर यांच्या आत्म्याला शांती लाभेल, असे सावंत यांनी नमूद केले.