कॉंग्रेसतर्फे पणजीतून गिरीश, वाळपईतून रॉय

0
107

कॉंग्रेस पक्षातर्फे पणजीतून कॉंग्रेसचे अखिल भारतीय सचिव गिरीश चोडणकर व वाळपईतून कॉंग्रेसचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने दोन्ही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असल्याचे त्यांनी सांगितले. चोडणकर हे शुक्रवारी दुपारी ३ वाजता तर रॉय नाईक हे त्याच दिवशी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे ते म्हणाले.

या पार्श्‍वभूमीवर बुधवारी संध्याकाळी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाल्याचे सांगून दोन्ही उमेदवारांविषयी त्यांच्यात उत्साह दिसून आल्याचे ते म्हणाले.
मांडवी वाचवा हा मुख्य मुद्दा
पणजी पोटनिवडणुकीत मांडवी नदी वाचवा हा कॉंग्रेसचा प्रमुख मुद्दा असेल असे नाईक म्हणाले. मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो व राज्यातील दहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण हेही मुख्य मुद्दे असतील, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.
मांडवी नदीतील कॅसिनोंमुळे नदी प्रदूषित झालेली असून ती वाचवण्याची गरज असल्याचे नाईक यावेळी म्हणाले. नदीतील कॅसिनोमुळे जुगारालाही उत्तेजन मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील दहा नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला पर्रीकर सरकारने विरोध करायला हवा होता. तो न केल्यामुळे या नदांवरील व नद्यांभोवतालच्या जमिनीवरील सरकारचा हक्क नाहीसा झाला असल्याचे ते म्हणाले. पर्रीकर हे संरक्षण मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे यावेळी नाईक म्हणाले आणि म्हणूनच एवढे मोठे महत्त्वाचे संरक्षण मंत्रीपद सोडून ते गोव्यात बसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी उमेदवार गिरीश चोडणकर म्हणाले की, मांडवीतील कॅसिनोंमुळे अनेक गोमंतकीय जुगारी बनले आहेत. कॅसिनोंमुळे भाजप नेत्यांना प्रचंड पैसा मिळू लागलेला असून त्यांच्यासाठी हे कॅसिनो म्हणजे एटीएम मशिन्स बनली असल्याचे ते म्हणाले.
गोवा सुरक्षा मंचतर्फे आनंद शिरोडकर
दरम्यान, गोवा सुरक्षा मंचतर्फे पणजीतून पक्षाचे उमेदवार म्हणून पक्षाने आपले अध्यक्ष आनंद शिरोडकर यांचे नाव काल पत्रकार परिषदेतून जाहीर केले. त्यावेळी पक्षाने गोव्याचे मुख्यमंत्री व भाजपचे उमेदवार मनोहर पर्रीकर यांच्यावर जोरदार टीका केली.

पर्रीकराना लोकांनी का
निवडावे ते त्यांनी सांगावे
मनोहर पर्रीकर यांना पणजीतील जनतेने पुन्हा एकदा का निवडून द्यावे ते त्यांनी सांगावे, असेही चोडणकर यावेळी म्हणाले. मनोहर पर्रीकर हे काहीही कामे करीत नसतात व दर वेळी त्यांचा जाहीरनामाही तोच असतो, असेही त्यांनी सांगितले. कॉंग्रसेचे वाळपई मतदारसंघातले उमेदवार रॉय नाईक हे मात्र यावेळी हजर नव्हते.