कॉंग्रेसच्या सल्ल्याची गरज नाही

0
110

>> भाजप प्रदेशाध्यक्षांचे सडेतोड प्रत्युत्तर

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारपणामध्ये सरकारी कामकाजाकडे दुर्लक्ष करीत नाहीत. त्यामुळे सरकारी कामकाज हाताळण्याबाबत आम्हांला कॉंग्रेसच्या सल्ल्याची गरज नाही, असे चोख प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिले.

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या आजारपणामुळे सरकारी पातळीवर रखडणारे कामकाज हाताळण्यासाठी केअर टेकरची नियुक्ती करण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाने केली होती.
प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर म्हणाले की, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पर्रीकर सध्या काही दिवस घरातून सरकारी फाईल्स हाताळणार आहेत. मुख्यमंत्री चालू आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक सुध्दा घेणार आहेत. पर्रीकर यांच्या आजारपणामुळे सरकारी कामकाजात अडथळा येणार नाही. त्यामुळे पर्यायी कामकाज हाताळण्यासाठी केअर टेकरच्या नियुक्तीची गरज नाही, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.

पर्रीकर यांना गोमेकॉमधून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांची दोनापावल येथील निवासस्थानी भेट घेऊन सरकारी कामकाज व पक्षाच्या संघटनात्मक कामकाज, स्थापना दिन आदी विषयांवर चर्चा केली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांना सध्या जास्त लोकांत न मिसळण्याचा सल्ला देण्यात आला आहे त्यामुळे आगामी दहा – पंधरा दिवसांत मुख्यमंत्री पर्रीकर पूर्णपणे कामाला सुरुवात करतील, असा विश्‍वास तेंडुलकर यांनी व्यक्त केला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या म्हादई पाणी वाटप प्रश्‍न सोडविण्यासाठी एखाद्या योजनेबाबत काहीच माहिती नाही. तथापि, गोवा भाजपची म्हादईच्या प्रश्‍नावर भूमिका ठाम आहे, असा दावा प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी केला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांनी कर्नाटकातील प्रचार रॅलीमध्ये कर्नाटकात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास म्हादई प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे. गोवा भाजपच्या भूमिकेच्या विरुद्ध भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी भूमिका घेतली आहे. याबाबतच्या प्रश्‍नावर बोलताना प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर म्हणाले की, म्हादईचा प्रश्‍न लवादासमोर आहे. भाजपच्या प्रदेश समितीने भूमिका यापूर्वीच जाहीर केलेली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्याकडे पाणी वाटपावर तोडगा काढण्यासाठी काही उपाय असू शकतात असे ते म्हणाले.

उत्तर भारतीतील त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅण्ड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन करणारा ठराव संमत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात कर्नाटक राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार सत्तवर येईल, असा विश्‍वास तेंडुलकर यांनी व्यक्त केला.