कॉंग्रेसच्या भूमिकेवर सरदेसाईंची सावध टिप्पणी

0
93

डॉ. जॅक सिक्केरा यांचा पुतळा उभारण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासगी ठराव मांडण्याच्या कॉंग्रेस विधीमंडळाच्या निर्णयावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गोवा फॉरवर्डने विधानसभा संकुलात डॉ. जॅक सिक्केरा याचा पुतळा बसविण्याची मागणी केली आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत विधानसभा संकुलात आणखीन पुतळे बसविण्यास विरोध करण्यात आलेला आहे. आता कॉँग्रेस पक्षाने डॉ. सिक्केरा यांच्या पुतळ्याच्या विषयात उडी घेतली आहे.

कॉँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ गटाच्या पुतळा उभारण्याच्या खासगी ठराव मांडण्याच्या निर्णयाचे गुणवत्तेवर स्वागत केले जाऊ शकते. परंतु, कॉँग्रेस पक्षाने कित्येक वर्षे सत्तेत राहून गोव्यातील स्थानिक नेते आणि गोव्यातील समस्याबाबत घेतलेली उदासिनतेची भूमिका विसरून चालणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री सरदेसाई यांनी व्यक्त केली.

कॉँग्रेस पक्षाला आता गोंय आणि स्थानिक नेते यांची आता आठवण होत आहे. डॉ. जॅक सिक्केरा यांचा विधानसभा संकुलात पुतळा उभारण्यासाठी आम्ही तयारी चालविली आहे. आमच्या गोय, गोयकारपणाच्या मुद्यामुळे दिल्ली केंद्रस्थानी असलेली पार्टी आता जास्त गोवा केंद्रीत बनू लागली आहे, असेही सरदेसाई यांनी म्हटले आहे.
गोवा फॉरवर्डने जनमत कौलदिनाला महत्व प्राप्त करून दिले आहे. तसेच गोयकारपणाच्या आड येणारे मुद्दे लावून धरले आहेत. गोव्याचे राजकारण गोवा केंद्रीत बनविण्याचा हेतू आहे. स्थानिक मुद्दे हाताळताना निष्काळजीपणा केला जाणार नाही.