कॉंग्रेसच्या ‘जन गण मन’ यात्रेला पणजीत प्रारंभ

0
104

गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षाच्या राज्यातील नागरिकांच्या तक्रारी, समस्या जाणून घेणार्‍या ‘जन गण मन’ या ‘नमन तुका गोंयकार’ यात्रेला पणजी बसस्थानकावरून काल प्रारंभ करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव तथा गोवा प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, सांताक्रुझचे आमदार ऍन्थोनी फर्नांडिस व इतरांची उपस्थिती होती.

सरकारी कारभाराबाबत जनतेच्या भावना, गार्‍हाणी जाणून घेण्यासाठी अनोख्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गोवा प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी दिली.
राज्यात मुख्यमंत्री उपलब्ध नसल्याने प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिमाण झाला आहे. राज्यातील जनतेला विविध समस्यांना तोड द्यावे लागत आहे. जनतेकडून तक्रारी जाणून घेऊन सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. राज्यात सरकारचे अस्तित्व जाणवत नाही. नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. समस्या दूर होत नसल्याने नागरिक हतबल बनले आहेत, अशी टिका विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी केली.
कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी बसस्थानकावर प्रवासी, विक्रेते व इतरांशी संवाद साधला. कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी येथील कदंब बसस्थानकावरून खासगी प्रवासी बसमधून नमन तुका गोंयकारा यात्रेला सुरुवात केली. म्हापसा, हळदोणा, मये आणि डिचोली असा पहिल्या टप्प्यात प्रवास करून बसमध्ये भेटणार्‍या प्रवाशांचे मनोगत व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.