कॉंग्रेसच्या चार पिढ्यांनी देशाला लुटले : फडणवीस

0
92

गरिबी हटावच्या नावाखाली कॉंग्रेसच्या चार पिढ्यांनी देशाला लुटण्याचे काम केल्याने देशात गरिबी वाढतच गेली व असंख्य समस्या उभ्या राहिल्या. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देऊन अनेक योजनांद्वारे खर्‍या अर्थाने गरिबी हटाव मोहीम हाती घेतली. देशाची सुरक्षा व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी जनता पुन्हा एकदा देश मोदींच्या हाती सोपविण्यासाठी सज्ज झाली आहे, असा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल साखळी येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना केला.

साखळी बाजारात आयोजित प्रचार सभेत फडणवीस यांनी आपल्या घणाघाती भाषणात कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत साखळी परिसर दणाणून सोडला. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उत्तर गोवा उमेदवार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, अनिल होबळे, भाजप साखळी मंडळ अध्यक्ष प्रदीप गावडे, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती मायणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारने साकारलेली लोकोपयोगी कामे मांडली. ते म्हणाले की, कॉंग्रेस सत्तेवर असताना सरकारी योजनांचे केवळ दहा टक्के पैसे लोकांकडे पोहचायचे. बाकीचे त्यांच्या खिशात जायचे. मोदीने जन धन योजनेद्वारे सगळ्यांची बँक खाती उघडली विविध योजना राबवताना पैसे थेट लोकांच्या खात्यात जमा होण्याची सोय करून भ्रष्टाचाराला आळा घातला. मोदींनी सेनेला पूर्ण स्वातंत्र्य दिले. भारताने आर्थिक प्रगतीच्या बाबतीत चीनलाही मागे टाकले आहे. त्यामुळे आज जगभरात देशाला आदराचे स्थान प्राप्त झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
राहुल गांधींची खिल्ली उडवताना फडणवीस म्हणाले की, राहुल यांच्या भाषणामध्ये दोनच मुद्दे असतात. पंतप्रधान मोदीवर काल्पनिक टीका व मनोरंजन. त्यामुळे लोकांची बरीच करमणूक होते. ‘नवभारत’ संकल्पना साकार करण्यासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान बनण्यासाठी श्रीपाद नाईक यांना पुन्हा निवडून ‘नवगोवा’ घडविण्यास हातभार लावा असे आवाहन त्यांनी केले.