कॉंग्रेसचे दहा आमदार फुटणार होते

0
120

>> भाजप प्रदेशाध्यक्षांचा गौप्यस्फोट

>> भाजपमध्ये विलीनीकरणाची होती तयारी

कॉंग्रेस पक्षाच्या कुठल्याही आमदारांशी भाजप प्रवेशाबाबत चर्चा केलेली नाही. कॉंग्रेसच्या १० आमदारांनी पंधरा दिवसांपूर्वी आपल्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्यासाठी संपर्क साधला होता. परंतु, भाजपच्या श्रेष्ठींनी कॉंग्रेस आमदारांच्या विलीनीकरणाला मान्यता दिली नाही, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल पत्रकार परिषदेत केला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडे कॉंग्रेस आमदारांशी चर्चेबाबत कुठल्याही प्रकारचा ऑडियो पुरावा असल्यास त्यांनी तो जाहीर करावा, असे आव्हान यावेळी भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिले.

कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांवर नियंत्रण राहिलेले नाही. कॉंग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये प्रवेशासाठी कोणतेही खास पॅकेज तयार केलेले नाही. कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांना पॅकेजची सवय आहे. चोडणकर हे वैफल्यग्रस्त बनल्याने दिशाभूल व बिनबुडाचे आरोप करीत आहेत, अशी टीका तेंडुलकर यांनी केली.

आघाडी सरकार स्थिर
भाजप आघाडी सरकारकडे २३ चे संख्याबळ आहे. भाजप आघाडी सरकार स्थिर असून सरकारला आणखीन कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही. त्यामुळे भाजपकडून कुठल्याही पक्षाचे आमदार फोडण्यासाठी प्रयत्न केला जाणार नाही, असे तेंडुलकर यांनी सांगितले.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुभाष शिरोडकर, दयानंद सोपटे यांच्याशी एका पैशांचाही व्यवहार केलेला नाही. कॉंग्रेस पक्ष आगामी २५ वर्षांत पुन्हा सत्तेवर येणार नसल्याची चिन्हे दिसू लागल्याने देशपातळीवर कॉंग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गोव्यातील काही कॉंग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेशासाठी चाचपणी करीत आहेत. परंतु, कॉंग्रेसच्या कुठल्याही आमदारांना प्रवेश देण्याचा प्रस्ताव नाही, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची कॅसिनो प्रश्‍नावर भूमिका योग्य

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभापती निवड आणि लोकसभा निवडणूक आचारसंहिता मागे घेण्यात आल्यानंतर सरकारी पातळीवरील कामकाजाला गती दिली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत दररोज १५ ते १६ तास कामकाज हाताळत आहेत, असेही तेंडुलकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मांडवी नदीतील कॅसिनोबाबत योग्य भूमिका घेतल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी भाजप आघाडी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.