कॉंग्रेसचे आंदोलन सीएएविरुद्ध नसून शरणार्थींच्या विरोधात

0
151

>> पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

सीएए कायद्याविरोधात आंदोलन करणार्‍या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी सीएएविरोधात नव्हे, तर पाकिस्तानविरोधात आंदोलन करावे असा सल्ला मोदी यांनी येथे एका सभेत बोलताना दिला. कॉंग्रेस पक्ष पाकिस्तानविरोधात नव्हे तर तेथून भारतात आलेल्या शरणार्थींविरुद्ध आंदोलन करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मोदी यांनी कॉंग्रेस पक्षाला टीकेचे लक्ष्य बनविताना म्हटले की विरोधक पाकिस्तानमधून आलेल्या दलित, मागासवर्गीय व अन्यायग्रस्तांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. पाकिस्तान अस्तित्वात आला तो धर्माच्या आधारावर. त्या वेळेपासून तेथे अन्य धार्मियांवर अत्याचार सुरु झाले होते. पाकमध्ये हिंदू, शीख, जैन, बौद्ध व ख्रिस्ती धर्मियांवर सतत अत्याचार केले गेले आहेत. त्यामुळे या धर्माच्या लाखोंच्या संख्येने लोकांना घरदार, मालमत्ता सोडून भारताच्या आसर्‍याला यावे लागले. असे मोदी म्हणाले.

मोदी-येडीयुरप्पा भेटीत म्हादईचा उल्लेख नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तूमकूर कर्नाटक येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी काल भेट घेऊन राज्यातील विकासकामे आणि धरण प्रकल्पासाठी ५० हजार कोटी रुपयांचे केंद्रीय आर्थिक साहाय्य देण्याची विनंती केल्याचे वृत्त आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्य सचिव आणि दोन सचिवा समवेत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर राज्यातील पाणी समस्या मांडण्यात आली. राज्यातील कृषी विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी अतिरिक्त पाण्याची गरज आहे, असेही पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या भेटीत म्हादई शब्दाचा उच्चार करण्यात आलेला नसल्याची माहिती मिळाली आहे.