कॉंग्रेसचा एकही आमदार भाजपात जाणार नाही : चोडणकर

0
103

कॉंग्रेसमधील सर्व सोळाही आमदार एकसंध असून एकही आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात नसल्याचे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव गिरीश चोडणकर यांनी काल सांगितले.
मनोहर पर्रीकर सरकारला आपल्या आघाडीतील सहकारी असलेले गोवा फॉरवर्डचे नेते डोईजड झालेले असून त्यांना वेसण घालण्यासाठीच पर्रीकर हे कॉंग्रेसचे तीन आमदार पक्ष सोडून भाजप प्रवेश करणार असल्याचा अफवा उठवीत असल्याचे चोडणकर म्हणाले.
कॉंग्रेसच्या आमदारांना त्यांनी फोडण्याचे कितीही प्रयत्न केले तरी त्यात त्यांना यश येणार नसल्याचे चोडणकर म्हणाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने सर्वाधिक १७ जागा मिळवून कॉंग्रेस सर्वांत जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरला होता.
मात्र एवढ्या जागा मिळूनही पक्षाला भाजपने केंद्राची मदत घेऊन सरकार स्थापन करण्यापासून अडवून आपण सरकार स्थापन केल्याने राज्यातील जनता भाजपवर नाराज आहे व कॉंग्रेस पक्षाविषयी जनतेला सहानुभूती आहे. त्यामुणे या पार्श्‍वभूमीवर आमचे आमदार आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपशी हातमिळवणी करणार नसल्याचे चोडणकर म्हणाले.
त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आमचे तीन आमदार फुटणार असल्याच्या अफवा पसरविल्या तरी त्याने कॉंग्रेसचे काहीही नुकसान होणार नाही. मात्र, गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास त्यांना त्याचा फायदा मिळू शकतो, असे चोडणकर यांनी स्पष्ट
केले.