कॉंग्रेसचाही स्पष्ट बहुमताचा दावा

0
103

येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, आमदार दिगंबर कामत व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

यावेळी श्री. फालेरो म्हणाले की, राज्यात परिवर्तन घडवून आणण्याचे आश्‍वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत सरकारला केवळ पोकळ आश्‍वासनेच दिली. या सरकारने प्रत्येक बाबतीत यू टर्न घेतला. कॅसिनो, माध्यम प्रश्‍नी लोकांना फसवले. ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व २५ हजार नोकर्‍यांचे आमीष जनतेला दाखवले. मात्र राज्यातील खाण उद्योग बंद पडल्याने १ लाख लोक बेकार झाले. कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करण्याचे आश्‍वासनही हवेत विरले. त्यामुळे युवा, महिला व पुरुष असे सर्वच घटक भाजपवर नाराज आहेत.
कॉंग्रेस सत्तेवर आल्यास दारिद्य्र रेषेखालील लोकांना ३ रु. दराने तांदूळ, २ रु. दराने गहू व ७ रु. दराने साखर देण्यात येणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.
श्री. राणे म्हणाले की, भाजपच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे. कॉंग्रेस उमेदवारांवर ते खोटे आरोप करू लागले आहेत. तसेच अफवाही पसरवू लागले आहेत. राज्यात चांगले उद्योग, आरोग्यसेवा देण्यास सरकारला अपयश आल्याची टीकाही राणे यांनी केली.
श्री. कामत यावेळी म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात कोणतेही चांगले काम या सरकारला करता आले नाही. कॉंग्रेस सरकारने मडगावात जिल्हा इस्पितळाचे काम हाती घेतले होते. ते पूर्ण झाले नाही. कॉंग्रेस सरकारने सुरू केलल्या १०८ रुग्णवाहिकांमुळे कित्येक लोकांचे प्राण वाचले होते. आपण मुख्यमंत्री असताना आणलेल्या स्तनांच्या कर्करोगांच्या रुग्णवाहिका सध्या धूळ खात पडल्या आहेत. बाह्य विकास आराखडा अधिसूचनाही भ्रष्टाचार करण्यासाठी घाईगडबडीत जारी करण्याचा डावही भाजपने आखल्याचा आरोप यावेळी कामत यांनी
केला.
रवी नाईक यांनी, गेल्या पाच वर्षांत कर्जे घेऊन सरकार चालवले असून लोकांवर कर्जाचा बोजा घातला आहे असा आरोप केला. कुळ मुंडकार कायद्यात दुरूस्ती करून कुळ मुडकारांच्या हक्कावर गदा आणली. मात्र त्यावेळी ढवळीकर बंधंनी कोणताच विरोध केला नसल्याचे नाईक म्हणाले. यामुळे भाजपला जनताच धडा शिकवेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.