कॉंग्रेसचाही विजयाचा दावा

0
136

लोकसभा आणि तीन विधानसभांच्या पोट निवडणूक प्रचाराला कॉंग्रेस पक्षाला मतदारांकडून भरघोस प्रतिसाद लाभला असून कॉंग्रेस लोकसभेच्या दोन्ही आणि विधानसभेच्या तिन्ही जागा जिंकणार आहे, असा दावा गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष तथा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल व्यक्त केला.

राज्यात निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी मतदार भाजप आघाडी सरकारबाबत असलेला असंतोष व्यक्त करीत होते. मतदार आगामी निवडणुकीत मतदानातून आपला असंतोष निश्‍चितपणे व्यक्त करतील, असा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला.
उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवारांना मतदारांकडून भरघोस पाठिंबा मिळाला आहे. कॉंग्रेसच्या उमेदवारांनी विविध मतदारसंघात दौरा करून मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या आहेत, असेही चोडणकर यांनी सांगितले.

सत्ताधारी भाजपमधील नाराज असलेल्या काही नेत्यांनी दूरध्वनी, प्रत्यक्ष भेटून पाठिंबा व्यक्त केला आहे. मगो पक्षाने पाठिंबा जाहीर केल्याने कॉंग्रेसची ताकद वाढलेली आहे. गोवा फॉरवर्ड, आम आदमी पार्टी मधील बर्‍याच नेत्यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. लोकसभा निवडणूक प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्याने आपणाला काही ठिकाणच्या मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेणे शक्य झालेले नाही. ‘त्या’ मतदारांनी नाराज होऊ नये, असेही चोडणकर यांनी सांगितले.

भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी आपल्या विकास पुस्तिकेमध्ये चुकीची माहिती दिली आहे. भाजपचे नाईक यांना आदर्श ग्राम योजनेखालील इब्रामपूर गावातील विकास कामांचा संयुक्तपणे आढावा घेण्याचे आव्हान दिले होते. परंतु, हे आव्हान भाजपच्या नाईक यांनी स्वीकारले नाही, असेही चोडणकर यांनी सांगितले.
राज्यात निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाला मिळणारा वाढता पाठिंबा पाहून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी आपली खुर्ची सांभाळण्यासाठी दिशाभूल करणारी वक्तव्ये करण्यास प्रारंभ केला आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला.