केव्हिन ओब्रायन ६६व्या स्थानी

0
65

आयर्लंडचा ३४ वर्षीय अष्टपैलू केव्हिन ओब्रायन याने आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ‘टॉप १००’मध्ये प्रवेश करताना ४४० गुणांसह ६६वा क्रमांक मिळविला आहे. आयर्लंडच्या पदार्पणाच्या कसोटीत केव्हिनने पहिल्या डावात ४० व दुसर्‍या डावात ११८ धावा करत सामनावीर पुरस्कार पटकावला होता. आयर्लंडच्या दुसर्‍या डावात ५३ धावांची खेळी केलेल्या स्टुअर्ट थॉम्पसन याने २१८ गुणांसह १२५वा क्रमांक मिळविला आहे. गोलंदाजांमध्ये टिम मुर्ताघ याने (४५-४ व ५५-२) ६७व्या स्थानी झेप घेतली आहे. तर थॉम्पसन (६२-३ व ३१-१) ८८व्या स्थानी आहे. फलंदाजांच्या ‘टॉप १०’मध्ये केवळ एक बदल झाला असून पाकिस्तानच्या अझर अलीची दोन स्थानांच्या पदावनतीसह १२व्या स्थानी घसरण झाली आहे. आयर्लंडविरुद्धच्या कसोटीत त्याला दोन्ही डावात मिळून केवळ सहा धावा करता आल्या होत्या. पाकिस्तानकडून पदार्पण करणार्‍या फहीम अश्रफ याने पहिल्या डावातील ८३ धावांच्या बळावर आपल्या खात्यात ३९२ गुण जमा करताना फलंदाजांमध्ये ८१वा क्रमांक मिळविला आहे. दुसरा पदार्पणवीर इमाम उल हक २७४ गुण घेत ११३व्या स्थानी आहे. गोलंदाजांमध्ये ‘टॉप १५’ंमध्ये एकही बदल झालेला नाही.