केला इशारा जाता जाता…

0
315

– शंभू भाऊ बांदेकर साळगाव
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना यांची दीर्घ काळाची युती होती आणि ती गेल्या विधानसभेतही चालू राहील, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अनेक वेळा जाहीरपणे सांगितले होते. पण शेवटी जागा वाटपावरून प्रकरण फिसकटले आणि दोन्ही पक्ष राम-लक्ष्मणाच्या मित्रत्वातून राम-रावणाच्या शत्रुत्वात उभे ठाकले.
असे असले तरी केंद्रात मात्र भाजप-शिवसेना युती कायम आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत शिवसेना खासदार राजन विचारे यांनी जो अविचार केला तो सर्वत्र गाजला. महाराष्ट्र सदनात ‘चपाती राडा’ करून जी शोभा केली, तेव्हा भाजप मूग गिळून गप्प बसला आणि भाजपाने सानिया मिर्झा यांच्यावर ‘पाकिस्तानची सून’ म्हणून शिक्का मारला तेव्हा शिवसेनेनेही मजा लुटली. वृत्तपत्रांनी मात्र हे वाचाळवीरांचे कृत्य आहे, अशा मोकाट वाचाळवीरांना आवरले नाही तर भारताच्या राजकारणाची पत घसरेल, असा इशारा दिला. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदराव पवार यांनी महाराष्ट्रातील भाजपा सरकारला जो इशारा दिला तो वर उल्लेखित वाचाळवीरांसारखा मुळीच नाही. मूळात श्री. पवार हे अत्यंत चाणाक्ष, धूर्त आणि निष्णात राजकारणी आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्रातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री म्हणून गाजलेले व नंतर भारतीय राजकारणात संरक्षण मंत्री, कृषीमंत्री, अन्नमंत्री ही महत्त्वाची खाती भूषवून आपला असा एक आगळा वेगळा ठसा उमटविणारे शरदराव गेली पन्नास वर्षे राजकीय क्षितिजावर चमकत आहेत. आज ते केंद्रात नाहीत, त्यांच्या राष्ट्रवादीचे आमदार महाराष्ट्रात मंत्रिपदावर नाहीत; तरीही राजकीय खेळीची चुणूक दाखवत त्यांनी महाराष्ट्रातील भाजप सरकारला वेठीस धरले आहे. शिवसेना-भाजप युती पुनश्‍च मनोेमीलन करणार याची चाहूल लागताच त्यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा देऊ केला आणि शिवसेनेची जिरवली.
लोकसभेच्या आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र व हरयाणा राज्यातील निवडणुकांनंतर भाजप सोडून सगळेच राजकीय पक्ष चिंतन करू लागले आहेत. पण भाजपाला त्याची चिंता वाटत नाही. कारण या पक्षांनी कितीही चिंतन केले तरी नजीकच्या काळात भाजपाला कसलाच धोका संभवत नाही असे त्या पक्षाला वाटते. सगळे पक्ष एकत्र येऊन काही करणार तर प्रत्येकाचे कंबरडे मोडलेले! इतर पक्षांचे उणे-दुणे काढण्यात ते पटाईत. पण सखोल विचारविमर्श करून झाले-गेले गंगेला मिळाले, असे मानून आता मोदी जर गंगा शुद्ध करायला निघाले आहेत, तर आपणही शुचिर्भुत होऊन कामाला लागू या, असे काही त्यांनी केलेले दिसत नाही.
भाजपा विरोधात राहून घणाघाती प्रहार करून सत्तेवर आला. महागाई, भ्रष्टाचार आणि मंत्र्यांचे चारित्र्यहनन करीत तो सत्तेत आला. आता महागाई कमी झाली का? भ्रष्टाचार आणि काळा पैसा या गोष्टींत काही फरक पडला आहे का? केंद्रात व महाराष्ट्रात मंत्रीपद भूषवत असलेले कितीतरी मंत्री निरनिराळ्या गुन्ह्यांत अडकल्याचे प्रसिद्ध झाले होते. आता सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन या विरोधात का बरे आवाज उठवत नाहीत?
आपण गोव्याचेच उदाहरण घेऊ या. गोव्यात बोकाळलेला बेकायदेशीर खाणव्यवसाय, माध्यम प्रश्न, लोकायुक्त प्रादेशिक आराखडा, कॅसिनोवर बंदी इ. विषयांवर प्रहार करीत भाजपाने कॉंग्रेसची हार केली. आता गेल्या अडीच वर्षांत यातला एकतरी प्रश्न सुटला कां? अर्थात मतदारांना हे कळत नाही, असे नाही. तो आता रंक बनला असून मतदानाच्या वेळी तो परत राजा बनणार आहे. त्यावेळी तो कोणते पत्ते खेळतो, ते पहावे लागेल.
अर्थात आजच्या निवडणुका या पैसा, पार्ट्या आणि पहेलवानगिरी यांच्या माध्यमातून पार पाडतात. त्यावेळी कोण, कसा वागतो यावरच पुढच्या सरकारची भिस्त अवलंबून असते. नाहीतरी लोक आपल्याला हवे तसेच सरकार निवडून देतात, म्हणतात ते काही खोटे नाही. पवारसाहेबांना महाराष्ट्रातील काही राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांना पाठिशी घालायचे होते व भाजपाच्या पोटावर मारायचे नव्हते म्हणून त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. अप्रत्यक्षरीत्या तशा काही अटी होत्याच असे अटीतटीने प्रतिपादन करणारे काही महाभाग आहेत. त्यांचे म्हणणे चूक आहे, असेही नव्हे. पण आकड्यांच्या हिशेबाने कॉंग्रेस, शिवसेनेने राष्ट्रवादीवर मात करू नये आणि केंद्राचे सोडा, पण आपली जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्र राज्यात आपला वरचष्मा रहावा व महाराष्ट्राचे राजकारण आपल्याभोवती म्हणजे पर्यायाने राष्ट्रवादीभोवती फिरते रहावे, यासाठीच त्यांचा जाता जाता केलेला इशारा असावा हे आता काही लपून राहिलेले नाही.
महाराष्ट्र विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव संमत करून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला घरघर लावण्याचे काम शरद पवारांनी केले आहे. मानला तर हा इशारा किंवा भाजपाने दहशतीचे राजकारण करू नये, हे सांगणारा तो संदेश असावा. आता दगडापेक्षा वीट मऊ, म्हणून भाजपा आपल्या पूर्वाश्रमीच्या मित्राला शिवसेनेला मंत्रिमंडळात सामील करून त्यांच्या मनाप्रमाणे व मताप्रमाणे राजकारण करते की शरदरावांचा इशारा शिरसावंद्य न मानून दुसरी एखादी राजकीय खेळी करते की राष्ट्रवादीपुढेच आपले समर्पण करते हे पाहण्यासाठी थोडे दिवस जावे लागतील. महाराष्ट्राच्या राजकीय स्थैर्याबाबत शरदरावांनी दिलेला इशारा कितपत यशस्वी होतो, यावर अर्थातच राष्ट्रवादीचेही भवितव्य अवलंबून आहे.