केकेआरचा दिल्लीवर ७१ धावांनी विजय

0
98

कोलकाता नाईट रायडर्सने काल दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ७१ धावांनी मोठा विजय संपादन केला. प्रथम फलंदाजी करताना २०० धावा फलकावर लगावल्यानंतर केकेआरने दिल्लीचा डाव १४.२ षटकांत १२९ धावांत संपवला. इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या सत्रातील हा १३वा सामना ईडन गार्डन मैदानावर खेळविण्यात आला.

धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून ग्लेन मॅक्सवेल (२२ चेंडूंत ४७) व ऋषभ पंत (२६ चेंडूंत ४३) यांचा अपवाद वगळता एकालाही दुहेरी धावसंख्या करता आली नाही.
तत्पूर्वी, दिल्ली डेअरडेव्हिल्सने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. सुनील नारायणला सलामीला पाठवून वेगाने धावा जमविण्याचा केकेआरचा प्रयत्न यावेळी फसला. केवळ एक धाव करून त्याने तंबूचा रस्ता धरला. रॉबिन उथप्पा (३५ धावा, १९ चेंडू, २ चौकार व ३ षटकार) याने ख्रिस लिन याच्या साथीने डाव सावरताना दुसर्‍या गड्यासाठी ५५ धावांची भागीदारी केली. आक्रमक पवित्रा अवलंबलेल्या उथप्पाचा झेल नदीमचे स्वतःच्या गोलंदाजीवर घेत ही भागीदारी संपुष्टात आणली. सलामीवीर लिनला मुक्तपणे फलंदाजी करता आली नाही. २९ चेंडू खर्च करूनही त्याला केवळ ३१ धावा करता आल्या.

यामुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला. नितीश राणाने आपली जबाबदारी ओळखत खराब चेंडूंचा पुरेपूर समाचार घेतला. यावेळी त्याने चांगल्या चेंडूना सन्मानही दिला. केवळ ३५ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह त्याने आपली ५९ धावांची खेळी सजवली. राणाच्या फलंदाजीमुळे केकेआरचा संघ १८०च्या आसपास मजल मारेल अशी अपेक्षा असताना आंद्रे रसेल नावाचे वादळ घोंगावले. रसेलने मैदानावर पाऊल टाकताक्षणी गियर बदलताना षटकारांची बरसात केले. १२ चेंडूंत ६ गगनचुंबी षटकारांसह रसेलने ४१ धावा बरसवल्या. यामुळे केकेआरचा संघ सुस्थितीतून मजबूत स्थितीत पोहोचला. राहुल तेवतियाने टाकलेल्या डावाच्या शेवटच्या षटकात मात्र केकेआरला केवळ ३ धावा करता आल्या. या षटकात त्यांनी ३ गडीदेखील गमावले.

धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स ः ख्रिस लिन झे. रॉय गो. शामी ३१, सुनील नारायण झे. मॅक्सवेल गो. बोल्ट १, रॉबिन उथप्पा झे. व गो. नदीम ३५, नितीश राणा झे. गंभीर गो. मॉरिस ५९, दिनेश कार्तिक झे. बोल्ट गो. मॉरिस १९, आंद्रे रसेल त्रि. गो. बोल्ट ४१, शुभमन गिल झे. मॉरिस गो. तेवतिया ६, टॉम करन झे. मॅक्सवेल गो. तेवतिया २, पीयुष चावला झे. पंत गो. तेवतिया ०, शिवम मावी नाबाद ०, अवांतर ६, एकूण २० षटकांत ९ बाद २००
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ४-१-२९-२, ख्रिस मॉरिस ४-०-४१-२, शहाबाज नदीम ४-०-४३-१, राहुल तेवतिया ३-०-१८-३, मोहम्मद शामी ४-०-५३-१, विजय शंकर १-०-१२-०
दिल्ली डेअरडेव्हिल्स ः दिल्ली डेअरडेव्हिल्स ः गौतम गंभीर त्रि. गो. मावी ८, जेसन रॉय यष्टिचीत कार्तिक गो. चावला १, श्रेयस अय्यर झे. राणा गो. रसेल ४, ऋषभ पंत झे. चावला गो. कुलदीप ४३, ग्लेन मॅक्सवेल झे. उथप्पा गो. कुलदीप ४७, राहुल तेवतिया झे. रसेल गो. करन १, विजय शंकर पायचीत गो. नारायण २, ख्रिस मॉरिस त्रि. गो. नारायण २, मोहम्मद शामी झे. रसेल गो. नारायण ७, शहाबाज नदीम नाबाद ६, ट्रेंट बोल्ट झे. व गो. कुलदीप ०, अवांतर ८, एकूण १४.२ षटकांत सर्वबाद १२९
गोलंदाजी ः पीयुष चावला २-०-१६-१, आंद्रे रसेल २-०-२५-१, शिवम मावी २-०-१४-१, सुनील नारायण ३-०-१८-३, टॉम करन २-०-२१-१, कुलदीप यादव ३.२-०-३२-३.

बोल्टचे सलग १० निर्धाव चेंडू
दिल्लीचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने सलग १० निर्धाव चेंडू टाकण्याचा पराक्रम केला. ख्रिस लिनला पहिले षटक निर्धाव टाकल्यानंतर आपल्या दुसर्‍या षटकातील पहिले दोन चेंडू त्याने नारायणला निर्धाव टाकले व तिसर्‍या चेंडूवर त्याचा बळी घेतला. नवीन फलंदाज रॉबिन उथप्पाने आपला पहिला चेंडू बचावात्मकरित्या खेळत बोल्टला लागोपाठ १० निर्धाव चेंडू टाकण्याची संधी दिली.