केंद्र सरकारच्या विकास योजनेंतर्गत कोलवा किनार्‍याचे सौंदर्य खुलणार

0
67

भारत सरकारच्या पर्यटन खात्याच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ विकास प्रकल्पांतर्गत विकास करण्यात येणार्‍या देशातील १२ समुद्र किनार्‍यांमध्ये दक्षिण गोव्यातील कोलवा समुद्र किनार्‍याचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रकल्पामुळे पर्यटन, सामाजिक विकास आणि साधन सुविधांच्या विकासाला हातभार लागणार आहे. कोलवा समुद्र किनार्‍याचा विकासाचा मास्टर प्लॅन सर्वांना विश्‍वासात घेऊन तयार केला जाणार आहे. केंद्रीय पर्यटन खात्याच्या सचिव रश्मी वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन भवनात काल झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत कोलवा समुद्र किनार्‍याच्या विकासावर चर्चा करण्यात आली.

समुद्र किनारा विकास प्रकल्प यशस्वी करण्यासाठी स्थानिकांच्या सूचना विचारात घेतल्या जाणार आहे, अशी माहिती वर्मा यांनी बैठकीत दिली. वर्मा यांनी कोलवा समुद्र किनार्‍याला भेट देऊन पाहणी केली. तसेच किनार्‍यावरील व्यावसायिक, स्थानिक पंच सदस्यांच्या सूचना जाणून घेतल्या. यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल व इतर अधिकारी उपस्थित होते. सीआरझेडच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे किनारी भागातील विकासकामात अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्याकडे केंद्रीय सचिव वर्मा यांनी लक्ष घालावे, अशी मागणी काब्राल यांनी केली. कोलवा समुद्र किनार्‍याच्या विकासाचा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर राज्यातील इतर समुद्र किनार्‍यांच्या विकासाबाबत आराखडे तयार केले जाणार आहे, अशी माहिती काब्राल यांनी दिली.