केंद्रात येणार बिगर भाजप सरकार : आनंद शर्मा

0
92

भाजपला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्यात अपयश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जुन्या आश्‍वासनाबाबत तोंडातून शब्द काढायला तयार नाहीत. आता, पुन्हा एकदा नवीन आश्‍वासनांची खैरात करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे. भाजपच्या खोट्या व दिशाभूल करणार्‍या प्रचाराला मतदार बळी पडणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्‍चित आहे. केंद्रात बिगर भाजप सरकार स्थापन होणार आहे, असा दावा कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी पत्रकार परिषदेत काल केला.

पंतप्रधान मोदी मागील पाच वर्षातील कारभार आणि आश्‍वासनाबाबत बोलण्यास तयार नाहीत. मोदी यांनी आश्‍वासनांचे पालन करण्यात अपयश आल्याने जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे. भाजपला वर्षभरात गोव्यातील खाण बंदीचा प्रश्‍न सोडविण्यात यश आले नाही. भाजपच्या नेत्यांनी केवळ पोकळ आश्‍वासने देऊन खाण अवलंबिताना झुलवत ठेवले आहे. गोव्यातील पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. रोजगार उपलब्ध करण्यास अपयशी ठरला आहे. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे त्रास सहन करावा लागला आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.

शेतकरी वर्गाला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असे शर्मा यांनी सांगितले. भाजपकडे निवडणूक प्रचारासाठी मुद्दे नसल्याने सैन्य दलाचा प्रचारासाठी वापर करून मतदारांचे भावनिक पातळीवरून भाजपकडे मन वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॉंग्रेस पक्षाने दहशतवादाविरोधात लढा दिलेला आहे. कॉंग्रेसने दोन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी दहशतवाद्याच्याविरोधात लढा देताना गमावले आहेत. त्यामुळे भाजपने कॉँग्रेसला राष्ट्रीयत्वाचे धडे देण्याची गरज नाही, असेही शर्मा यांनी सांगितले.