कॅटामाईनप्रकरणी परब यांची मुंबईत सहा तास चौकशी

0
91

केंद्रीय दक्षता संचालनालयाने पिसुर्ले येथे कॅटामाईन अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आलेल्या विजय इंडस्ट्रीजचे मालक तथा भाजपचे कार्यकर्ते वासुदेव परब यांची मुंबई येथे सोमवारी सहा तास चौकशी केली. दरम्यान, आयडीसीने वासुदेव परब यांना कॅटामाईन अमलीपदार्थ प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने अमली पदार्थाचा व्यवसाय करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांत छापे घालून कॅटामाईन अमलीपदार्थ मोठ्या प्रमाणात हस्तगत केला आहे. पिसुर्ले येथील विजय इंडस्ट्रीजमधून अंदाजे १०० किलो कॅटामाईन हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी संचालनालयाने दहा व्यक्तींना अटक केली आहे. विजय इंडस्ट्रीजच्या आवारात केटामाईन तयार केले जात होते, अशी कबुली अटक केलेल्या व्यक्तीनी दिली आहे.

विजय इंडस्ट्रीजचे मालक परब यांनी आस्थापन परराज्यातील एका व्यक्तीला बेकायदेशीरपणे भाडेपट्टीवर दिले होते. भाड्यापोटी सुमारे महिना ७५ हजार रूपये मिळत होते. ‘त्या’ व्यक्तीकडून केटामाईन अमली पदार्थ तयार केले जात होते. या प्रकरणामुळे परब अडचणीत आले आहेत. त्यांनी कायदेशीर सोपस्कार न करता आस्थापन भाडेपट्टीवर दिल्याचे उघड झाले आहे.

औद्योगिक वसाहतीमध्ये अमलीपदार्थ तयार करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने औद्योगिक महामंडळाचा बेशिस्त कारभार चव्हाट्यावर आला आहे.
महामंडळाने परब यांना लोखंडी ग्रील्स तयार करण्यासाठी जागा उपलब्ध केली आहे. परब यांनी सदर जागा बेकायदेशीरपणे परराज्यातील व्यक्तीला भाडेपट्टीवर दिली. सदर व्यक्तीकडून केटामाईन हा बंदी घातलेला अमलीपदार्थ तयार केला जात होता. महामंडळाच्या कराराचे भंग केल्याचा ठपका नोटीसमध्ये ठेवण्यात आला आहे.