कृष्णधवल टीव्ही

0
866

– संदीप मणेरीकर
रविवारची सकाळ. सकाळचे नऊ वाजलेत आणि लोकांची गडबड एकदम थांबते. लोक बोलता बोलता एकदम गप्प होतात आणि ‘महाभारत…. महाभारत… महाभारत… कथा है पुरुषार्थ की, है स्वार्थ की परमार्थ की…’ असं हिंदी टायटल सॉंग सुरू होतं. दिल्ली दूरदर्शनवरून ‘महाभारत’ ही चोप्रा बंधूंची मालिका सुरू होते आणि संपूर्ण विश्‍वच जणू काय थांबल्याचा भास होतो. बर्‍याच ठिकाणी रस्त्यांवरची गर्दी कुठेतरी गायब झालेली असते. रस्ते अगदी सुनसान होतात. एक तास रस्त्यावरची माणसं कुठे गायब होतात ते कळत नाही, पण त्यांचं अस्तित्व नाहीसं झालेलं असतं.
केवळ कृष्णधवल दूरदर्शनच्या जमान्यात हा चमत्कार घडलेला होता. त्यानंतर आज कितीतरी वाहिन्या आल्या-गेल्या, कितीतरी रंगीत दूरदर्शन संच आले व गेले पण कृष्णधवल दूरदर्शनची किमया काही न्यारीच. औरच. तो जमाना, ते दिवस, आजच्या या शेकडोंनी असलेल्या कुठल्याच चॅनेलला नाही. कृष्णधवल हे नावच किती सुरेख आहे. इंग्रजीत सरळ ‘ब्लॅक अँड व्हाईट’ हे सरधोपट नाव दिलं गेलं. पण मराठी भाषेत कृष्णधवल हे नाव आलं. या नावापासूनच सुरूवात केली तर ते दिवस किती रंगीन होते हे कळतं.
आमच्या गावात वीज उशिरा आली. त्यानंतर कितीतरी वर्षांनी दूरदर्शन आला. पण आमच्या गावात वीज येण्यापूर्वी घोटगेवाडी या आमच्यापासून केवळ दोन किमी अंतरावरील गावात वीज होती. पण केवळ दोन किमीच्या अंतराच्या गावात वीज येण्यासाठी किमान दहा वर्षांचा अवधी लागतो ही शासनाची करामत म्हणावी लागेल. पण घोटगेवाडीला गेल्यानंतर वीज किंवा लाईट हा काय प्रकार असतो हे आम्हांला कळत होतं. पण एक उत्सुकता होती की केवळ एक बटण दाबलं की तिकडे झटकन बल्ब पेटतो तो कसा काय? आमच्या घरी माझ्या काकांनी फिटींगचं काम सुरू केलं होतं. त्यामुळे आमची खात्री झाली होती की आता आमच्याकडेही लाईट येणार. पण कधी येणार, कशी येणार हे काकांना विचारायची आमची हिंमत नव्हती. तशी थोडी भीतीही वाटत होती. वीज येईपर्यंत रॉकेलचे दिवे आमच्या घरी भगभगत होते. कंदील पेटत होते. आणि बत्त्यांचा झगमगाट होता. मोठा काहीतरी कार्यक्रम असला तर बत्तीचा वापर केला जात असे. त्यामुळे एखाद्यादिवशी बत्ती पेटवणार असल्याचं कळलं की आम्ही आज आमच्याकडे काहीतरी मोठा कार्यक्रम होणार असल्याचं समजत होतो.
अशा या दिवसांत एक दिवस गावात वीज आली, आणि सर्वत्र झगमगाट झाला. रॉकेलचे दिवे आणि कंदील अगदीच मिणमिणते भासू लागले. रॉकेलचे दिवे कुठेतरी अडगळीत जाऊ लागले. बत्त्यांची रवानगी माडीवर झाली. कंदील केवळ शेतावरच्या माळ्यावर नेण्यासाठी वापरण्यात येऊ लागले. आमच्या दोन तीन गावांत अशी ही वीज एकदाची आली. पण दूरदशईन मात्र कुठेच नव्हता.
घोटगेवाडीला शाळेत गेल्यानंतर सोमवारी मुलांची चर्चा चालत असे, ‘काल बगलय, रामान कसां धनुष्य तोडल्यानं तां… आता फुडल्या रविवारा सीतेक घेवन राम अयोध्येक येतलो.’ असली काहीशी चुकीची माहिती दिली जात होती. पण मला एक त्यावेळी समजत नव्हतं. पुढच्या रविवारी राम काय करणार हे यांना कसं कळत होतं? मध्येच एखाद्या रविवारी, ‘फुडल्या रविवारा मरे सेतू बांधतले.’ असं वाक्य यायचं. त्यावेळी राम-लक्ष्मणांना केवळ रविवारच का लागतो असे काहीसे विचार त्यावेळी मनात येत होते. पण नक्की त्याचं काहीच कारण उमजत नव्हतं. घरी कोणाला विचारण्याच्याही भानगडीत मी पडत नव्हतो. एकतर नीट
उत्तर मिळेल याची शाश्‍वती नव्हती आणि अभ्यास करायला जातोस की गोष्टी करायला जातोस असलं काहीतरी ऐकू येण्याची जास्त भीती होती.
पण आमच्या शेजार दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका घरात त्यांनी दूरदर्शन संच आणला आणि संपूर्ण आवाठात बातमी पसरली की, ‘आता रविवारा आमका तेंच्याकडे रामायण बगूक गावतलां.’ हा रामायण हा काय प्रकार आहे हे आम्हांला तोपर्यंत काहीच माहीत नव्हतं. सुरूवातीला आम्हांला हा प्रकार नवा होता. मूळात टीव्ही हाच प्रकार नवीन होता त्यातही रामायण ही मालिका नवीच होती. मात्र त्यांच्या घरी जाऊन आम्हीही रामायण मालिका पाहू लागलो आणि मग त्यात एवढे गुंग झालो की सांगता सोय नाही. रामायण संपल्यानंतर काही दिवसांनी आमच्या घरी टीव्ही आणला. आमच्या घरी पहिलाच टीव्ही. मग काय त्याचा आनंद सोहळाच होता. एनफिल्ड या कंपनीचा तो पहिला टीव्ही. पोर्टेबल आकाराचा. काकांनी तो बेळगाव येथून आणला होता. आमच्याकडे टीव्हीचा अँटिना लावण्यासाठी जागाही नव्हती. कारण आमचं घर खूप खाली आहे आणि त्यामुळे अँटिना खूप उंचावर लावावा लागत होता. पण एवढ्या उंचीवर अँटिना लावूनही टीव्ही काही नीट दिसत नव्हता. शेवटी काकांनी आपल्याकडे असलेला टीव्ही आणला, त्याला मस्तपैकी शटर वगैरे होतं. आम्हांला तो टीव्हीही अगदी मस्त आणि वेगळा वाटला. त्या टीव्हीची स्क्रीन मोठी असल्यामुळे चित्रंही मोठी दिसत. आणि याच दिवसांत कधीतरी लोकप्रभाच्या एका अंकात चोप्रांचं आठ कोटींचे महाभारत असा लेख वाचला. आणि लगेचच काही दिवसांत दर रविवारी सकाळी ९ ते १० या वेळेत महाभारत सुरू झालं. आमच्या घरातील माजघरात टीव्ही होता आणि या वेळेत संपूर्ण माजघर लोकांनी भरून जात होतं. कामाला येणारी माणसं या वेळेतील काम एक तास नंतर किंवा आधी येऊन करत होती.
याच दिवसांत बंदिनी, परमवीर ही कुलदीप पवार किंवा चाळ नावाची वाचाळ वस्ती, बिंब-प्रतिबिंब ही विक्रम गोखले, सतीश पुळेकर यांची लाईफमेंबर, गोट्या, एक शून्य शून्य, असे पाहुणे येती, अहो ऐकलं का अशा कितीतरी मालिका साद घालायच्या. तशाच राऊ, स्वामी आदी ऐतिहासिक मालिकाही मना वेधून घेत होत्या. मुख्य म्हणजे या सर्वच मालिका बहुते तेरा भागांत संपत असत. सुसंस्कारित असलेल्या या मालिकांत कुठेच आपल्या संस्कृतीला धक्का किंवा सामाजिक धक्का बसत नव्हता. बुधवारी रात्री लागणारा हिंदी चित्रपट गीतांचा चित्रहार, रविवारी संध्याकाळी लागणारा मराठी चित्रपट किंवा नाटक, रोज संध्याकाळी ७ वा. लागणार्‍या बातम्या असतील किंवा शनिवारची साप्ताहिकी असेल आम्ही मुद्दाम हे सारे कार्यक्रम बघत असू. मुळात संध्याकाळच्या वेळीच हे कार्यक्रम असायचे. त्यामुळे सारेजण एकत्र बसून हे कार्यक्रम पहात असू.
दूरदर्शनवर लागणारी क्रिकेटची मॅच पाहण्यातही एक वेगळा आनंद मिळत असे. कृष्णधवल जरी असला तरी त्यावेळची ती मॅच किंवा तो सामना पाहण्यात वेगळाच आनंद होता आज तंत्रज्ञान जरी प्रगत झालेलं असलं तरीही त्यावेळची मजा काही और होती. आम्हांला दादा एका वर्षी मुद्दाम टीव्ही पाहण्यासाठी म्हणून आमोणा-साखळी गोवा येथे आत्याकडे घेऊन गेले होते. भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील तो कसोटी सामना होता आणि सुनील गावस्कर कपिलदेव, किरमाणी असे दिग्गज त्यावेळी भारतीय संघात होते पण त्याहीपेक्षा विव्हियन रिचर्डस्, हेन्स. दुजॉं असे महान क्रिकेटपटू विंडिजकडे होते आणि त्यामुळे अर्थातच भारतीय संघ त्यावेळी पूर्णपणे ढेपाळला होता. पण त्यावेळी पहिल्यांदा आम्ही टीव्ही हा प्रकार पाहिला होता.
काही वर्षांनी नंतर आवाठातही टीव्ही आले, काहीजण कलर टीव्ही म्हणून सात रंगांची काच बाहेरून बसवून रंगीत टीव्हीचा आस्वाद घेत होते. मात्र यात एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण चेहरा जर दाखवला तर एक डोळाच तीन रंगाचा व दुसरा डोळा उर्वरीत चार रंगांचा दिसत असे. असे काहीसे चित्रविचित्र प्रकारही केले जात असत. पण त्यानतंर हळूहळू प्रगती झाली. रंगीत टीव्ही आले. ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना गेला. तसाच केवळ डीडीचाही जमाना गेला. विविध चॅनेल्सचा मारा सुरू झाला. चोवीस तास बातम्या देणारेही चॅनेल्स आले तसेच विविध कार्यक्रम दाखवणारे अनेक चॅनेल्स आले. झी, ई, मी असे एकाक्षरी चॅनेल्स आले आणि सह्याद्री वाहिनीवरील त्या मालिका अचानक गायब झाल्या. डिश आल्या, केबल्स आल्या आणि मग खर्‍या अर्थाने हंगामा सुरू झाला. पाच पाच वर्षे चालणार्‍या मालिका आल्या. त्यातील पात्रं पाच वर्षांनीही आहेत तशीच तरुण वा देखणी राहतात. त्यांच्या चेहर्‍यावर एक सुरकुतीही दिसत नाही. केवळ १३ भागांत संपणारी तीच मालिका आज तेरा वर्षं झाली तरी संपत नाही. त्यापेक्षा एखादा चित्रपट लवकर संपतो. कार्यक्रम वाढले पण दर्जा घसरला.
आज सारेगमप, गौरव महाराष्ट्राचा अशा काही संगीताच्या मालिका सुरू आहेत. पण याचा उगम मात्र दिल्ली दूरदर्शनवरून प्रसारित होणार्‍या व अन्नू कपूर यांनी सूत्रसंचालन केलेल्या ‘मेरी आवाज सुनो’ या मालिकेमुळेच झाला असं मला वाटतं. आज माहितीचा खजिना समोर आहे पण त्यात आहे केवळ व्यवहार, दुसर्‍याच्या अगोदर माझ्याकडे हवं ही अपेक्षा. त्यामुळे चढाओढ खूप आहे. स्पर्धा खूप आहे पण त्यात प्रेक्षकांना समोर ठेवून किती वाहिन्या काम करतात? आज कुठल्याही मालिकेत अपवाद वगळता अनैतिक संबंध, बाहेरख्यालीपणा, संशय, महिला खलनायिका असे प्रकार सर्रासपणे आढळून येतात. उलट कृष्णधवलच्या जमान्यात मात्र निखळ मनोरंजन हाच हेतू होता. एक संस्कार करण्याचा मनापासून प्रयत्न होता. आज कितीतरी चॅनेल्सवर पौराणिक वाहिन्या प्रसारित होतात. पण त्यांना रामायण वा महाभारताएवढी प्रसिद्धी मिळत नाही तसेच श्रोतुवर्गही कमी झालेला आहे. प्रेक्षकांच्या आवडीचा विचार करण्यापेक्षा टीआरपी वाढवण्यावर भर देण्यात येत असल्यामुळे आज कृष्णधवल दूरदर्शनचा मोती ओघळून गेलेला आहे.