कृष्णंभट्ट बांदकर आणि रंगसन्मान पुरस्कार जाहीर

0
127

कला अकादमी गोवातर्फे गोमंत रंगभूमी दिनाचे औचित्य साधून गोमंतकीय रंगभूमीच्या क्षेत्रातील रंगकर्मींना देण्यात येणार्‍या गोमंतकाचे आद्य नाटककार व संतकवी कृष्णंभट्ट बांदकर पुरस्कार आणि रंगसन्मान पुरस्कार विजेत्यांची नावे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काल जाहीर केली.

संतकवी कृष्णंभट्ट बांदकर यांचा जन्म दिवस गोमंत रंगभूमी दिन म्हणून दि. ११ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात साजरा करण्यात येणार असून या सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते उपस्थित राहणार आहेत, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

गोमंतकीय रंगभूमीच्या क्षेत्रात विशेषतः उत्सवी रंगभूमीवर प्रदीर्घ योगदान दिलेल्या ६ ज्येष्ठ गोमंतकीय रंगकर्मींचा कृष्णंभट्ट बांदकर पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. २०१९-२० वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी दत्ता नागेश नाईक (अभिनय), शंभू भिकू नाईक (अभिनय), लाला सूर्या च्यारी (अभिनय), मुरारी म्हामल ऊर्फ तातो पाडजी (रंगभूषा, संगीत), ममता अशोक न्हावेलकर (अभिनय) व सुभाष बाबू परोब येळेकर (दिग्दर्शन) या रंगकर्मींची निवड करण्यात आली आहे.

रंगसन्मान पुरस्काराचे मानकरी
२०१८-१९ वर्षासाठीच्या रंगसन्मान पुरस्कारासाठी अभय अनंत जोग (दिग्दर्शन), लीना पेडणेकर (अभिनय), आनंद प्रल्हाद मासूर (दिग्दर्शन), विनय गावणेकर (अभिनय), केशव ऊर्फ राजू मेघश्याम नायक (अभिनय, दिग्दर्शन) व किरण सोमनाथ नाईक (नेपथ्य) यांची निवड करण्यात आली आहे. बांदकर पुरस्काराची रक्कम प्रत्येकी १५ हजार रुपये तर, रंगसन्मान पुरस्कारासाठी प्रत्येकी २० हजार रुपये आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

कृष्णंभट्ट बांदकर यांनी संगीत शकरंभा-संवाद, लोपामुद्रा-संवाद, नटसुभद्रा विलास व अहल्योध्दार ही संगीत नाटके लिहून त्याकाळी सादर केली होती. त्यांच्या चार संगीत नाटकांच्या संहितांपैकी फक्त सं. अहल्योध्दार या त्यांच्या संगीत नाटकाच्या संहितेची प्रत सिताकांत बांदकर यांच्याकडे सापडली. त्यानंतर हंस थिएटर ट्रेनिंग सेंटर, फोंडा या संस्थेने सं. अहल्योध्दार या नाटकाचा प्रयोग रंगमंचावर सादर केला. या नाटकातील नाट्यपदांच्या ध्वनिफितीचे विमोचन या कार्यक्रमात केले जाणार आहे.

कला अकादमीचा
यंदा सुवर्णमहोत्सव
गोवा कला अकादमीच्या स्थापनेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत असून कला अकादमीचा सुवर्ण महोत्सव विविधांगी कार्यक्रमानिशी साजरा केला जाणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती खात्याचे मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी काल दिली.

सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात पोचले असून सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कला अकादमीची इमारत जुनी झाली असल्याने नूतनीकरणाची गरज आहे. नूतनीकरणाबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले. जागा अपुरी पडत असल्याने आणखी एक सभागृह बांधण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.