कृषी व निसर्ग पर्यटनास सत्तरीत वाव

0
109

– उदय रामा सावंत
बंद झालेला खाण व्यवसाय व त्यामुळे निर्माण झालेल्या अनेक स्वरुपाच्या अनाकलनीय समस्या यावर सरकार सध्या पर्यटनाचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी सरकारचे संबंधित मंत्री, अधिकारी, राज्यातील पर्यटन व्यवसाय बहरावा म्हणून परदेशवार्‍या करीत तेथे गोव्याच्या पर्यटनाचा जागर करीत आहेत. गोवा राज्याचे पर्यटन हे फक्त समुद्रकिनारे व आपली सागरी संस्कृती यांच्या चौकटीतच आहे, असा जर सरकार विचार करीत असेल तर ते योग्य नव्हे, कारण गोवा हा फक्त आणि फक्त सागरी पर्यटनापुरताच मर्यादित नाही, तर गोव्याच्या गाभार्‍यात अनेक स्वरुपाचे पर्यटन दडलेले आहे, जे येणार्‍या भविष्यात अनेक स्तरांवर सरकारला मदतीचा हात देऊ शकते. समुद्रकिनार्‍यावर अर्धनग्न अवस्थेत फिरणार्‍या देशी परदेशी पर्यटकांना वाव देणारी आपली संस्कृती नाही यावरही थोडासा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. बंद झालेल्या खाण व्यवसायाला पर्याय म्हणून रोजगाराची चांगल्या प्रकारे संधी देणार्‍या व्यवसायाचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी शासकीय पातळीवर डोळसपणे विचार होण्याची गरज आहे. समुद्रकिनार्‍यांपेक्षा आपल्या गोव्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे पर्यटकांना दाखविण्याचा जोवर प्रयत्न होत नाही, तोवर आपण खाण व्यवसायाला पर्यायी साधन म्हणून विकसित गोव्याची स्वप्ने पाहूच शकत नाही. एकूण गेल्या तीन चार वर्षांची आकडेवारी पाहता, समुद्रकिनार्‍यावर कंटाळलेला पर्यटक हळूहळू निसर्गाशी आपली नाळ जोडण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण सातत्याने गोव्यात आपला आनंद व्यक्त करण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना राज्यातल्या इतर पर्यटनस्थळांविषयी प्रेम व आवड आहे. हे प्रेम, आवड टिकवून ठेवण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे.
निसर्गाशी आपले नाते सांगणारा सत्तरी तालुका यासाठी आपला रोल मॉडेल म्हणून पुढे आणता येऊ शकतो. येथील कष्टकरी लोकांच्या जीवनात नव्याने पर्यटनाचे पैलू आपणास फुलविता येणार आहेत. निसर्ग व कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपणास क्रांती निर्माण करण्याची संधी सुदैवाने निसर्गदेवतेने दिली आहे. याचा पूरेपूर वापर नियोजनबद्ध पद्धतीने केल्यास त्याचे चांगले, अनुकूल परिणाम आपणास दिसतील.
गोवा राज्यात सातत्याने येणारा देशी, विदेशी पर्यटक समुद्री पर्यटनापासून चार हात दूर राहत आपला वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवू पाहत आहे. म्हणून त्यांनी आपण मोर्चा निसर्गसंपन्न भागाकडे वळविण्यास सुरुवात केली आहे. एकूण तीन-चार वर्षांचा इतिहास पाहिल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक सत्तरीसारख्या भागात येत आहेत. थंड वातावरण, डोळ्यांना आल्हाददायक हिरवे डोंगर, इतिहासकालीन स्थळे यावर वेगळ्या प्रकारचे निसर्गपर्यटन उभारी घेऊ पाहत आहे. त्याच्या पंखांना प्रोत्साहन देण्याची काळाची गरज आहे.
सत्तरी तालुक्याच्या गाभार्‍यात अशी अनेक स्थाने दडलेली आहेत, ज्याच्यामुळेच सत्तरीला वेगळ्या अर्थाने दिशा मिळण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. निसर्गाचा चमत्कार बनून राहिलेल्या अनेक स्थळांबरोबरच अनेक वर्षांपासून दिखाऊपणाच्या विचारसरणीमुळे विस्मृतीत गेलेला शेतीव्यवसाय पुन्हा बहरण्याची संधी मिळाल्यास नवल वाटू नये. आपल्या भागात येणार्‍या पर्यटकांच्या आवडी-निवडीची नाळ ओळखण्याची खरी गरज आहे. ग्रामीण भागातील जीवन पद्धती, त्यांच्या कष्टांतून जन्माला येणारे कृषीरूप सोने यांची व्यवस्थितपणे सांगड घातल्यास सत्तरीला पर्यटनाच्या माध्यमातून सोने निर्माण होणार आहे. सत्तरीत येणार्‍या पर्यटकांना एक वेगळ्याच स्वरुपाचा निसर्गानुभव देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. कष्टकरी समाजाने स्वतःच्या कृतीतून निर्माण होणारे उत्पादन प्रत्यक्षपणे निसर्ग पर्यटकांना दिल्यास त्याचा अनुकूल परिणाम पर्यटनवृद्धीसाठी होऊ शकतो. त्यासाठी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून अधिक प्रयत्न होणे काळाची गरज आहे.
माणूस हा निसर्गप्रेमी असतो व प्रत्यक्ष कृतीद्वारे मिळणारा आनंदही वेगळ्याच प्रकारची अनुभूती देत असतो. अशाच वेगळ्या अनुभवासाठी बांदा – महाराष्ट्र यासारख्या ठिकाणी कार्यान्वित असलेल्या प्रकल्पाचा खास उल्लेख करता येईल. डेगवे या गावात अशा स्वरुपाचा सुंदर प्रकल्प राबवण्यात आला आहे. निसर्ग व मानवी जीवन यांच्या नात्याची वेगळी ओळख निर्माण करणारी ही प्रक्रिया आहे. आपल्या पारंपरिक व्यवसायाची व्यवस्थित सांगड घालीत त्या गावात नवीन रोजगार निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. गावातील जवळपास बहुसंख्य लोक याच माध्यमातून आपला उदरनिर्वाह करताना स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. अशा स्वरुपाचे चांगले उदाहरण आपणास सत्तरीमधील अनेक गावांत दाखवून देऊ शकतो.
शेतीची प्रक्रिया काय असते हे आपण पर्यटकांना दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो. आज बळीराजा कशाप्रकारे काम करतो, नांगरणीची प्रक्रिया कशी असते हे पाहण्याची उत्कंठा अनेकांना असते. आपण गावातून अशा प्रकारच्या गोष्टी निसर्ग पर्यटकांना दाखविण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांना चिरंतन काळापर्यंत आनंद देणारा ठरेल. त्याचबरोबर शेतीव्यवसायाला चालना मिळू शकेल. भाताची मळणी करणारी प्रक्रिया अधिक लक्षवेधी करण्यावरही भर देऊ शकतो. मळणीद्वारे गवताच्या काड्यांपासून भाताचे दाणे दूर कसे करता येतात हा अनुभव पर्यटकांनाही आनंद देऊन जाईल.
गोवा व महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने मळणी करण्यात येते. काही ठिकाणी पायमळणी करण्यात येते. सार्‍याच ठिकाणी बैलांची मळणी करण्यावर भर देण्यात येत नसतो. याचे प्रात्यक्षिक पर्यटकांना दाखविल्यास पर्यटनास वेगळा आयाम मिळण्यास त्याची मदत होईल. गोवा व सत्तरी तालुक्यातील अनेक गावांची भातपिकांच्या जातीवरून वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. या भाताची लागवड करून त्याचा प्रत्यक्ष अनुभव कृषीप्रेमींना, पर्यटकांना दाखविल्यास चांगला फायदा व परिणामही आपणास मिळेल.
कृषी पर्यटनासाठी अनेक स्तरांवर अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. पूर्वी सत्तरीच्या अनेक ठिकाणी नाचणी लागवड करण्यात येत होती. आजही गुळेली, माळोली आदी सारख्या भागांत याला प्राधान्य देण्यात येते. मात्र पर्यटकांसाठी हा प्रकार पूर्णपणे दुर्मिळ आहे. अशा स्वरुपाची तसेच वरी, तूर यांची लागवड करून ती पर्यटकांना उपलब्ध केल्यास त्याचा चांगला अनुभव मिळेल. काही वर्षांपूर्वी घनदाट जंगलसंपत्तीमुळे रानडुक्कर व रानटी स्वरुपाची जनावरे कृषी लागवडीची नासाडी करत होती. या जनावरांपासून लागवडीला संरक्षण मिळावे यासाठी शेतात शेतमळे घालण्यात येत होते. आता हा प्रकार अभावानेच दिसून येतो. पाऊस व ऊन यांपासून मळ्यावरून कृषी लागवडीचे संरक्षण करणार्‍या शेतकर्‍याला संरक्षण मिळावे म्हणून खास ग्रामीण शैलीत त्याची उभारणी करण्यात येत होती. यासाठी पळसाची पाने छप्पर शिवणीसाठी वापरली जात होती. अशाप्रकारचा प्रयोग केल्यास लक्षवेधी ठरेल.
कृषीपर्यटनाच्या माध्यमातून समाजात एक वेगळी ओळख निर्माण करणारे स्व. फादर अनासिया आल्मेदा यांनी भिरोंडा येथे पूर्णपणे सेंद्रिय खताचा वापर करून वनौषोधी झाडांची लागवड, ‘श्री’ पद्धतीने भाताची लागवड, काजूची लागवड करून वेगळ्याच धर्तीवर प्रकल्प उभा केला आहे. कोणत्याही स्वरुपाची सुविधा उपलब्ध नसतानाही त्यांनी शून्यातून उभ्या केलेल्या या शेतीपर्यटन प्रकलाला आज मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात. यामुळे भिरोंडा व इतर आजूबाजूच्या भागांत रोजगाराची संधी निर्माण होताना स्वयंरोजगारालाही उभारी मिळत असते. नगरगावाचाही यासंबंधी मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो. कोणत्याही स्वरुपाचे धरण नाही किंवा नदी नाही अशा नगरगाव भागात पाण्याचा अखंड स्त्रोत सुरू आहे. याचा पूर्णपणे वापर करीत सृष्टीनिर्माता ब्रह्मदेवाच्या परिसरात उभ्या असलेल्या, डोलणार्‍या कृषीबागायती यांचा पुरेपूर फायदा कृषीपर्यटनाच्या दृष्टीने होऊ शकतो.
हे नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यासाठी या पर्यटनस्थळांवर साधन – सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. पावसाळी मोसमाचा रंग वेगळा असतो. हिवाळी मोसमातही अनेक निसर्गपर्यटन स्थळे आहेत, जी आजही प्रसिद्धीच्या वलयापासून दूर आहेत. ब्रह्माकरमळी येथे दहा हजार फुलपाखरांचा विहार होत असलेली आजोबाची तळी, माळोली सत्तरी येथील निराकाराची देवराई, म्हादई येथील कासवांची कातर, भिमाचो खांबो, साट्रे येथील पूल, अडवई सत्तरी येथील गुहा, वेळगे सत्तरी येथील सुमारे ३०० लोकांना वास्तव्य करण्यासारखी गुहा अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत.
सरकारने दोन वर्षांपूर्वी धावे येथे थरारक व साहसी पर्यटनाला वाव देण्यासाठी व्हाईट वॉटर राफ्टिंगला वाव दिला आहे. तेथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र स्थानिक पातळीवर याचा खर्‍या अर्थाने फायदा होतो की नाही याबद्दल मात्र पूर्णपणे साशंकता आहे, कारण साहसी पर्यटनाचा लाभ घेण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना नियोजित ठिकाणी नेण्यासाठी स्थानिकांना वाव मिळणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही.
निसर्गपर्यटनाच्या माध्यमातून विचार केल्यास सत्तरीला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिले आहे. याचे व्यवस्थितपणे मार्केटिंग केल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. सत्तरीच्या चरवणे, हिवरे, खोतोडा, केरी आदी भागांत पावसाळ्यात कोसळणारे धबधबे, निर्माण होणारे विहंगम दृश्य पाहण्यासाठी खास करून रविवारी व शनिवारी त्याचप्रमाणे सुट्टीच्या दिवशी पर्यटकांचे तांडे मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र गेली अनेक वर्षे हा प्रकार अनियोजित स्वरूपात होत आला आहे. सरकारने हा विषय पद्धतशीरपणे हाताळल्यास त्याचा लाभ स्थानिक नागरिकांना विविध स्तरांवर होऊ शकेल. सध्या अनेक भागांत पर्यटनाच्या नावावर काही तरुण पर्यटकांची लूट करीत आहेत. मिळेल त्या प्रमाणे पैशांची आकारणी करताना पर्यटकांप्रती कोणत्याही स्वरुपाचा आदरभाव बाळगण्यात येत नाही. त्याचे दूरगामी परिणाम भविष्यात आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. सरकारच्या पर्यटन खात्याने याला नियोजनाचा साज दिल्यास सरकारलाही त्याचा पर्यटनवृद्धीसाठी मोठा फायदा होऊ शकेल.