‘कृषी विपणनासाठी घाऊक बाजार उपयुक्त’

0
99

पणजी
कृषी विपणनासाठी घाऊक बाजार फार उपयुक्त आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनाला थेट बाजार मिळतो. शिवाय भावही चांगला मिळत असल्याने अधिकाधिक शेतकर्‍यांनी ई-नाम’सारख्या राष्ट्रीय पोर्टलचा वापर करून कृषी उत्पादनांच्या भावाचा आढावा घेतल्यास भविष्यात शेतकर्‍यांना त्याचा अधिक फायदा होणार आहे, असे मत कृषी विपणनासाठी घाऊक बाजार’ यावरील जागतिक परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
गुरूग्राम हरियाणा येथे हरियाणा राज्य कृषी विपणन मंडळ आणि राष्ट्रीय कृषी पणन महासंघ यांच्यातर्फे ही परिषद तीन दिवस पार पडली.
या परिषदेत भारतासह चीन, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, इटली, स्पेन, ग्रीस, अमेरिका, फ्रान्स, नेपाळ आदी देशातील कृषी तज्ज्ञांनी भाग घेतला. यावेळी विविध विषयांवर परिसंवाद झाले. त्यात झेनग्यून मा (चीन), भारत सरकारचे कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला, हरियाणाचे कृषी मंत्री ओम प्रकाश धनकर, ओडिशाचे सहकारमंत्री सुरज्या नारायण पात्रो, लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिक्सचे प्रा. नीलेश दतानी, नवराज सिध्दू, पवनेश कोहली, भारत सरकारच्या शेतकर्‍यांच्या दुप्पट कृषी भाव योजनेचे अध्यक्ष अशोक दलवाई, ए. कनान (दक्षिण आफ्रिका), रामिरो कावाझोस (मेक्सिको), जे तजेदो(स्पेन), एफ. एम. पॉलोत्तीनी (इटली), मार्क स्पिलेरीन (फ्रान्स), आय ट्रिन्टाफिलीस (ग्रीस) आदींनी आपापल्या देशातील कृषी विकासासमोरील आव्हाने, नवीन तंत्रज्ञान अणि बाजाराचे स्वरूप यावर उपयुक्त माहिती दिली. तसेच कमी खर्चात शेती आणि शेतपिकासाठीची भांडारे, शीतगृहे, साखळी मार्केट यावरही मार्गदर्शन केले. या परिषदेदरम्यान दिल्लीतील आझादपूर भाजीपाला मार्केट आणि सोनिपत येथे पाहणी करण्यात आली.
राष्ट्रीय कृषी पणन महासंघाच्या अध्यक्ष कृष्णा गेहलोत, वरिष्ठ उपाध्यक्ष पलित कुमार बोरा, उपाध्यक्ष उल्हास अस्नोडकर आदींचीही या परिषदेला उपस्थिती होती. महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जे. एस. यादव यांनी परिषदेचे संचालन केले. गोवा कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप हेही परिषदेत सहभागी झाले.
परिषदेचे उद्घाटन केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरूषोत्तम रुपाला यांच्याहस्ते पार पडले. परिषदेचा समारोप हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या उपस्थितीत पार पडला.